शिवाजी महाराज आणि थोरले बाजीराव – आयुष्य व कारकीर्द , एक विचार
लेखकाचे मनोगत –
शिवाजी महाराज व थोरले बाजीराव यांची तुलना करणे योग्य नाही . शिवाजी महाराज स्वता:
छत्रपती – ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले , तर थोरले बाजीराव ह्यांनी पंतप्रधान [
पेशवा ] या नात्याने ,
छत्रपतींच्या [ शाहू महाराजांच्या ] गादिची , त्यांच्या आज्ञे
नुसार सेवा केली . दोघांचा ही काळ [ १७ वे आणि १८ वे शतक ] वेगळा होता . त्यांच्या
कार्याची कर्मभूमि फार वेगळी – किल्ले केंद्रीत [ सह्याद्रि ] आणि मैदानी [ गुजरात
, माळवा , बुंदेलखंड ] प्रदेश , अशी होती. एक
युगपुरुष / युगप्रवर्तक ( महाराज ) तर दुसरे
हे नेमलेले पेशवे . महाराजांसारखा
युगपुरुष काही शतकातून एखादाच असा निर्माण होत असतो . थोरले बाजीराव युगपुरुष जरी गणले
जात नसले तरी मराठ्यांच्या इतिहासात असे “ रणपुरुष / रणधुरंधर “ नंतर झाले नाहीत हेही
खरे . “ या सम हाच “ असेच होते !
असे असूनही दोघांनीही त्या त्या परिस्थित एवढे मोठे पराक्रम गाजवले , की ज्यांच्या मुळे ,
भरताच्या इतिहासाला कलाटणी मिळून - त्यांची दखल घ्यावी लागली . या दोघांची कारकीर्द वाचत असताना , एक गोष्ट - विशेषता: लष्करी डावपेचांबद्दल , लक्षात
येते, ती म्हणजे – जोखीम घेण्याची तयारी , गनिमी काव्याचा परिणामकारक वापर आणि अतिशय वेगवान व शत्रूंना चक्रावून टाकणार्या
हालचाली या बाबत दोघान मध्ये सारखेपणा . पुढे
विचार करता लक्षात आले की या दोघांच्या आयुष्यात व कारकिर्दीतले साम्य आणि फरक हे दोन्हीही महत्वाचे आहेत .
१ ] पार्श्वभूमी
शिवाजी महाराजांनी [ ज. १६३० – १६८० ] स्वराज्याची अधिकृत
स्थापना १६७४ मध्ये स्वता:ला राज्याभिषेक करून केली . अतिशय प्रतिकूल परिस्थित , बलाढ्य अशा औरंगजेब [ मोगल ] व विजापूरची आदिल शाही – शून्यातून – यांच्याशी
झगडून स्वराज्य उभे केले . त्या काळी , मोगल किंवा आदिलशाही
शी एकनिष्ठ राहून त्यांची सेवा करणे हेच सर्वांचे इतिकर्तव्य किंवा इच्छा असायची ..
पुढे शिवाजी महारजांच्या मृत्यू नंतर [ १६८० ] महाराष्ट्राने अभूतपूर्व असा –
संभाजी [ १६८० – ८९ ] , राजाराम
[ १६८९ – १७०० ] व तराबाई [ १७०० – १७०७ ]
– यांच्या नेतृत्वा खाली एकंदर २८ वर्षे , यशस्वी लढा
देऊन स्वराज्य जीवंत ठेवले . त्याच बरोबर औरंगजेबाला [ मोगल राजवटीला ] जवळपास
भिकेस लावले आणि त्याचे , गोवळ कोंड्याची कुतबशाही [ १६८६ ]
व विजापूरची आदिलशाही [ १६८७ ] जिंकल्या नंतर , महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले .
पुढे औरंगजेबाच्या मृत्यू नंतर शाहू महाराजांना सोडून [ १७०७ ] , महाराष्ट्रात दुही मजवण्याचा मोगलांनी प्रयत्न केला . ती दुफळी सुद्धा शाहू महाराजांनी , आधी , स्वता: ची सातार्याची गादी निर्माण करून व
नंतर बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई देऊन थोडी फार स्थिर करून व नंतर परिस्थिति
कौशल्याने हातळून – काबूत आणली .बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यू [ १७२० ] नंतर , त्यांच्याच मुलाला – [ थोरले ] बाजीराव यांना पेशवाईची वस्त्रे लगेच [ १५
दिवसात ] देऊन पुढील अस्थिरता टाळली . बाजीराव तेव्हा २० वर्षांचे , अननुभवी होते . त्यावेळेस राजकीय , सामाजिक व्यवस्था
अतिशय बिघडलेली होती . शिवाजी महाराजांनी लावलेली कारभारतली आखीव रेखीव व्यवस्था
पूर्ण पणे कोलमडली होती . सैन्यातील शिस्त बिघडली होती . वतनदारी , जी शिवाजी
महाराजांनी बंद केली होती , ती [ परिस्थिती मुळे राजाराम महाराजांना ] परत सुरू
कारवी लागली होती .प्रबळ सरदारांना जगिरीचे आकर्षण होते . दाभाडे , भोसले असे सरदार ज्यांनी राजाराम / ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली
मोगलांशी यशस्वी लढा देऊन , सामर्थ्य प्राप्त केले होते , ते बाजीरावना जुमानीत नव्हते कारण त्यांना पेशवे व्हायची सुप्त इच्छा
होती .
दोघांच्या कार्याचा विचार करताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवाव्या लागतील . शिवाजी
महराजांचा काल खंड – १७ व्या शतकातला [
१६३० ते १६८० ] ,तर थोरले
बाजीराव यांचा – १८ व्या शतकातला [ १७००
ते १७४० ] . दोघांच्या कालखंडात जवळ जवळ ७० वर्षांचा फरक . ह्या ७० वर्षात , भारतात , फार
मोठा राजकीय फरक पडला होता . १७ व्या शतकातल्या दोन महत्वाच्या व्यक्तींचा –
शिवाजी महाराज व औरंगजेब - मृत्यू झाला होता . त्यामुळेच १८ व्या शतकात सुरवातीपासून
[ १७०७ ] दोन ठळक राजकीय प्रवाह दिसून येत होते – एकीकडे मोगली सत्तेची अधोगती व
विघटना कडे वाटचाल सुरू झाली होती [ आपापसातील झगडे ,
स्वतंत्र होऊ पहाणारे निजाम उल मुलक या सारखे सरदार , राजपूत
इ मुळे ], तर दुसरी
कडे त्याच वेळेस मराठी सत्तेचा , अतिशय वेगळ्या स्वरुपात , उदय होत होता [ सातारा व कोल्हापूर आशा दोन छत्रपतींच्या गाद्या ,पेशवाईचा उगम , दक्षिणेतील ६ सुभयांच्या - चौथाई व
सरदेशमुखीच्या सनदा ] . त्यामुळे मराठी राजवटीला राज्य विस्तरा करिता नवीन नवीन
संधी [ माळवा , गुजरात , कर्नाटक ] , व त्याच बरोबर गरज पडल्यास ,दिल्ली बादशहाच्या सहायाची , आव्हाने [ अस्थिरता ,
जुन्या – नवीन सरदार व माणसां मधले मतभेद ] व अंतर्बाह्य धोके [ कोल्हापूरकर छत्रपती
संभाजी ( अंतर्गत ), निजाम ( बाह्य ) ] तयार होत होते .
अशा दोन अतिशय भिन्न अशा परिस्थिच्या पार्श्वभूमीं मुळे , शिवाजी महाराज व थोरले बाजीराव यांची तुलना
, खर तर होऊ शकत नाही .एकाने स्वराज्याचा पाया रचला तर दुसर्याने
तो उत्तरेत विस्तारला . शिवाजी महाराजां सारखे पुरुष , फार
क्वचीत जन्माला येतात . परंतु बाजीराव हे सुद्धा काही कमी योग्य नव्हते . शाहू
महाराज एकदा म्हाणाले होते “ जर का मला एक लाख सैन्य आणि फक्त बाजीराव यांच्यात
निवड कराययला सांगितली , तर मी बाजीरावांची करीन “ . पराक्रम , शौर्य , भारतीय राजकारण घडवलेले बदल , या बाबतीत मराठी राजवटीतील व भारताच्या
इतिहासात दोघांचे योगदान वादातीत आहे . परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे - दोघांच्या
कार्यात विलक्षण पूरकता दिसते . शिवाजी
महाराजांनी स्वराज्य स्थापले व थोरल्या बाजीरावांनी ते उत्तरेत वाढवून मराठी स्वराज्याचे
रूपांतर साम्राज्यात [ राजवटीत ] करण्यास
सुरवात केली . बहुदा ह्याच कारणामुळे असेल किंवा परिस्थिति मुळे असेल , पण दोघांच्या आयुष्यातील घटना , त्यांचे पराक्रम , लष्करी डावपेच , आव्हाने यांच्यातील – साम्य व फरक – हा लक्षात येण्यासारखा आहे .
त्यामुळेच त्यांच्या चरित्रांचा मागोवा घेतांना , इतिहास
अभ्यासकास , त्याबाबत दोन शब्द लिहिण्याची इच्छा होते . (
बाजीरावांना जे महत्वाचे विजय मिळाले त्यात – त्यांचे भाऊ – चिमजी अप्पा यांचा
सुध्धा हात होता . चिमाजींच्या सहाय्या शिवाय , बाजीरवाना हे
– पालखेड , भोपाळ – असे विजय मिळवणे कठीण झाले असते . फक्त बाजीरावांचा विषय
असल्याने इथे चिमाजींचा उल्लेख आलेला नाही . त्यात त्यांच्या कार्याचे महत्व कमी
लेखण्याचा हेतु मुळीच नाही . किंबहुना चिमाजींच्या वसई च्या विजया बद्दल तर बरेच
लिहिले गेले आहे .)
२ दोघां मधले साम्य
अ.० ] लष्करी डावपेच -
शिवाजी महाराजांनी /
त्यांच्या सरदारांनी , त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत [ १६४४ ते १६८०- ३६ वर्षात ] २२३ लढाया
लढल्या व त्यात , काही अपवाद वगळता ,
सर्व लढायांत विजय मिळवला . थोरले बाजीराव यांनी लढलेल्या छोट्या मोठ्या ४० लढायात
विजय मिळवला . स्वता: थोरले बाजीराव तर अजिंक्य होते . पराभव त्यांना माहीत नव्हता
. दोघांनीही अतिशय प्रबळ अंतर्गत / बाह्य
शत्रू असूनही राज्य विस्तार केला . दोघांनाही अशी दैदीप्यमान कामगिरी करणे - त्यांच्या युद्ध नेतृत्व , लष्करी डावपेच , धाडस इ गुणां मुळेच , साध्य झाल . दोघं मध्ये एक महत्वाचा समान दुवा म्हणजे – लष्करी डावपेच .
विशेषता: “ गनिमी काव्याचा “ केलेला परिणामकारक वापर .
अ.१ – गनिमी कावा
गनिमी कावा अथवा इंग्रजीत
गुरिला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. यात अतिशय कमी संख्यबळ असूनही तुलनेने
मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला
करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी
माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूचे मनोधैर्य खच्ची
होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते.
महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा
आहे. गनिमी कावा परिणामकारक होण्यासाठी – भौगोलिक प्रदेश ,
आपले व शत्रूचे बलाबल , शत्रूची संभाव्य व्यूहरचना इ. गोष्टी
लक्षात घेऊन त्याचा वापर करावा लागतो . त्यानुसार आपली रणनीती ठरवून अचूक वेळी
हालचाली केल्या , तरच विजय मिळतो . या मध्ये शत्रूला
अनपेक्षितपणे - हुलकावणी देणे ,चकवणे ,
फसवणूक करणे , कपट [ कावा ] करणे ,
धोका देणे , कोंडीत पकडणे इत्यादि अंतर्भूत आहे.
जेव्हा , एका पक्षा कडे विरुद्ध्द्ध पक्षा पेक्षा , फार कमी
सैन्य व साधन सामुग्री असते , किंवा बाजू फारच लंगडी असते , तेव्हा , समोरासमोर युध्ध टाळणे हाच उत्तम उपाय
असतो . अशाच वेळेस , “ गनिमी कावा “ वापरून शत्रूस प्रथम जेरीस
आणून , नंतर कोंडीत पकडून , त्याचा
पराभव करता येतो . गनिमी कावा आणि
सह्याद्रि व त्या वरील किल्ले - यांची योग्य सांगड घालून ,
यशस्वीपणे ही पद्धत अमलात आणून स्वराज्याची स्थापना करणे – हे भारतीय इतिहासात
प्रथमच झाले . म्हणूनच महाराजांना “ गनिमी काव्याचे “ जनक म्हणतात .
गनिमी कावा आणि भूप्रदेश यांची योग्य सांगड घालून शत्रूचा कसं पराभव करता येतो हे शिवाजी महाराज आणि थोरले बाजीराव
यांनी जगाला दाखवून दिले . दोघांनीही “ गनिमी काव्याचा – आपआपल्या भूप्रदेशाचा
विचारकरून व तसे डावपेच आखून “ केलेला अतिशय परिणामकारक वापर हे दोघांचे , एक प्रमुख वैशिष्ठ्य .
शिवाजी महाराज हे खरोखर दृष्टे होते . महाराजांची सर्व मदार किल्यान वरच होती .
किल्ल्यांच्या आधारानेच त्यांनी स्वराज्य उभारणी
व विस्तार केला . [ बखरीतील नोंदी नुसार , शिवाजी महाराजांच्या ताब्यात [ स्वराज्यात ] - महाराष्ट्र
व दक्षिणेतील मिळून २८० च्या आसपास किल्ले होते ] या किल्ल्यांचाच त्यांनी प्रमुख “ अस्त्र “ म्हणून
बचाव आणि आक्रमणासाठी केला . किल्ल्यांचे महत्व ओळखून
, त्यांचा परिणामकारक वापर करून व त्यालाच “
गनिमी काव्याची “ जोड देऊन शिवाजी
महाराजांनी आपले स्वतंत्र राज्य स्थापले .
किंबहुना असे म्हणता येईल की , किल्ल्यांनाच – [ जल व जमीन
] - केंद्र स्थानी ठेऊन त्यांनी जवळपास सर्व
– लष्करी , व्यवस्थापकीय , राजकीय – योजनाची आखणी व अममलबजावणी केली आणि यश मिळवले . [ रामचंद्र पंत अमात्य – शिवाजी महाराजांच्या
अष्ट प्रधान मंडळीनपैकी एक , यांनी त्यांच्या “ आज्ञापत्रात
“ शिवाजी महराजांचे विचार , उद्गार ,
कार्य याविषयी लिहून ठेवले आहे . आज्ञा पत्रात म्हटले आहे – “ संपूर्ण राज्याचे
सार ते दुर्ग ... “. ते सांगतात “ हे राज्य तर तीर्थरुप थोरले कैलास स्वामी
यांनी गडान वरूनच निर्माण केले . जो जो देश स्वशासनवश न होय , त्या त्या देशी स्थळविशेष पाहून गड बांधले . त्यावरून , आक्रमण करीत सालेरी अहिवंता पासून कावेरी तीरापर्यन्त निष्कंटक राज्य
संपादिले “
अमात्यांच्या आज्ञापत्रातील सुरवातीलाच जो उतारा दिला आहे , त्यात “ परंतु राज्यात किल्ले होते ,
म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले “ . या लहानशा वाक्यात औरंगजेबा सारख्या प्रचंड
शत्रू च्या कचाट्यातून राजाराम छत्रपतींचे कारकिर्दीत स्वराज्याचा बचाव कसा झाला
याचे मर्म गग्रांथित केले आहे . [ महाराष्ट्राचा इतिहास – मराठा कालखंड – भाग –
१ , शिवकाल – १६३० ते १७०७ - - डॉक्टर खोबरेकर ]
शिवाजी महाराजांनी
अफजलखाना विरुध्द्ध प्रताप गडच्या युद्धात ह्याच सर्व गोष्टी वापरुन [ गनिमी
काव्याचा ] वापर करून अशक्यप्राय असा विजय
मिळवला [ १६५९ ] . अफजल खनकडे त्यावेळेस जवळ जवळ ४०,००० सैन्य व प्रचंड अशी इतर
साधन सामुग्री होती . शिवाय अशा बलाढ्य शत्रूशी सामोरासमोर येण्याची , महाराजांची ही पहिलीच वेळ होती . त्यावेळेस महाराजानकडे जेमतेम २०,००० सैन्य होते . परंतु अशा दुर्धर परिस्थित , प्रथमता: , त्यांनी मुत्सत्द्देगिरीने , अफजलखानस – आपणास सोयिस्कर व शत्रूस अतिशय अडचणी च्या जागेत ‘ खेचले “ [ सैन्या सहित यायला उद्द्यूक्त केले ] . अफजल खान जावळीच्या
दरीत ससैन्य आला व तिथेच त्याचा परभाव निश्चित झाला, कारण जावळी
च्या दरीतील घनदाट अरण्ये व दूर्गम वाटा व रस्ते हेच त्याचे “ शत्रू “ झाले .
थोडक्यात “ गनिमी काव्यानुसार “ अफजलखानास , अडचणीच्या जागेत आणून व कोंडले . तो व त्याचे सैन्य पूर्णपणे गाफिल होते . या वेळेस खानाला – त्या
दोघांच्या भेटीत ठार मारून , मग त्याच्या सैन्याचा संपूर्ण
पराभव केला [ १० नोव्हेबर १६५९ ] .
अशाच प्रकारे महाराजांनी –
शाहिस्तेखानाचा मोगल सरदार करतलबखान , कोकण प्रांतावर स्वारी करायला , उंबर्खिंडीतून - कोकणात उतरत होता , तेव्हा त्याला
– बेसावध , आणि अतिशय अडचणीच्या जागेत – तुंगारण्यात –
उतरल्यावर , कोंडीत पकडले . त्याच्या पुढे शरणागती शिवाय
पर्याय नव्हता [ फेब्रुवारी १६६१ ].
शत्रूच्या मोहिमेची , येणर्या / जाणार्या मार्गाची खडानखडा
माहिती काढून , त्याला , अतिशय
अडचणीच्या जागेत – आपल्या केवळ मोजक्या सैनिकांना [ या मोहिमेत महाराजांनी केवळ
१००० सैन्य वापरले ] घेऊन त्याचा पराभव केला . सहयाद्रीची भौगोलिक रचना – दुर्गम
घाट रास्ते , दर्या खोर्या , घनदाट
अरण्ये यांचा वापरून केलेला गनिमी कावा .
थोरल्या बाजीरावांना
सह्याद्रीची साथ नव्हती .
त्यांचा वावर हा सपाट
मैदानी व विस्तृत प्रदेशात होता . सह्याद्रि सारख्या – दर्या - खोर्या , डोंगरी किल्ले आणि
त्यांच्या चढण्यास अतिशय अवघड अशा
वाटा इ गोष्टी ज्या गनिमी काव्यास अतिशय
योग्य व अनुकुल आहेत त्या मैदानी प्रदेशात [ माळवा , गुजरात , खानदेश , वर्हाड [ बेरार ] ,
मराठवाडा ] फारशा नाहीत . त्यामुळे , मैदानातील गनिमी काव्या
करिता फार वेगळ्या डावपेचांची गरज असते . हे पूर्ण पणे ओळखून बाजीरवांनी आपले
डावपेच आखले व यशस्वी अमलात आणून नेत्रदीपक विजय मिळवले . त्यांच्या
सर्व लढाया त्यांना अशाच मैदानी प्रदेशात खेळाव्या लागल्या . मैदानी प्रदेशात मोठे
पायदळ , तोफखाना , हत्ती/ उंट यांचा वापर जास्त परिणामकारक होतो . आणि हेच सर्व मराठ्यांकडे
– थोरले बाजीरावान कडे नव्हते . परंतु त्यांच्या कडे , चपळ
असे घोडदळ , शिंदे – होळकर , पवार यांच्या
सारखे तरबेज सरदार व त्यांच्या जोडीलाच साहस , प्रभावी
लष्करी नेतृत्व अशी “ सामुग्री “ होती . वेगवान व शत्रूला गोंधळ्यात टाकणार्या
अशा आपल्या स्वता:च्या सैन्याच्या व आपल्या वेगवेगळ्या
ठिकाणच्या सरदारां बरोबर सुयोग्य व सुनियंत्रित हालचाली केल्या . शत्रूच्या
हालचालींची बितमबातमी काढून , त्याला अतिशय अडचणीच्या वेळेस
व ठिकाणी कोंडून विजय मिळवले .[ मैदानी
प्रदेशास अनुसरून सुयोग्य बदल केलेला असा “ गनिमी कावा ‘ ] याच कारणाकरता , त्यांची “
पाल्खेडची “ निजाम उल मुल्क – हैदराबाद - विरूद्धची [ १७२७/२८ ] मोहीम जागतिक
स्तरावर अभ्यासली जाते .
बाजीरावांचा मुख्य व्यूह
हा - घोडं दळाच्या वेगवान व शत्रूला गोंधळात
टाकणार्या हालचाली करून , निजामाला त्याच्याच प्रदेशात खेचून , नंतर त्याला
अडचणीत जगेत कोंडून पराभव करण्याचा इरादा होता . त्यामुळे निजाम पुण्यात येऊन
तोफखानयाच्या बळावर धुमाकूळ घालत असताना बाजीरावांनी ,
पुण्यास न जाता , त्याचा उत्तरेकडील सधन प्रदेश लूटला आणि
त्याची राजधानी औरंगाबाद लुटण्याची आवई उठवून तो बरहाणपूर लुटण्यास गेला .मधेच अल्प
काळासाठी गुजरातला जाऊन मोगल सरदार सरबुलंदखानास भेटला . हे कळल्यावर , निजाम तोफखाना अहमदनगरला ठेऊन बाजीराववर त्वरेने ,
त्यांच्याशी औरंगाबाद जवळ सामना करायच्या तयारीने तातडीने गेला . परंतु त्याला
बाजीरावचा व्यूह कळला नाही व तो बाजीरावांच्या जाळ्यात अलगद सापडत चालला . सरते शेवटी
बाजीरावांनी आपल्या इतर सरदारांच्या मदतीने , त्याला , औरंगाबादे पासून २० मैलावर वर पालखेडला २५ फेब्रुवारी १७२८ ला कोंडीत
पकडले व फास आवळला . निजामकडे त्यावेळेस त्याचा तोफखाना नव्हता [ तो अहमदनगरला
सोडून पुढे आला होता ] , दाणा वैरण मिळणे बंद झाल्याने
उपासमार होऊ लागली होती . बाह्य जगाशी त्याचे दळण वळण साफ तुटले . शेवटी
निरुपायाने ६ मार्च १७२८ रोजी , मुंगीशेगावला तह झाला .
ही लढाई खरतर दोन विरुद्ध
अशा डावपेचांमध्ये [ बाजीराव व निजाम ] झाली . निजामाला शाहुंच्या प्रदेशात , समोरासमोर
युद्ध करून , तोफखान्याच्या जोरावर बाजीरावला पराभूत करायचे होते
. उलट बाजीरावांना निजामाच्याच प्रदेशात लढाई करायची होती व समोरासमोर लढाई नको होती . त्यांना “ गनिमी
काव्याने “ निजामस कोंडीत पकडायचे होते .
भोपाळच्या लढाईत , निजामची
थोडी फार अशीच अवस्था होऊन त्याला पराभूत व्हावे लागले . बाजीरावाच्या दिल्ली
स्वारी [ मार्च १७३७ ] नंतर बाजीराव पुण्यास आले . तेव्हा तिकडे बादशहाने , निजामास , दिल्लीला बोलावून ,
मराठ्यांची मळव्यातली सत्ता उखडण्याचा घाट घातला . ह्या बातम्या बाजीरावस पुण्याला
मिळत होत्या . त्याने व चिमजी अप्पा यांनी , शाहू महाराजान
बरोबर विचार विनिमय केला . ऑक्टोबर १७३७ मध्ये ते दोघे व इतर सरदार उत्तरेकडे निघाले
. बाजीरवानि , चिमाजीस , तापी नदीतीरी , निजामपुत्र नसीरजंगाची
वाट अडवण्यास थांबवले व स्वता: पुढे मळव्याकडे निघाले . तिकडे निजाम उत्तरेकडून , तोफखाना बराच फौज फाटा घेऊन मळव्याकडे निघाला . दोघांची गाठ भोपाळ जवळ
पडली . निजामाने भोपाळच्या किल्ल्याचा आश्रय घेतला व तोफखान्याचा वापर सुरू केला .
बाजीरावने , तोफांच्या टप्प्याच्या पलीकडे तळ ठोकून
किल्ल्याची पूर्ण पणे नाकाबंदी केली व निजामस कोंडून ठेवले . त्याची रसद व मदत [ दिल्लीहून
येणारी व त्याचा मुलगा नसीरजंग याची मदत दक्षिणे कडून अपेक्षित ] पूर्णपणे
रोखून धरली . नंतर किल्ल्यातील फौजेस त्रास देण्यास सुरवात केली . १३ डिसेंबर १७३७
ला लढाईस तोंड फुटले . शेवटी निरुपायाने निजामास मराठ्यां बरोबर ७ जानेवारी १७३८
ला तह करावा लागला .
वरील दोन्ही लढायात
बाजीरावांनी – “ गनिमी काव्याचा “ वापर् – परिस्थितीनुरूप व योग्य ठिकाणी केला . पालखेडला , निजामस
आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आणून मग कोंडले . भोपाळच्या वेळेस , तो आपणहून अडकला . दोन्ही वेळेस , निजामची कोंडी
करून त्याला शरण येण्यास भाग पडले . दोन्ही ठिकाणी , फार
मोठी लढाई न खेळता , त्याची रसद व मदत तोडून , विजय मिळवला . दोन्ही वेळेस , निजाम व त्यांच्या
सरदारांपेक्षा जलद हालचाली केल्या . भोपाळला निजाम ,
त्याच्या मुलाची – नासिर जंगाची वाट पाहत होता , परंतु तो
पोहोचण्या आधीच बाजीरावांनी त्वरीत हालचाली करुन , विजय
पदरात पाडून घेतला .
थोडक्यात , शिवाजी
महाराजान नंतर ७०-८० वर्षानी सुद्धा “ गनिमी काव्याचा “ योग्य वापर केला . परिस्थित
आणि भू - प्रदेशात [ डोंगराळ सह्याद्रि विरुध्द्ध मैदानी- माळवा ] फरक असूनही
लागेल तेव्हढा व आपल्याला हवा तसा फरक
करून विजय मिळवले . वरील सर्व लढायात एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे –
किमान मनुष्य हानी करून – शिवाजी महाराज व बाजीराव यांनी विजय मिळवले .
अ.२ – वेगवान , अनपेक्षित
व अतिशय गुप्त हालचाली – शिवाजी महाराज आणि थोरल्या बाजीरावांची
चरित्रे वाचतांना , आणखी एक गोष्ट लक्षात येते की , दोघांनीही अतिशय
गुप्त पणे - चपळ / वेगवान आणि त्या सुध्धा
शत्रूस अनपेक्षित आशा हालचाली केल्या .
शाहीस्तेखाना वरील लाल
महालच्या छाप्याच्या वेळेस [ ६ एप्रिल १६६३ - रात्री बारा नंतर ] , शिवाजी महाराज अतिशय गुप्त
पणे , फक्त १ ते २ तासातच , यशस्वी
कारवाई करून सिंहगडला जाऊन पोहोचले . त्यावेळेस शाहीस्तेखाना भोवती जवळ जवळ १
लाखफौजेचा गराडा होता , बरेच मोगली व मराठा सरदार होते . जरासी
चूक , किंवा बातमी फुटली असती तर , गाठ
जीवाशी होती . त्या वेळेस त्यांच्या बरोबर फक्त ४०० मावळे
होते .
सूरत वरील पहिल्या
मोहिमेच्या वेळेस परत गुप्तता व चपळ हालचाली ह्या दोन्ही दिसतात . [ ६
डिसेंबर ला राजगड सोडले , ३१ डिसेंबर १६६३ – त्रिंबकेश्वर , ४ जानेवारी १६६४
सुरते जवळ .] महिनाभरत जवळ जवळ ६०० की मी अंतर पार केले . त्रिमबकेश्वर
– सुरत अंतऱ – सरळ रेषेत – १५५ की मी / रस्त्याने – २६८ की मी . महाराजांनी हे
अंतऱ– फक्त ५ दिवसात जवळ जवळ ३-४००० सैन्या सहित , मोगालानच्याच हद्दीतून
– गुप्त पणे पार केले . लूट परत आणण्या करिता
नेलेले शेकडो बैल , घोडे परत वेगळेच . त्या वेळच्या
रस्त्यांचा विचार केला तर मन थक्क होते . सुरतेवरच्या स्वारीची कल्पना करणेच
धाडसचे होते – ती यशस्वी पणे पूर्ण करणे व परत लूट घेऊन येणे तर दूरच .
बाजीरावांनी सुध्धा अशीच
गुप्तता व चपळाई , दिल्ली च्या स्वारी च्या वेळेस दाखवली होती [ मार्च १७३७ ]. होळकरांच्या
फौजेचा पराभव करून तीन मोगली सरदार – खान दौरान , बंगश व
सादत खान , मथुरे च्या आसपास होते . ज्या वळेस बाजीराव गोहाद
जवळ होते , तेव्हा होळकरांची पराभूत झालेली फौज , त्यांना येऊन मिळाली . लगेच बाजीराव गोहाद हून दिल्लीस जाण्यास निघाले [
गोहाद – दिल्ली हे अंतर सरळ रेशीत – २८०
की मी आहे . पण शत्रूला चकवा देण्यासाठी त्यांना लांबचा मार्ग – मेवात (
सध्याच्या हरियाणा मार्गे ) - पत्करावा लागला [ तो ३५० की मी असावा ] . अतिशय
गुप्त पणे , - दहा दिवसांचा तो प्रवास ,फक्त २ दिवसात – अहोरात्र करून , दिल्लीजवळ २८ मार्च
१७३७ ला थडकले [ म्हणजेच ३५० की मी चा
प्रवास फक्त २ दिसात केला – सरासरी दिवसाला – १७० की मी – हजारो
सैन्या सहित . सर्वसाधारण पणे , त्या काळी , दिवसाला २५ – ३० की मी ससैन्य
प्रवास केला जात असे ] .कुणालाच कल्पना नव्हती की बाजिराव – मथुरे जवळच्या दोन
मोठ्या मोगल सरदारांना चुकवून , अचानक दिल्लीवर येऊन धडकेल . बादशहाचा तर विश्वासच बसला नाही .
अशाच धाडसी व वेगाने
केलेल्या प्रवासा मुळे बाजीरावांनी –
बुंडेलखंड च्या छात्रसालाच्या मदतीस जाऊन , जैतपुरला मोगली सरदार बांगश ला १७२९ ला पराभूत केले .
छात्रसालला मोंगलानचा सुभेदार बांगशने , जैतपुर च्या किल्ल्यात कोंडून मग शरण यायला भाग पाडले होते . तेव्हा छात्रसालाने , बाजीरावांना , मदतीची हाक दिली . त्यावेळेस बाजिराव
बीड च्या आसपास असावे . लगेच त्यांनी , महोर प्रांतातून
जानेवारी १७२९ ला सैन्या सहित कूच केले . अत्यंत कठीण देवगड , गढा मार्गावरून , जो लांबचा व उत्तरेतील स्वार्यान
करिता सहसा न वापरणार्या मार्गा वरुन बुंदेलखंडाकडे गेले . बांगशचे माळ्व्य्यातील
मराठ्यांच्या हालचाली वर लक्ष होते . परंतु , बाजीरावांनी
चोखाळलेल्या मार्गा वरून मराठ्यांच्या मोठ्या
फौजा बुंडेलखंडात येतील अशी त्यास कल्पना नव्हती . मार्च १७२९ ला छात्रसल व
बाजीराव यांच्या फौजा , महोबाहून निघाल्या व बरोबर ८
दिवसांनी जैतपुरला पोहोचल्या . त्यांनी मग बांगशच्या फौजेस वेढा घातला . दरम्यान , बांगशने दिल्ली हून मदतीला आपल्या मुलाला, कायमखान , यास बोलावून
घेतले . तो जैतपुर पासून १२ मैलावर धान्य व १०,००० फौजा घेऊन
एप्रिल अखेरीस पोहोचला . तेव्हा अचानक बाजीरावच्या सैन्याने घेरले व त्याचा पराभव केला
. तो पर्यन्त बांगशने जैतपुरच्या किल्ल्या
मध्ये आश्रय घेतला होता . मराठ्यांनी शेवटी , वेढा करकचून आवळल्याने
बांगश पुढे शरणागती शिवाय पर्याय उरला
नाही . अशा तर्हेने अनपेक्षित व त्वरित हालचाली करून [ गनिमी काव्याने ]
बाजीरावांनी , बांगशला पराभूत केले .
अशा – धाडसी , कल्पकता दाखवून आणि गुप्त व चपळ हालचाली करूनच दोघांनीही उदंड यश मिळवले
.
ब – शिवाजी महाराजांची
आग्रा भेट ( मार्च ते ऑगस्ट १६६६ ) आणि बाजीरावांची
दिल्लीवर धडक ( मार्च १७३७ ) - ह्या दोन्ही घटना मराठी राजवटीच्या
इतिहासात प्रसिद्ध आहेत . दोघांनी ही उत्तरेत – आग्रा ( शिवाजी महाराज ) , दिल्ली (
बाजीराव ) प्रवास केला , असे असले तरी इतिहासाच्या अभ्यासकाला
काही प्रश्नांची समाधान कारक सुसंगती आणि
उत्तरे – ह्या दोन्ही घटनांच्या बाबतीत मिळत नाहीत . अनेक इतिहासकारांनी ह्या दोन्ही घटनांच्या मागील १ ] हेतु
व २ ] त्यातून काय सध्या झाले -
ह्या बाबतीत अभिप्राय आणि मते व्यक्त केली आहेत . कदाचित भविष्यात काही अप्रसिद्ध
कागदपत्रे प्रकाशात येऊन , यावर नीट प्रकाश पडू शकेल . परंतू सध्या तरी ह्या दोन्ही थोर व्यक्तींच्या उत्तरेतील ( शिवाजी महाराज – १६६६ - आग्रा आणि
बाजीराव – दिल्ली- १७३७ ) भेटीनच्या मागील
हेतू आणि साध्य ह्या बद्दल बरीच मतांतरे आहेत .
क – कर्तबगार माणसे तयार
करणे
– ज्याला राष्ट्र उभारणी आणि विस्तार करायचा असेल , त्याला साधन सामुग्री
पेक्षाही - कर्तबगार , विश्वासू आणि
जीव देणारी माणसे तयार करावीच लागतात . ती माणसे मग आपल्या पेक्षा वयाने लहान वा
मोठी असोत , कोणत्याही धर्माची वा जातीची असोत . त्यांना हुडकून
किंवा हेरून , त्यांची पारख करून ,
तयार करून योग्य ठिकाणी , योग्य तर्हेने वापरुन , आपला उदात्त कार्यभाग साधावा लागतो . एकटा माणूस – मग ते शिवाजी महाराज
असोत किंवा बाजीराव असोत - स्वता: च्या
पराक्रमावर , शौर्यावर वा धाडसावर काय साध्य करू शकले असते , हा मतभेदाचा विषय आहे . परंतु कर्तबगार माणसे ,
तयार करून , वापरणे हा , अशा
महत्वाच्या कार्या मध्ये अती आवशक आहे , यावर दुमत असणार नाही .
या बाबतीत , शिवाजी
महाराज आणि बाजीराव या दोघान मध्ये फार साम्य आहे . शिवाजी महाराजान बरोबर शहाजि
राजे यांनी बरीच कर्तबगार माणसे- दादोजी कोंडदेव , कानहोजी
जेधे , सोनोपंत डबीर , इ जी त्यांच्या
पेक्षा वयाने बरीच मोठी होती , अशी दिली .त्यांचा तर
महाराजांनी उत्तम तर्हेने उपयोग केलाच . परंतु , आपल्या
वयाची अनेक माणसे तयार करून , त्यांना योग्य कामगिर्या सांगून राष्ट्र उभारणी केली .तानाजी मालुसरे , नेतोजी पालकर ,बाजी पासलकर [ वयाने महाराजांचे
आजोबा शोभत होते ] ,
कावजी मल्हार , येसजी कंक , सूर्याजी काकडे , त्रिंबक सोनदेव [
सोनोपंत डबीर यांचा मुलगा ] , बाजी जेधे [ कानहोजी जेद्धे
यांचा मुलगा ] इ . असंख्य अशी विश्वासू व जीवाला जीव देणारी माणसे मिळवली , तयार केली , वापर केला ,
त्यांचा आदर , सन्मान केला . अशाच माणसानं मुळे स्वराज्य उभे
राहिले . अशा माणसानं मुळेच कसोटीच्या वेळीस – आग्र्याची कैद
[ ५ ते ६ महीने ] ,
किंवा दक्षिण दिग्विजय असोत [ पावणे दोन वर्षे ] , जेंव्हा
महाराज स्वराज्या बाहेर होते , तेंव्हा स्वराज्यात काहीही फरक पडला नाही .
बाजीरावच्या अंगी सुध्धा
अशीच माणसे हेरण्याची , तयार करून वापरण्याची कला होती . पेशवाईची वस्त्रे मिळाली [ १७२० ] तेव्हा ते फक्त २० वर्षांचे होते . त्या वेळेस राजाराम
/ तारा राणी च्या कारकीर्दीतील – खांडेराव
दाभाडे , रघुजी भोसले ,
कान्होजी आंग्रे अशी जुनी जाणती माणसे
कार्यरत होती . त्यांचे सहकार्य बाजीरवाना
फारसे मिळाले नाही . उलट काही वेळेस विरोधच झाला . अशा
परिस्थितीत बाजीरावांना पहिली ७-८ वर्षे आपली माणसे तयार करण्यात घालवावी लागली . मल्हारराव
होळकर , रणोजी शिंदे , उदाजी पवार , पिलाजी जाधव , मल्हार दादाजी बर्वे , गोविंदपंत बुंदेले , विंचुरकर ,बाजी भीमराव रेटरेकर , महादेव भट हिंगणे , अंताजी माणकेश्वर गंधे , अशी असंख्य माणसे तयार केली व उत्तरेत , मराठी
राजवट दृढमुल केली . पुढे शिंदे [ ग्वाल्हेर ] , होळकर [ इंदूर ] , पवार [ धार ] , गायकवाड [ गुजरात ] अशी घराणी तयार होऊन उत्तर भारतात व गुजरात
मध्ये मराठी राजवट १९ व्या शतका पर्यन्त कायम राहिली .[ महादजि शिंदे यांनी तर माधवराव पेशव्यां बरोबर , पानिपत च्या पराभवा नंतर [ १७६१ ] नंतर लगेचच उत्तरेत मराठी राजवटीचा जम १७७०
पर्यन्त बसवला .पुढे महादजि शिंदे , नाना फडणवीस इ मुळे ,१०- १२ वर्षे , दिल्लीचे राजकारण, पुण्यातून चालत असे .]
ड – इतर बाबतीतली साम्यता – इतर बाबतीतही , दोघं
मध्ये विलक्षण साम्य नजरेस येते . ऊ . दोघांनीही प्रत्यक्ष बर्याच लढाईत भाग
घेतला व लढले सुध्धा . शिवाजी महाराजांनी २२३ पैकी ६२ लढायत स्वता: प्रत्यक्ष भाग घेतला. प्रतापगड [
अफझलखान ] , शाहीस्तेखान [ लाल महल ] ,
करतलब खान [ उंबर खिंड ] , कंचन बारी [ सुरतेची दुसरी लूट ] , मुधोळ [ घोरपडे ] , खवास खान [ कुडाळ ] इ .
बाजीरावांनी सुध्धा महत्वाच्या
सर्व लढायत भाग घेतला – पालखेड व भोपाळ [
निजाम ] , दिल्ली , डभई [ दाभाडे ] , जंजिरा
[ सिद्दी ] , दक्षिणेतील – दोन मोहिमा [ चित्रदुर्ग , श्रीरंगपट्टणम ] , बुंडदेलखंड [ जैतपुर ] इ .
दोघांनीही तोफखान्याचा , हत्ती , उंट
इत्यादींचा वापर केला नाही . अशा गोष्टीन मुळे सैन्याच्या जलद हालचाली होऊ शकत
नाहीत . त्यांची भिस्त तर चपळ , वेगवान हालचाली
करण्यावरच होती .
दोघांचीही राहणी - रणांगणावर व बाहेर - साधीच
होती . स्वता: शिवाजी महाराजांना कोणतेही व्यसन नव्हते . मुक्कामास असताना किंवा
मोहिमे वर असतांना , त्यांची राहणी साधी असायची . मोहिमे वर असताना ,
सैन्या बरोबर कोणत्याही प्रकारच्या स्त्रिया नेण्यास मज्जाव होता . आणि ह्याची
अम्मल बजावणी फार कडक तर्हेने केली जाई .
अर्थात जलद , गुप्त आणि अनपेक्षित हालचाली करताना , अशा माणसांचा / स्त्रियांचा फार
मोठा अडथळा येत असे .
बाजीरावांच्या बाबतीत
सुद्धा हीच गोष्ट होती . त्यांच्या पत्नी – काशीबाई – एक दोन मोहिमे च्या वेळेस
बरोबर होत्या . परंतु असे अपवाद वगळता , त्यांनी कधी मोहिमेवर इतर स्त्रिया
व अतिरिक्त माणसे फारशी नेली नाहीत .
शेवटी , एका
महत्वाच्या बाबतीत शिवाजी महाराज आणि थोरले बाजीराव यांच्यात साम्य आहे – त्यांच्या मृत्यू . दोघांचाही मृत्यू हा
तसा अनपेक्षित व विषण्ण अवस्थेत झाला . दोघांनाही कौटुंबिक बाबतीत प्रचंड मनस्ताप
व यातना सहन कराव्या लागल्या . डिसेंबर १६७८ मध्ये संभाजी महाराज , गुपचुप , अचानक , सज्जनगडावरून पत्नी व कन्येसह , मोगली
सरदार दिलेरखानास सामील होण्या करिता निघून गेले . महाराजांवर हा वज्राघात होता .
ही बातमी कळल्यावर , ताबडतोब महाराजांनी फौजांना हुकूम देऊन , संभाजी राजेंना गाठून परत आणण्याचा प्रयत्न केला . परंतु तो पर्यंत
संभाजी महाराज मोगलांच्या छावणीत पोहोचले होते . महाराजांचे प्रयत्न चालू होते .
सुदैवाने २० नोव्हेबर १६७९ ला वेळेवर , संभाजी महाराज , येसूबाई आणि कन्ये सह रात्रीच्या रात्री , गुपचुप
मोगली छावणीतून पळून गेले . [ त्यांना , औरंगजेबाने दिलेरखनाला
दिलेला गुप्त निरोप “ संभाजीला कैद करून दिल्ली ला पाठवा “ ,
आधीच कळला होता ] मोगली छावणीतून ते विजापूरला गेले व मग महाराजांकडून न्यायला
आलेल्या मंडळीस् ३० नोव्हेंबर १६७९
ला सामील होऊन ,
शेवटी ४ डिसेंबर १६७९ ला पन्हाळ्यावर महाराजांना भेटले . त्यावेळेस तरी , स्वराज्या वरील व
महाराजांच्या कुटुंबावर आलेले घोर संकट निवले होते . परंतु महाराजांच्या मनावर खोल
आघात झाला होता . तो त्यांना फारच लागला होता , हे
त्यांच्या ३ एप्रिल १६८० रोजी रायगडा वर झालेल्या
मृत्यू मुळे अधोरेखित झाला . [ जरी , महाराज आजारी पडून
वारले असले तरी , त्यांच्या मनावर झालेल्या खोल आघाताचा
परिणाम त्यांच्या आजारपणावर झाला असणार हे निश्चित ]
बाजीरावांची गोष्ट थोडी
वेगळी होती . मस्तानी वरील प्रेमा मुळे त्यांना जवळ जवळ दहा वर्षे फार मोठा
मनस्ताप झाला होता . चिमाजी , त्यांच्या मातोश्री ,
शाहू महाराज , व सर्व समाजच त्यांच्या विरुद्ध गेला होता .
त्यांना मस्तानी पासून दूर करण्याचे सर्व प्रयत्न करून झाले होते . परंतु त्यात यश
येत नव्हते . १७३९ मध्ये हे प्रकरण फारच निकरावर आले होते . आशा विषण्ण अवस्थेतही
त्यांनी नसीजंगाविरुद्ध ( निजाम उल
मुल्कचा मुलगा )ची मोहीम हाती घेऊन यशस्वी केली . त्या मोहिमे वरुन परत येत असताना
, नर्मदेच्या काठी रावेरखेडी येथे ,
अल्पशा आजारातच - २८ एप्रिल १७४० ला मरण पावले . [ बाजीरांच्या मृत्यू विषयी
सुद्धा शिवाजी महाराजानच्या मृत्यू सारखा निष्कर्ष काढल्यास चूक ठरणार नाही .
सततची प्रचंड शारीरिक दगदग , परिश्राम व चिंता , यांच्या जोडीला मृत्यूच्या आधी झालेल्या घोर मनस्तापामुळेच दोघांची
प्रकृती खचली असण्याची शक्यता नाकारता येत नाही . अशा अवस्थेतच दोघांवर काळाने झडप
घातली . दोघांचाही असा मृत्यू आपल्या मनास फार चटका लाऊन जातो ]
३ – दोघांमधील फरक
३.१ कर्मभूमि – शिवाजी महाराज यांचा मुख्य
भर , राज्य विस्तार द्क्षिणेतच करायचा यावर होता . एक बागलण [ नाशिक च्या आसपास चा प्रदेश हा मोगलांचा सुभा
होता ] सोडून बाकी त्यांचे सर्व सुभे
दक्षिणेतील आदिलशाहीचे लचके तोडून बनले होते . उत्तरेत मोगल फारच प्रबळ होते .
त्यामानाने दक्षिणेतील आदिलशाही कमकुवत होती . या उलट बाजीरावांची कर्मभूमि
उत्तरेतच होती – माळवा , बुंडेलखंड ,
आणि गुजरात .[ कर्नाटकात बाजीरावांच्या फक्त दोन स्वार्या झाल्या – चित्रदुर्ग
आणि श्रीरंगपट्टणम . बाकी सर्व स्वार्या
उत्तरेत झाल्या .]
नर्मदोत्तर माळव्या बद्दल रियासतकार
सरदेसाई यांच्या शब्दात सांगायचे तर – “ हिंदुस्तानच्या सार्वभौम सत्तेचा पाया , माळवा
प्रांत होय , ही गोष्ट प्राचीन काळापासून अनेक सत्ताधीशांनी
सिध्ध मानलेली उघड दिसते . त्या वेळेस हिंद राजकारणाचे केंद्र माळव्यात होते .म्हणूनच
माळवा ताब्यात ठेवण्याची बादशाह , सययद बंधु , जयसिंह , निजाम इ तत्कालीन
सामर्थ्यवानांची चाललेली धडपड बाजीरावांना
पटली होती “ . ह्याच्या जोडीस दुसरे ही एक कारण असण्याची शक्यता आहे . शाहू
महाराजांनी सनद मिळालेल्या ६ सुभयांची वाटणी आपल्या अष्ट प्रधान मंडळात / सरदारांत
केली होती .बाजीरावांच्या वाट्याला – बागलण व वर्हाड चा प्रदेश होता . माळवा हा वर्हाडला
लागून आहे . त्यामुळे बाजीरावांनी , फौजा फिरवता फिरवता , माळव्यात प्रवेश केला असावा . ( खरतर ह्याची सुरवात , ताराराणी [ १७०० – १७०७ ] पासूनच झाली होती . )
३.२ आर्थिक चण चण – शिवाजी महाराजांना –
सुरवातीच्या काळात , [ जवळ जवळ १६७० – ७२ पर्यन्त राज्य उभारणी करिता - सैन्य उभारणे , किल्ले बांधणे , अरमार स्थापन करणे , मोहिमा काढणे , आणि महत्वाचे म्हणजे परकीय
आक्रमाणांमुळे स्वराज्याचे/ जनतेचे नुकसान काढण्या साठी ] जी आर्थिक गरज होती ,ती केवळ मोगल / आदिलशाहीच्या सधन प्रदेशावर स्वार्या करून भागवावी लागली
. त्या मुळेच त्यांना , सूरत , कारंजा , बेदनूर इ. शहरे किंवा आसपासचा मुलुख लुटावा लागला . इतर उत्पान्नंचा
मार्ग तयार होईपर्यंत , त्यांना लूटीवर जास्त भर द्यावा लागत
होता [ शिवाजी महाराजांनी , फार नंतर मोगली / आदिलशाही
मुलखातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्यास सुरवात केली .. ]
परंतु त्यानंतर मात्र
त्यांनी स्वराज्याची आर्थिक घडी उत्तम रित्या बसवली . त्यांच्या मृत्यू नंतर , संभाजी
महाराजांनी स्वता: जेव्हा रायगडावरील खजिन्याची [ जामदारखान्याची ] मोजदात केली
तेव्हाची यादी पहिली की मन थक्क होते . महाराजांनी तो पर्यन्त स्वराज्याचा खजिना
भरून ठेवला होता . [ त्या यादीत असलेल्या काही गोष्टी – ९ कोट रुपयांची सोन्याची
नाणी , ५१ हजार तोळे सोने , २००
तोळे माणके , १०००
तोळे मोत्ये , ५०० तोळे हीरे .... इ . ही यादी बरीच मोठी आहे
] थोडक्यात स्वराज्याची आर्थिक परिस्थिति १६८० पर्यन्त फार चांगली होती .
शिवाजी महाराज व बाजीराव [
शाहू महाराज ] यांच्या अर्थार्जनाच्या
संदर्भात एक महत्वाचा फरक लक्षात येतो. शिवाजी महाराजांना शून्यातून स्वराज्य उभे
करायचे असल्याने लागणार्या पैशाकरिता , किंवा मोगली / आदिलशाही
स्वार्यांनी झालेली हानी भरून काढण्यास [
मिर्झा राजे जयसिंग वगैरे ] – मोगल / आदिलशाही तील सधन प्रदेश लुटण्या शिवाय , निदान सुरवातीस तरी , पर्याय नव्हता .
परंतु शाहू महाराजांकडे
दक्षिणेतील ६ सुभयांची चौथाई व सरदेशमुखी असल्याने त्यांना , सनदशीर
मार्गाने , सनदांची अम्मलबजावणी करून पैसा उभाकरण्याचा मार्ग
मोकळा होता .[ त्यामुळे फक्त एकेकट्या शहरांची लूट करण्याची गरज त्यांना भासली
नाही . बाजीराव / चिमजी अप्पा यांनी इतर जागीरदार / छोट्या राजवटीन कडून खंडणी
म्हणून पैसे घेऊन स्वारीचा खर्च भागवला . ] परंतु चौथ / सरदेशमुखी हा जो मार्ग बाजीराव /
चिमाजी अप्पा यांनी अमलात आणून सुरवात केली , तेच करायला निजाम
व इतर मोगली सरदार विरोध करत होते . त्यामुळे चौथाईची वसूली करायला मोहिमा /
स्वार्या करणे हा एकाच उपाय होता . अशा मोहिमांकरता पैसा हा सावकारांकडून कर्ज
घेऊनच भागवावा लागे . त्यामुळे पैशा करता स्वार्या व स्वार्यान करता पैसा आशा चक्रातून पेशवेच काय , पण पूर्ण मराठी रियासतच जात होती .( १७०७ नंतर उदयास आलेल्या सावकार
घाराण्यांवर काही ठिकाणी स्वतंत्रपणे लिहिले गेले आहे .काही तर पेशव्यांचे
नातेवाईक होते )
किंबहुना १७०७ नंतर मराठी
राजवट , ही अर्थारजनाकरिता विस्तारत गेली असे म्हटल्यास अतोशयोक्ति होणार नाही .
[ पहा – मराठी राजवट – भाग ४ – शाहू व
बाळाजी बाजीराव – १७४०-१७६१ – ले. रियासतकार सरदेसाई ] यात “ मराठेशाहीचा
उत्कर्षापकर्ष – आर्थिक बाजू “ या लेखाच्या शेवटी म्हटले आहे की ... “ या दृष्टीने
मराठी राज्याचा फैलाव व नाश हे दोन्ही प्रकार केवळ द्र्व्यार्जनामुळे उद्भवले असे
दिसून येते “
( मला असे वाटते की “ आर्थिक
बाजू “ ही केंद्र स्थानी ठेऊन – मराठी , मुघल आणि इंग्रज राजवटीन
विषयी अजून मोठ्या प्रमाणावर संशोधन व्हायला पाहिजे . सध्या ही बाजू फारच
दुर्लक्षित राहिली आहे. )
+++++++++++++++++++++++
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा