Menu

 

मराठी राजवटीच्या र्हासाची कारणे - भाग – ३

 

ब ३ ) बाह्य कारण – १७५७ नंतर वाढत गेलेले , इंग्रजांचे ( ईस्ट इंडिया कंपनीचे ) – राजकीय , लशकरी आणि आर्थिक सामर्थ्य    

न. चि.  केळकर यांनी त्यांच्या –“ मराठे व इंग्रज “ ह्या पुस्तकात प्रकरण पहिले - - “ मराठे व इंग्रज यांचा समकालीन उत्कर्षापकर्ष “  -  यात सुरवातीलाच , मराठे व इंग्रज यांचे संबंध कसे बदलत गेले ह्याचा आढावा घेतला आहे . त्यांनी एकंदर चार कालखंड कल्पून , त्यात ते कसे कसे बदलत गेले हे दाखवले आहे .                                                      

१ -- १६४८ ते १७६१ – एकमेकांशी परिचय –--------------------------------------        ११३ वर्षे ----------------- - [ शिवाजी महाराजांचा  , औरंगजेबा विरुद्धच्या स्वातंत्र्य  लढ्याचा ,शाहू महाराज , थोरले बाजीराव , नाना साहेबांच्या पेशवाईचा कालखंड ]

  २ -- १७६१ ते १७८६ – इंग्रजांनी  आत्मविश्वासाने मराठ्यान बरोबर आपली शक्ति आजमावण्याचा प्रयत्न केला , परंतु तो फासला –---------------------------------------------------  २५ वर्षे ----------------  - [ माधव राव पेशवे , राघोबादादा , बारभाई , महाद्जि शिंदे , पहिले इंग्रज - मराठा युद्ध इ  कालखंड . मराठ्यांचा १७६१ चा पानिपत पराभव, १७६१ मध्येच इंग्रजांनी  दिल्लीच्या बादशहाचा पाटण्या जवळ आणि फ्रेंचांचा पोंडेचेरीला केलेला पराभव ]

 ३ -- १७८६ ते १८०० – इंग्रज मराठ्यांशी बरोबरीच्या नात्याने वागू लागले --- १४ वर्षे -------------------- [ सवाई माधव राव , नाना फडणीस , महाद्जि शिंदे , दूसरा बाजीराव – कालखंड ]

 ४ -- १८०० ते १८१८ – मराठे कमकुवत होऊन इंग्रजांचा पक्ष वरचढ ठरला झाला व अखेर मराठ्यांचा पराभव होऊन इंग्रजांचे वर्चस्व सर्व मराठ्यांवर प्रस्थापित झाले  ] ------------– १८ वर्षे -------------------- [ दुसर्‍या बाजीरावचा कालखंड , दुसरे व तिसरे मराठा – इंग्रज युद्ध ]

१७६१ नंतर -- १८०० पर्यंत , फक्त ५९ वर्षात इंग्रज हे ,मराठ्यान एव्हडे तुल्यबळ झाले होते . १८०० नंतर मात्र मराठे कमकुवत झाले , त्यामुळेच इंग्रजांचा विजय झाला . थोडक्यात मराठ्यांच्या कमकुवत होण्यानेच शेवटी , मराठी राजवटीचा  १८१८ मध्ये र्हास झाला . अर्थात त्याचा फायदा इंग्रज घेऊ शकले , कारण तो पर्यन्त तुल्यबळ असे इंग्रज फक्त  उरले  होते . इतर कोणतीही एतदेशीय राजवट, तो पर्यन्त धड शिल्लक राहिली नव्हती .   

मोगलांची राजकीय सत्ता उभ्या हिंदुस्थानात १७०७ नंतर कमकुवत होतगेली , व त्यामुळे निर्माण होत असलेली पोकळी मराठी राजवटीच्या उदयामुळे भरून निघाली . त्याच प्रमाणे मराठी राजवट  कमकुवत होत असताना झालेली पोकळी इंग्रजांनी – मराठी राजवटीचा  [ दुसर्‍या बाजीराव पेशव्याचा ] १८१८ मध्ये पराभव करून सरते शेवटी -  भरून काढली . खालील आकृती वरून ही बाब स्पष्ट पणे दाखवता येईल . थोडक्यात हिंदुस्तानातील तयार झालेली राजकीय , प्रशासकीय व लष्करी पोकळी ही , प्रथम मराठ्यांनी , व नंतर इंग्रजांनी भरून काढली !

 

आकृती – क्र – २  मोगली , मराठी व इंग्रजी रियासतींचा – उदयास्त [ आकार आणि वर्षे, फक्त स्थिति दर्शवण्या करिता. ]


 

 मराठ्यांनी देशी मोगल सत्तेच्या कमकूवतपणाचा फायदा घेतला व आपला उदय करून घेतला , परंतू त्यांचा पराभव केला नाही . उलट त्यांचे रक्षण करायला पानिपत पर्यन्त धावले व त्यात आपले जबरदस्त नुकसान मात्र करून घेतले . पण इंग्रजां सारख्या परकीय सत्तेने [ ईस्ट इंडिया कंपनी सरकार ] मराठ्यांच्या एत्त्देशीय प्रबळ सत्तेचा पराभव करून दाखवला आणि मराठी राजवट  घश्यात घातली !  हे घडायला , मराठी रियासति चे कमकुवत होणे , हेच कारण असू शकत नाही . इंग्रजांची अंगभूत - आर्थिक / प्रशासकीय / लष्करी  शक्ति , त्यांचे भले बुरे राजकारण इ गोष्टींचेही त्यात फार मोठे योगदान आहे. किंबहूना , इंग्रजांनी ह्या शक्तींच्या आणि सरस राजकारणाच्याच जोरावर उभ्या भारतावर सत्ता स्थापन केली, हे मान्य करायला पाहिजे .

इंग्रज विरुद्ध भारतातील स्थानिक व यूरोपियन सत्ता

१७०७ मधील औरंगजेबाच्या मृत्यू नंतर , बंगाल , अवध , निजाम , मराठे , जाट , रोहिले स्वतंत्र होत होते . १७४० च्या नादीर शहाच्या दिल्लीवरील स्वारी नंतर , मोगली सत्ता फारच कमजोर झाली होती . त्यामुळे बंगाल ( १७५७ – प्लासी आणि १७६४ – बक्सर ) पासून सुरवात करून , अवध , निजाम , आर्कटचा नवाब -  आशा एकेकट्या आणि कमजोर असलेल्या राजवटीना – पराभव वा राजकारण करून इंग्रजांनी ( कंपनीने ) एकतर आपले अंकित केले , किंवा ताब्यात ठेवले . त्यामुळे टिपूच्या १७९९ मधील निर्णायक पराभवा नंतर , मराठी राजवट  हीच फक्त , त्यांना भारतात रोखू शकत होती .    

भारतात १८व्या शतकाच्या मध्यापासून इंग्रज , भारतातील – स्थानिक आणि यूरोपियन ( प्रामुख्याने फ्रेंच ) आशा दोन्ही सत्तांशी लढत होते . परकीयान मध्ये , इंग्रजांना खरा धोका फ्रेंचान कडून होता . त्यांनी फ्रेंचांचा १७६३ पर्यंतच्या सप्त वार्षिक युद्धात पराभव करून भारतापुरते पूर्णपणे निष्प्रभ केले  होते. ( १७९९ मध्ये ग.ज. वेलस्लीने टिपू विरुद्ध घेतलेल्या आक्रमक मोहिमे मागे फ्रेंच धोका हे प्रमुख कारण होते . नेपोलियन १७९८ मध्ये इजिप्तवर स्वारी करून , नंतर हिंदुस्थानात प्रवेश करायच्या विचारात होता . टिपू बरोबर तसे बोलणे चालले होते )  .  राहीले – डच आणि पोर्तुगीज, जे भारतात फारच छोटे होते व मर्यादित भागात प्रभाव असलेले होते . त्यांच्यापासून इंग्रजांना  धोका नव्हता .  १७७० पर्यन्त इंग्रजांना भारतात , यूरोपियन प्रतिस्पर्धी उरला नाही – उरले फक्त स्थानिक सत्ताधीश .त्यांना धोका होता – मराठी राजवट  ( पुणे ) आणि हैदर / टिपू ( मैसूर ) ह्यांचा .   

भारतात आपले खरे प्रतिस्पर्धी हे इंग्रज आहेत आणि आपली गाठ शेवटी त्यांच्याशीच पडणार आहे , हे माधवराव पेशवे  , नाना फडणीस व महादजि शिंदे यांनी १७७१/२ च्या सुमारासच ओळखले होते . परंतु मराठी राजवटीच्या अंतर्गत परिस्थिला अत्यंत गंभीर वळण , १७७३ मधील नारायणराव पेशव्याच्या खुना मुळे लागले . पुढे बारभाईचे कारस्थान यशस्वी होऊन , राघोबादादास पुण्याहून पलायन करून इंग्रजांच्या आश्रयास जावे लागले . अशी अंतर्गत स्थिति असताना , इंग्रजांची परिस्थिति मात्र सुधारात होती . १७७३ मध्ये इंग्लंड मध्ये ईस्ट इंडिया कंपनीवरचा नियंत्रणाचा कायदा झाला . त्या द्वारे , भारतातील मुंबई , मद्रास व कलकत्ता ह्या कंपनीच्या ठाण्यात व पर्यायाने भारतात सुसूत्रता  येण्या करता गव्हर्नर जनरलची नियुक्ती करण्यात आली , आणि त्याच्या अधिपत्त्या खाली तिन्ही ठिकाणचे गव्हर्नर काम करतील आणि हा गव्हर्नर जनरल कलकत्त्याला राहून सगळी सूत्रे हलवेल असे ठरले . ( तो पर्यन्त तिन्ही ठिकाणचे गव्हर्नर स्वतंत्र वागत होते व त्यात नीट सुसूत्रता नव्हती . ) हा बदल फार दूरगामी परिणाम करणारा होता हे पुढील घटनान वरून सिद्ध झाले . नवीन व्यवस्थेमध्ये इंग्रज एकीने काम करायला लागले , पण त्याच वेळेस मराठी रियासतीत खुद्द पेशव्यांच्या घरातच दुहीचा शिरकाव होऊन त्याने उत्तरोत्तर गंभीर स्वरूप धारण केले . १७७३ पासून - एकाबाजूला इंग्रजांकडे एकीने काम करायला सुरवात  होत होती तर , दुसरीकडे – पेशवाईला दुहीने ग्रासल जात होत , हा विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे ! इथूनच पुढे दोन्ही रियासतींचा प्रवास दुही आणि एकी , खीळ खिळी होणे आणि मजबूत होणे – असा विरुद्ध दिशेने सुरू झाला . अशातच १७९४ – १८०० मध्ये मराठी रियासतीतील – महाद्जि शिंदे (१७९४) , सवाई माधव राव (१७९५) , नाना फडणीस(१८००) आशा कर्तुत्ववान माणसांच्या एकामागोमाग झालेल्या मृत्यू मुळे आणि दूसरा बाजीराव पेशवा झाल्याने – अंतर्गत परिस्थिति आणखी बिघडली . ती आणखी खीळ खिळी व्हायला सुरवात झाली .  आणि बरोबर त्याच वेळेस परत एकदा ,  इंग्रजांची स्थिति  , वेलस्लि १७९८ – मध्ये गव्हर्नर जनरल होण्यामुळे फार बदलली . त्याने , त्याच्या आधीच्या - गव्हर्नर जनरल जॉन शोर हयाचे , शांततेचे व विरोधकांच्या कारभारात फारशी ढवळा ढवळ न करण्याचे धोरण सोडून , फार आक्रमक धोरण स्वीकारले . थोडक्यात , १७७३ आणि २५ वर्षांनी परत एकदा १७९८ मध्ये – मराठी आणि इंग्रजी रियासतीतील अंतर्गत परिस्थितीने असे विरुद्ध वळाण घेतले !

वेलस्लिने आल्या आल्या , १७९९ मध्ये टिपूचा निर्णायक पराभव करून त्याला संपवले . त्यामुळे , इंग्रजांपुढे फक्त आणि फक्त मराठी राजवटच उरली , जी त्यांना भारतात थोपवू शकली असती .   अशा परिस्थितीत , १८०२च्या दूसरा बाजीराव – इंग्रज यांच्या वसई करारा नंतर,  जेव्हा एकमेकांची गाठ पडली तेव्हा , अंर्गत दुही / कारस्थानान मुळे , पार खीळ खिळया झालेल्या मराठी रियासतीवर निर्णायक घाव घालून , इंग्रजांनी मराठी रियासतीला १८१८ मध्ये शरण आणले ! अर्थात ह्यात इंग्रजांच्या आक्रमक धोरणाचा ( १७९८ ला वेलस्लि गव्हर्नर जनरल झाल्यावर ) सुद्धा तेव्हडाच हात आहे . ह्या विरुद्ध दिशेच्या प्रवासा बरोबरच एका तेव्हड्याच महत्वाच्या बाबीचा विचार करावा लागतो . मराठी व इंग्रज राजवटींची असलेली अतिशय भिन्न रचना ! एकंदरच अनेक  बाबतीत , इंग्रजी राजवट , मराठी रियासति पेक्षा फारच भिन्न आणि एक पाऊल पुढे होती , हे लक्षात येते

दोन भिन्न पद्धतींचा सामना – मराठी राजवट  आणि कंपनी ह्या दोन अतिशय भिन्न प्रकारच्या पद्धतींचा सामना झाला . ज्यात एका बाजूला – कंपनी व्यापारा करता स्थापन  होऊन सुद्धा सैन्य बाळगणारी व दुसर्‍या बाजूला मराठी राजवट, जी राज्यकर्ती होती . एकीची बांधिलकी त्यांच्या इंग्लंड मधील भागधारक , जनता व राजकीय व्यवस्थेशी , तर दुसरीची स्थानिक जनतेशी .  एक परकीय तर दुसरी स्थानिक . एक संस्थात्मक आणि गुणवत्ते वर आधारलेली व्यवस्थेच्या होती . तिच्या विरूद्ध  बाजूस – मध्य युगीन , व्यक्ति केन्द्रित व वंशपरंपरेने चालत असलेली राज्य व्यवस्था [ मराठी राजवट  ] होती .एकात  – मुंबई / मद्रास / कलकत्ता येथील ठाण्यांचे संगनमताने कार्ये व्हायची , तर दुसर्‍या बाजूला आपापसात भांडणार्‍या सदारांची ( शिंदे , होळकर , भोसले , पटवर्धन इ ) - विस्कळीत  व धेडगुजरी एकी . शिवाय ,  कंपनी ज्या समाजातून आलेली , तो समाज , - शस्त्र आणि शास्त्र , गुणधर्म [ चौकसपणा , ज्ञान पिपासा इ ] असा होता . त्याच्याच जोडीला , भरपूर आर्थिक  , राजकीय पाठबळ आणि सरस राजकारणात निपूण असलेल्या व्यक्तींशी , मराठी राजवटीचा  सामना होता . ह्या जवळ पास प्रत्येक बाबतीत आपला समाज , राज्यव्यवस्था [ मराठी राजवट  ] मागे किंवा कमजोर होती . खर तर स्थानिक राजवटीला – स्थानीयतेचा फायदा मिळाला हवा होता व परकीय कंपनी , जिचे नियंत्रण हजारो मैल दूर असलेल्या भूमीवरून केल जात होत , तिला तोटा व्हायला हवा होता , काम / राज्य करतांना फार हाल व्हयला हवे होते ! पण , शेवटी झाले उलटेच ! कंपनीने, मराठी राजवटी सकट सर्व स्थानिक सत्ताधीशांचा पराभव करून , उभ्या भारतावर राज्य केले !

अर्थात इथे एक गोष्ट मान्य करायलाच पाहिजे की , एतात्देशीय सत्ताधीशांना – त्यांचा इतिहास , परंपरा , हितसंबंध हे लक्षात घेऊनच पावले टाकावी लागत होती उ – मराठी राजवटीचे निजामा बाबतीतले धोरण , किंवा उत्तरेकडे झालेल्या प्रादेशिक विस्ताराचे धोरण , ह्याच्या मागे पूर्वेतीहास आणि पूर्वपिठीका होती . तसे कंपनीच्या बाबतीत काही नव्हते . त्यांची भारतातली “ पाटी कोरी “ होती ! भारता मध्ये त्यांना कसलाही “ गतेतिहास “ किंवा पूर्वपीठिका नव्हती . शिवाय हे पडले व्यापारी ! त्यांच्या अंतस्थ हेतूनविषयी ( व्यापारातून सत्ता स्थापन करण्या विषयी ) स्थानिक सत्ताधीशांना , सुरवाती पासून शंका येणे जवळपास अशक्य होते . त्यांच्या मुळे स्थानिक साताधीशांना सुद्धा आर्थिक व इतर फायदे होत होते . हे सर्व त्यांच्या पथ्यावर पडले , कारण कसलं ही “ ओझं “ ते घेऊन वावरत नव्हते . सुरवातीच्या काळात व्यापाराच्या नावाखाली ते काहीही आणि कसेही  वागू शकत होते . आणि तेच त्यांनी केलं ! कसलाही विधिनिषेध वा फारशी बंधने न मानता , स्वता:चा स्वार्थ साधला आणि राज्य विस्तार केला !         

    मराठ्यांचा सामना जेव्हा जेव्हा एतदेशीय राजवटीन [ मोगल , हैदर , टिपू , निजाम ] बरोबर झाला , तेव्हा तेव्हा मराठी राजवट  , बहुतांश वेळा वरचढ ठरून ,  विरोधकांचा पराभव झाला . सर्व एतदेशीय राजवटी , सामाजिक, राजकीय ,प्रशासकीय , लशकरी आणि राज्य व्यवस्थे बाबतीत जवळपास सारख्याच होत्या . त्यामुळे हे सामने , दोन सारख्या पार्श्वभूमि असलेल्या राजवटीन मध्ये असायचे . त्यामुळे मराठी राजवटीची सरशी व्हायची .

 परंतु जेव्हा इंग्रजी राजवटीशी सामना होत गेला तेव्हा हळू हळू बाजी मराठी राजवटीच्या हातून निसटत गेली . इंग्रज परकीय भूमी वरून आले होते . त्या भूमी विषयी , समजाविषयी वा इतर गोष्टीं विषयी फार कमी माहिती मराठी राजवट  धरून सर्व एतदेशीय कडे होती . दुसरे म्हणजे , इंग्रजांची ( कंपनीची )  राज्य पद्धती भारतीय राज्यपद्धतीहून अतिशय भिन्न होती . शिवाय बर्‍याच बाबतीत सरस होती . अशा भिन्न राजवटीशी गाठ पडली तेव्हा ,  मराठीच  काय , इतर कोणत्याही एतदेशीय राजवटीन कडे , त्यांच्या वर मात कशी करायची याचे उत्तर नव्हते . एतदेशीय राजवटीनची एकी आणि प्रभावी व कर्तबगार नेतृत्व हेच त्यांच्या कडे उत्तर होते .

त्यातल्यात्यात मोठी व समर्थ अशी मराठी राजवट च काय ती त्यांना टक्कर देऊ शकत होती .आणि त्यांच्याशी १७७० पर्यन्त सामना झाला नाही हे कंपनीचे नशीब !  १७७५  ते १७८२ पर्यन्त तीन वेळेस इंग्रजांचा पराभव झाला आणि तीनही वेळेस त्यांना मराठी राजवटी बरोबर तह करावे लागले. अडस परभवा नंतर पुरंदर तह – १ मार्च १७७६ ,  वाडगाव परभवा नंतर – वाडगाव तह – १६ जानेवारी १७७९ , परत भोरघाट पराभव – सालबाईचा तह १७ मे १७८२ . आशा रीतीने पहिले मराठा – इंग्रज युद्ध मराठे जिंकले ! तेंव्हा इंग्रजांच्या लक्षात आले की , जो पर्यन्त महाद्जि शिंदे आणि नाना फडणीस आहेत , तो पर्यन्त मराठी राजवटीच्या वाट्याला जाण्यात अर्थ नाही !  .

   परंतु , मराठी राजवट  १७९६ नंतर पार खीळ खिळी झाल्यावर कंपनीला थांबवणारे भारतात कोणीही उरले नाही .

मराठी – इंग्रजी ( ईस्ट इंडिया कंपनी ) राजवट  तुलना  -   मराठी व इंग्रजी ( कंपनी ) यांची तुलना चार महत्वाच्या बाबीं विषयी करावी लागते - उद्दीष्ट आणि धोरण , आर्थिक स्थिति ,  लष्करी स्थिति आणि राजवटीची रचना. ह्याच चार  बाबी कोणत्याही राजवटीच्या कारभारा विषयी आणि परिस्थिति बद्दल कल्पना देतात  .  

अ - आर्थिक सबलता वि दुर्बलता :- ईस्ट इंडिया कंपनी सर्वप्रथम व्यापारी कंपनी होती , जिचा व्यापार चीन, अमेरिका , युरोप इत्यादि सर्व ठिकाणी चालायचा . फक्त “ नफा “ ह्याच्याशीच बांधिलकी असल्याने नीती/अनीति , सनदशीर / गैर सनदशीर , भले बुरे मार्ग इत्यादींचा त्यांनी कधी फारसा विचार केला नाही . उ.  बिहारचा आफू घेऊन , चीनला तो विकून , त्याच्या  बदल्यात चीनी चहा विकून , त्यांनी गडगंज पैसा मिळवला , जो खरा अनैतिक व्यापार होता हे सर्वांना माहीत होते ! तसेच ती परकीय कंपनी असल्यामुळे , त्यांची बांधिलकी इंग्रज राजवट व लोकांशी होती , भारतीय जनतेशी नव्हती . आणि म्हणूनच त्यांनी १७५७ नंतर बंगालची लूट करून , जनतेला कंगाल केले . बंगालचा १७७१/२ चा दुष्काळ , ज्यात लाखो लोक मृत्यूमुखी पडले - हा प्रामुख्याने कंपनीच्या धोरणामुळेच घडला . तशा परिस्थितही कंपनीने शेतसारा कमी न करता , आपले उत्तपन्न वाढवले . इतरही बरेच अत्याचार , जबरदस्ती करून बंगालला लुटले . अशा तर्‍हेने जमा केलेल्या आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर  आणि इंग्रज सरकार व तेथील राजा ह्यांच्या सक्रिय सहाय्या मुळे , मराठी किंवा कोणत्याच एतदेशीय राजवटीन मध्ये कंपनीशी समर्थपणे सामना करून त्यांना जिंकण्याची शक्यताच नव्हती !

अर्थात एक गोष्ट नजरे आड करता येत नाही की इंग्रजांनी ( कंपनीने ) व्यापारातून ( पैसा / नफा यातून )  राज्य स्थापले . परंतू , एतदेशीय राजवटी ह्या राज्यकर्त्या होत्या – व्यापारी कंपन्या नव्हत्या . त्यामुळे ह्या राजवटी स्थानिक जनतेशी बांधिलकी राखून होत्या . त्यांच्या वर काही बंधने होती , कर्तव्ये होती . त्यांना , थोडी फार तरी जनतेची काळजी घ्यावी लागत होती . त्यामुळेच ते कंपनी सारखे जनतेशी वागून राज्य करू शकत नव्हते . राज्यकर्ता हा व्यापारी कंपनी सारखा कधीच वागू शकत नाही , कारण पैसे / नफा कमावणे हा त्यांचा उद्देश होऊ शकतच नाही ! ह्या महत्वाच्या गोष्टी मुळे कंपनीने केलेल्या काही गोष्टींचा उ. नफा कामवायला केलेली मनमानी किंवा अत्याचार , १७७१/२ च्या बंगालच्या दुष्काळा बद्दलची बेफिकरी वगैरे यांचा स्पष्ट उलगडा होतो ! ( जिज्ञासूंनी - शशि थरूर यांचे [ “ Inglorious Empire . What the British did to India “ Scribe Publication – 2017 ] हे पुस्तक जरूर वाचावे . त्यावरून कळून येईल की कंपनीने – राजा आणि प्रजा या दोघांना अक्षरशा: पिळून , आपले उत्पन्न वाढवले / नफा कमावला , जो भारतातील विस्तरा करता वापरला  !  . त्यात खालपासून वरपर्यंत कंपनीच्या कर्मचार्र्‍यांनी देखील भरपूर “ माया जमा केली ) . मराठी सरदार  फक्त तत्कालिक कारणा करता खंडणी घेत असत , किंवा प्रदेश फस्त करीत . त्यांनी कधी प्रजेला भिकेला लावले नाही . परंतू कंपनीने  “ करांच्या “ मध्यमातून  १९० वर्षे भारताचे “ भयानक आर्थिक शोषण “ केले आणि जनतेला भिकेला लावले ! थोडक्यात म्हणजे  “ आर्थिक शोषण “ करून , त्याच पैशा द्वारे आपल्यावर राज्य केले . हाच फरक व्यापारी कंपनी ( ई इं कंपनी ) / परकीय सत्ताधीश ( ब्रिटिश सरकार )  आणि एतत्देशीय राजवटीन मध्ये होता , जो आपल्या लक्षात येत नाही .    

ब – संस्थात्मक रचना  वि वंश परंपरागत , व्यक्ति केन्द्रित रचना : -

ईस्ट इंडिया कंपनी – तिच्या  भाग धारकांना [ शेअर होल्डर्सना  ] आणि इंग्लंडच्या राजाला / जनतेला जबाबदार होती .संस्थात्मक रचना असल्यामुळे  योग्य माणसे योग्य ठिकाणी निवडली जाण्याची बरीच शक्यता असे . जर अशा माणसांनी अयोग्य , बेकायदेशीर कारभार केला तर त्याची चौकशी करून त्यावर कारवाई करणे शक्य होत असे .( रोबार्ट क्लाइव , वोरन हेस्टिंग यांच्या झालेल्या चौकशी – महाभियोगा मुळे - सिध्ध होते  ) . याची दोन कारणे होती १ ] कायद्याचे राज्य होते २ ] नेमणूका ह्या वंश परंपरागत नव्हत्या [ जसे शिवाजी महाराज करीत असत .]  अर्थात अशा व्यवस्थे मध्ये , तरी पण गैर व्यवहार होत असत , परंतु त्याची कुठेतरी – केव्हातरी दखल घेतली जात असे .

खालील उद्गार हे फार चपखलपणे कंपनी आणि एतात्देशीय राजवटीनच्या मधील फरक दाखवून देतात “ ईस्ट इंडिया कंपनीची रचना ही व्यक्ति केन्द्रित नसून संस्थात्मक होती, ज्यांचे प्राधान्यक्रम,  सरळ व स्पष्ट होते आणि  त्यावरच सर्व हालचाली केन्द्रित केल्या गेलेल्या होत्या . कंपनिच्या संस्थात्मक रचनेमुळे , जी एक सामूहिक शक्ति आणि उद्देश त्यांच्या कडे होते , ते स्थानिक सत्ताधार्‍यांकडे नव्हते “ ( स्वैर अनुवाद    --- The Corporation That Changed the World - How the East India Company Shaped the Modern Multinational – by Nick Robins  . पान ७४  . मूळ वाक्ये

. Set against this was a robust impersonal institution with a highly focused set of priorities. The Company’s corporate structure gave it ‘a collective strength and unity of purpose [that was] not available’ either to Asian merchants or post-Mughal nawabs.29 (The Trading World of Asia and the East India Company 1660–1760, Cambridge: Cambridge University Press, 1978, p.109.)

 १८व्या शतकातील सर्व एतात्देशीय राजवटी ह्या व्यक्ति केन्द्रित व वंश परंपरागत नेमणूका यावर आधारलेल्या होत्या . त्यामध्ये राज्यकर्ती व्यक्तीच्या गुण दोषावर राज्याचे व त्यातील जनतेचे भवितव्य अवलंबून होते . प्रचलित राज्यकरत्याच्या मृत्यू नंतर , राजघराण्यात – भांडणे , रक्तपात , फाटा फूटी आणि बाहय्य शक्तीची मदत घेणे हाच जवळपास नियम होता . आशा वेळी बाहय्य शक्ति – इंग्रज / फ्रेंच यांनी फायदा न घेतला  तरच नवल . बंगाल , निजाम , मराठे इ सर्वठिकाणी झालेल्या राज्यकर्त्यांच्या घरातील भांडणाचा फायदा इंग्रजांनी कुशल तर्‍हेने करून घेतला .   

पुढील उद्गार संस्थात्मक व्यवस्थेचा राज्य टिकण्या विषयीचा संबंध स्पष्ट करतात “ पंगू झालेल्या सरदारांस दूर करून नवीन लायक इसम पुढे आणण्याची सोय ज्या राज्यघटनेत असेल , तेंच राज्य टिकू शकते , आणि आठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांसारख्या विरोधकांशी निभाव लागण्यास मराठ्यांची लायकी तशाच तोडीची पाहिजे होती “ ( मराठी राजवट  – खंड ७ ,स गो  सरदेसाई – प्रकरण – १ – तुकोजी होळकराच्या दैवाची दौलत उतरली - पान ४६ )

ती मराठी रियासति मध्ये नव्हती कारण ती व्यक्तिकेन्द्रित , वंशपरांपरागत व औपचारिक अशी होती . ( राजवट कारांनी वापरलेला “ लायकी “ हा शब्द बर्‍याच वाचकांना कठोर वाटेल , पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे )  अर्थात ती तशी होती या करता बरीच कारणे होती , परंतू सर्वात महत्वाचे कारण म्हणजे – संपूर्ण भारतातच तशी व्यवस्था प्रचलित होती ! मराठी राजवट  मग त्याला अपवाद काशी असू शकेल ?

क ) कंपनीचे स्पष्ट उद्दीष्ट ( नफा व सत्ता ) वि मराठी राजवटीची सत्ते संबंधी अस्पष्टता : –– वरील उदगारात कंपनीच्या ठरलेल्या उद्दीष्ट / प्राधान्या बद्दल उल्लेख केला आहे . ते उद्दीष्ट  स्पष्ट होते - नफा कामवायचा आणि सत्ता स्थापन करायची . त्यामुळे  निर्णायक पराभव करून , जिंकलेल्यांचे आर्थिक शोषण करून , लशकरी व राजकीय दृष्ट्या त्यांना  पंगू बनवणे , हा त्यांचा कार्यक्रम त्यांनी कठोरपणे राबवला . जिंकलेल्या प्रदेशावर पूर्णपणे नियंत्रण स्थापन केले . त्यात त्यांनी कसलीही कसर सोडली नाही वा द्यामाया दाखवली नाही .बंगाल ( १७५७ प्लासी  , १७६४ बक्सर ) , कर्नाटक - फ्रेंचांबरोबरची तीन युद्धे  , म्हैसूर – हैदर / टिपू विरूद्धची तीन युद्धे , मराठी रियासति विरूद्धची तीन युद्धे ह्या सर्वांची परणीती  , एत्त्देशीय राजवटीचा निर्णायक पराभव करून , त्यांना अंकित बनवून किंवा पूर्ण पणे ताब्यात घेण्या मध्येच झाली ! त्यामुळेच त्यांना पैसा आणि प्रदेश दोन्ही मिळाले !           

 याच्या उलट मराठी राजवटीची मानसिकता वेगळी होती .  पैसा की प्रदेश  ह्या मध्ये मराठी रियासतीने नेहमीच पैशाला प्राधान्य दिले . मुलूखगिरी करता ज्या ज्या स्वार्‍या केल्या त्या सर्व , केवळ पैसे ( खंडणी / चौथाई ) गोळा करायला . पैशा भोवतीच सर्व लढाया आणि राजकारण केला गेल . युद्धां मध्ये विरुद्ध पक्षाचा निर्णायक पराभव केला नाही किंवा काही करणा मुळे तो करणे जमले नाही . अंकित झालेल्या राजवटींना त्यांनी “ खालसा “ केले नाही ( ताब्यात घेतले नाही ) . ह्याला अपवाद फक्त चार स्वार्‍यांचा , ज्या पैशा करिता नव्हत्या . एक – चिमजी अप्पांची वसई स्वारी , दुसरी बाजीराव / प्रतिनिधींची सिद्दी विरूद्धची , तिसरी रघुजी भोसल्यांची कर्नाटक स्वारी, जी चंदा साहेबाला बंदी बनवण्या करता केली आणि चौथी पानिपतची भाऊ साहेबांची अब्दाली विरूद्धची १७६१ ची मोहीम . ह्या चार स्वार्‍यान पैकी फक्त वसईच्या मोहिमेत , पोर्तुगीजांचा निर्णायक पराभव करून तो प्रदेश ताब्यात घेतला .

     पैसा आणि प्रदेश हे दोन्ही जमा करणे हा राजवटीचा  उद्देश नसावा असे दिसते ! किंवा त्यांना काही कारणांमुळे जमले नाही / किंवा करायचे नव्हते  . ते काहीही असले तरी इंग्रजांनी ते ( पैसे आणि प्रदेश दोन्ही ) कमावले व  भारतावर राज्य केले . त्यामुळेच मराठी रियासतीचे विस्तारा मागचे , मूळ उद्दिष्ट पैशा शिवाय ( अर्थार्जन )   “ स्वराज्य – मराठी रियासतीचे स्वतंत्र राज्य ” स्थापन करायचे होते का याविषयी स्पष्ट कल्पना येत नाही . ( आपण म्हणतो की हे मराठी साम्राज्य होते . पण फक्त  अर्थार्जन हेच प्राथमिक उद्दीष्ट असेल आणि प्रदेश जिंकून पूर्णपणे सर्वांकर्ष अम्म्ल बसवणे - जे इंग्रजांनी केल -  हे दुय्यम असेल  किंवा तो प्रदेश नीट ताब्यात ठेवता येत नसेल , तर त्याला काय  म्हणायच ?  ) त्यामुळे निजामा सारख्या शत्रूंचा निर्णायक पराभव / पूर्ण पणे बीमोड किंवा नायनाट  केला नाही . निजामाचा संपूर्ण मराठवाडा सुद्धा शेवटपर्यंत ताब्यात घेता आला नाही , मग त्याला कारणे काहीही असोत . किंवा पातशाहाला पदच्युत करून दिल्लीवर राज्य करण्याचे प्रयत्न केले की नाही या बद्दल शंका घेण्यास जागा आहे .  ( हे शक्य / अशक्य किंवा योग्य अयोग्य हा इथे प्रश्न नाही ) . लढाईत जिंकल्यावर फक्त खंडणी / चौथाई घेण्यावर भर दिला व शत्रूला मोकळे सोडले  . त्यामूळे त्याच त्याच शत्रूनशी परत परत लढाई करण्याचा प्रसंग आला , ज्यामुळे – वेळ , शक्ति , माणसे व पैसा खर्च झाला . त्यामुळे मराठी रियासतेस कधी उसंत मिळाली नाही . शिवाय जिंकलेल्या प्रदेशावर शेवट पर्यन्त , पूर्णपणे नियंत्रण ठेवणे जमले नाही ! मराठ्यांची पाठ फिरली की बंडखोरी , ठरलेल्या खंडणीचे उरलेले पैसे न देणे किंवा टाळाटाळ करणे असे प्रकार सर्रास होत ! 

ड )  एतत्देशीय विस्कळीत सैन्य पद्धती  वि  शिस्तबद्ध , व्यवस्थित व उत्तम तोफा बंदूका असलेले सैन्य

राज्य विस्तार करायचा असेल तर ,लढाई ही अपरिहार्य असते . रणांगणावरच काय तो निकाल त्याचा लागतो . त्या निकालावरच पुढची वाटचाल ठरते . त्यामुळे खालील उद्गार महत्वाचे आहेत 

“ उत्कृष्ट शिपाई , उत्तम शस्त्रास्ते , निपुण सेनानी , या तीनही गोष्टींची जरूर कोणत्याही लष्करास नेहमीच असणार . त्यात जितक्या अंशाने कमतरता पडली , तितक्या अंशाने अपयश येत गेले हा दोष त्या पद्धतीचा नव्हे , किंवा मराठ्यांचाही नव्हे “( मराठी राजवट  – खंड ७ , सरदेसाई ,  – गनिमी कावा विरूद्ध कवइति कंपू - पान ३४९ )

पान ३५० –“ इंग्रजांनी हिन्दी लोकांस जिंकले ते मुस्त्देगिरीच्या जोरावर फसवेगिरीने जिंकले . लष्करी सामर्थ्याने जिंकले नाही . हिन्दी लोकांच्याच मर्दुमुकीने इंग्रजांनी हा देश जिंकला , हे सिलीचे प्रतिपादन यथायोग्य आहे “

मराठी राजवटीचे सैन्य आणि इंग्रजांचे सैन्य ह्यांची तुलना केली तर – संख्या , शौर्य , नेतृत्व ह्या बाबतीत दोघेही समसमान होते .इंग्रजान कडे उत्तम तोफा बंदूका होत्या , पण घोडदळ फारच कमी होते किंवा सुरवातीस नव्हतेच . उलट मराठ्यान कडे उत्तम घोडदळ होते परंतू , तोफा बंदूका त्यामानाने निकृष्ट दर्जाच्या होत्या . इंग्रजांचे सैन्य व्यवस्थित व कवायती शिस्तबद्ध होते , तर मराठट्यांचे सैन्य विस्कळीत , व जवळ पास बेशिस्त असे होते . मराठ्यांचा भर हा जास्त गनिमी काव्या वर होता , तर इंग्रज सामोरा समोर लढाई करण्यास उत्सूक असत .  त्यामुळे वर वर पाहता दोन्ही पक्ष शेवट पर्यन्त जवळपास तुल्यबळ होते , मग इंग्रज लढाया का जिंकले ? याचे कारण त्यांनी खेळलेले सरस राजकारण ! त्यांनी मराठ्यान मधल्या फाटा फूटीचा अतिशय धूर्त पणे फायदा करून घेतला !

एकेकट्याला गाठून – फोडा व झोडा – ही नीती वापरली . हळू हळू एकेक मराठी सरदार आपले अंकित तरी बनवले किंवा त्यांना “ गप्प बसवून इतरांचा समाचार घेतला . आणि सर्वात शेवटी पेशव्यावर लढाईची पाळी आणून त्याला पराभूत करून शरण आणले ! अर्थात ती परिस्थिति निर्माण मराठी राजवटीच्या आपापसातील भांडणा मूळेच निर्माण झाली ! शेवटी कमजोर व खीळ खिळीत झालेल्या राजवटीचा नाश झाला . हा खरा तर इंग्रजांच्या सरस राजकारणाचा आणि मराठी रियासति मधील अतंर्गत फाटा-फुटीचा परिणाम आहे ! त्यामध्ये तोफा , बंदूका , कवायती फौज इ यांचे योगदान मर्यादित आहे ! वर दिलेल्या सिलीच्या मताशी आपल्याला सहमत व्हावे लागते ! 

१८०० साला नंतर मराठी राजवटीची घसरण इतक्या वेगाने का झाली ? 

१७९६  मध्ये दूसरा बाजीराव पेशवा झाला . नंतर मराठी राजवटीची वाटचाल फारच  वेगाने  अधोगती कडे होत गेली - आणि १८१८ पर्यन्त पेशवाई समाप्त झाली . १६७४ ते १७९५ पर्यन्त - १२० वर्षे  आयुष्यमान असलेली राजवट जीने - औरंगजेब ,पानिपत , अंतर्गत दुहींचे आघात झेलत , विस्तार करीत, जवळपास २/३ भारत व्यापला , अशी मराठी राजवट , १७९५ नंतर , फक्त २३ वर्षात ( १७९५ ते १८१८ ) लयाला कशी जाऊ शकते हा कोणासही पडणारा प्रश्न आहे ! मराठी राजवटीचा  अंत इतक्या वेगाने  व्हायला  - अंतर्गत व बाह्य अशी दोन्ही कारणे आहेत !

अंतर्गत कारण – १७९६  मध्ये पेशवाई – दुसर्‍या बाजीराव ( राघोबा दादाचा मुलगा ) सारख्या कर्तुत्वहीन व नालायक माणसाच्या हातात गेली , आणि त्याच वेळेस सर्व समकालीन सरदार घराण्यात , यशवंतराव होळकर , दौलतराव शिंदे इ अशा दूर दृष्टी नसलेल्या आणि रियासति बद्दल फारशी फिकीर नसलेल्या   माणसांच्या हातात सत्ता होती . दूसरा बाजीराव , दौलत राव शिंदे ( महादजी शिंदेयांनी दत्तक घेतलेला )  आणि सरजेराव घाटगे या त्रयीने पेशवाईत अत्याचाराचा कहर केला . अनेक जुन्या जाणत्या व्यक्तींची वासलात लावली . कित्येकांच्या मालमत्ता जप्त केल्या , अटकेत टाकले .नाना फडणीसांना देखील काही महिन्या करता कैदेत राहावे लागले होते !  त्या काळात परिस्थिति इतकी अस्थिर बनली की कोणासही आपल्या मालमत्तेची वा जिवाची खात्री वाटेना . आपापसातील कारस्थानांना उत आला . ह्यात मराठी राजवटीचा  विचार आणि फिकीरच नव्हती . आपल्या कृतीच्या परिणामांची कोणीही पर्वा करत नव्हते . हे सर्व – स्वार्थ , सत्ता , सूड आणि पैसा ह्या करता केल गेल .

ह्या सर्व घटनांचे पर्यवसन यशवंतराव होळकराच्या पुण्यावरील स्वारीत झाले . त्याला बाजीराव व दौलतराव शिंदे यांना घडा शिकवायचा होता . शेवटी – यशवंतराव होळकर आणि दूसरा बाजीराव - दौलतराव शिंदे यांच्या फौजां मध्ये हडपसर ( पुणे )जवळ १८०२ मध्ये फार मोठी लढाई होऊन , त्यात जवळ जवळ दहा हजार माणसांचा बळी गेला ! इंग्रजांशी लढताना सुद्धा झाली नसेल – एव्हडी हानी आपापसातील लढाई मुळे झाली . ह्या सर्व हकिकती वाचल्या वर मन विषण्ण होते . अशा बिघड्णार्‍या  परिस्थिला सावरून धरणारे – छत्रपती शाहू महाराज , महादजि किंवा माधवराव / नाना ह्यांच्या सारखे नेतृत्वच रियासतीत उरले नव्हते ! अशी सर्व कर्तुत्ववान माणसे १८०० पर्यन्त काळाच्या पडद्या आड गेली  होती  ! थोडक्यात, छत्रपती , पेशवे आणि त्याच बरोबर प्रमुख सरदार घराणी निष्प्रभ होत गेली व निरनायकी माजली !  अशी परिस्थिति अवरून इंग्रजांना तोंड द्यायला ,  कर्तुत्ववान अशी व्यक्ति  मराठी रियासति मध्ये कोणीही उरली नाही !

हडपसरच्या ( १८०२) संग्रामाचे परिणाम स्वरूप, दूसरा बाजीराव इंग्रजांकडे पळून जाऊन आश्रय घेण्यात  झाली . इंग्रजांनी ह्या  चालून आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला , आणि लगेच बाजीरवाबरोबर    ३१ डिसेंबर १८०२ ला “ वसई ” चा तह करून , तैनाती फौज ठेवण्यास त्याला भाग पाडले व इतर अटी कबूल करून घेतल्या . तोच हा कुप्रसिद्ध  वसईचा करार . ह्या कराराने पेशवाई व पर्यायाने मराठी राजवटीच्या इतिश्रीची निश्चित अशी सुरवात झाली . 

बाह्य कारण - १८०० नंतर , अशा अंतर्गत परिस्थिमुळेच फक्त १८ वर्षात राजवट  लयाला गेली असे नसून , त्याकरता इंग्रजांनी १८०० नंतर फारच योजनाबद्धरितीने घेतलेला आक्रमक पवित्र हेही तेव्हडेच महत्वाचे बाह्य कारण होते . १७९८ मध्ये इंग्रजांचा गव्हर्नर जनरल म्हणून – आर्थर वेलस्लि ह्याची नेमणूक झाली . त्याने भारतीय सत्ताधीशान विरुद्ध आघाडी उघडली . १७९९ टिपूचा पराभव केला . १७९९ मध्ये तंजावरचे ,नंतर  १८०१ मध्ये अर्धे अवध आणि रोहिला खंड , शिवाय कर्नाटकच्या नावाबाचे राज्य, अशी उत्तर - दक्षिण भारतातील महत्वाची राज्ये “ जवळपास गिळंकृत “ केली  . त्यानंतर इंग्रजांना थांबवणारी उभ्या भारतात, मराठी रियासति शिवाय, कोणतीही मोठी राजवट उरली नाही .

मराठी रियासतीत हस्तक्षेप करण्याची संधी इंग्रज बघतच होते . इंग्रजांना मराठी रियासतीत सरळ हस्तक्षेप करण्याची ही आयती संधी , दुसर्‍या बाजीरावनेच त्यांना आणून दिली . मराठी रियासतीला निर्णायक कलाटणी मिळाली ती , दुसर्‍या बाजीरावाने १८०२ मध्ये घेतलेल्या आश्रया मुळे . त्या तहाचीच ढाल बनवून, त्यांनी मग मराठी रियासति विरुद्ध मोठी व पद्धतशीर अशी आघाडी उघडली . १८०३ मध्ये मराठी राजवट  / शिंदे – भासले – होळकर , विरुद्ध इंग्रजांनी १२ लढाया , १८०४/५ या वर्षां मध्ये ५ लढाया केल्या आणि त्यात शिंदे , होळकर , भोसले अशा सरदारांना पराभूत केले ! अशा ह्या पद्धतशीर , योजनाबद्ध व जलद गतीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्या पुढे , खिळखिळी झालेली मराठी राजवट  टिकाव धरू शकली नाही .  शेवटी १८१७ / १८ मध्ये दुसर्‍या बाजीराव विरुद्ध शेवटच्या लढाया खेळून त्याला शरण आणले व मराठी राजवट  गिळंकृत केली !   अशारीतीने अंतर्गत व बाह्य अशा दोन्ही कारणांचा एकत्रित परिणाम स्वरूप फक्त १८ वर्षात ( १८०० – १८१८ ) मराठी राजवटीचा  अंत झाला .  मराठी राजवट  इतक्या वेगाने का व कशी लयाला गेली याच्या उलगडा ,  ह्या घटनान वरून  होतो !

शेवटी असा प्रश्न उद्भवतो की , आशा परिस्थितीत मराठी राजवटीचा  अंत लांबला असता का ? ह्या बाबत मतांतरे असू शकतील . हो आणि नाही अशा दोन्ही बाजूंनी साधार मते व्यक्त होऊ शकतात . काही अभ्यासकांच्या मते , मराठी राजवट  अजून जास्त काळ , म्हणजे १८१८ नंतर सुद्धा काही वर्षे टिकून राहू शकली , असती , जर दुसर्‍या बाजीरावाने धड कारभार केला असता तर ! त्याने  महत्वाच्या माणसांना नीट वागवून त्यांना योग्य असे नेतृत्व देऊन शिंदे ,भोसले , होळकर अशा सरदारांची एकी ठेवायचा जरी प्रामाणिक असा प्रयत्न केला असता तर , अशा परिस्थितही मराठी राजवट इंग्रजांना तोंड देण्या इतकी ताकत राखून होती ! इंग्रज जरी मराठी रियासतीत हस्तक्षेप करायला टपून बसले होते तरी , त्यांनी आपणहून तसे करण्याची शक्यता फार कमी होती . १८०० नंतर सुद्धा शिंदे , होळकर , भोसले ह्यांच्या एकत्रित फौजा संख्येने व साधनांनी इंग्रजांच्या तोडीच्या होत्या , आणि इंग्रजांना त्याची जाणीव होती . तरीही इंग्रजांनी मराठी रियासति मध्ये हस्तक्षेप केला तो वसई कराराच्या आधाराने .  इंग्रजांनी मराठी राजवटीच्या सरदारांचा पराभव केला – तो करार , हा बाजीराव आपणहून त्यांच्या आश्रयाला गेला  म्हणून झाला . बाजीराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला नसता व पुण्यास जाऊन यशवंतराव होळकर व अमृतराव ह्यांच्या समवेत बोलणी करून मार्ग काढला असता तर इतिहास कदाचित निराळा झाला असता . ( अमृतराव हा बाजीरावचा भाऊ . ह्याच्या कर्तुत्वा विषयी इंग्रजांचे मत चांगले होते व तो सत्तेवर असता तर त्यांना संधि मिळाली नसती हे इंग्रजांना माहीत होते . शिवाय , बाजीरावला इंग्रजांकडे जाण्या विरुद्ध सल्ला दिला गेला होता . खुद्द त्याला त्याच्या परिणामांची थोडीफार कल्पना होती. ) तसे झाले असते तर कदाचित अजून काही वर्षे बाजीरावाची कारकीर्द चालू राहून , राजवटीचे आयुष्य काही वर्षे वाढले असते . फक्त आयुष्यच, पण अपरिहार्य – अंत टळू शकला नसता !  इतिहासात जर-तर ह्याला स्थान नसते , पण त्याचा विचार नक्की करू शकतो .

“ दैवाचा अदृश्य हात ! “

आपल्या वैयक्तिक बाबतीत , सर्व काही झाल्यावर आपण , शेवटी – “ नशीब “ “ दैव “ किंवा “ नियती “ ह्याच्याच कडे वळतो ! हेही खरे की इतिहास हा शेवटी आपल्या सारख्या माणसांनीच घडवलेला असतो ! त्यामुळे , जरी इतिहासाला “ जर / तर “ हे मान्य नसले तरी , काही वेळेस घडणार्‍या घटनात “ दैव “ / “ नियती “ ह्यांचा तर हात नसावा अशी शंका येते . विशेषता: जर काही घटना  परत परत , तशाच तर्‍हेने घडत गेल्या तर त्या बाबतीत विचार करणे भाग पडते .  काही बाबतीत “ दैवाचा “ ; अदृश्य हात मधून मधून डोकवत असावा काय , अशी शंका, सरदेसाई - रियासतकारांनी व्यक्त केली आहे ! . इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की मराठी राजवटीच्या र्हासाला फक्त “ दैव “ / “ नशीब “ हेच कारणीभूत होते असे मुळीच म्हणायचे नाही आहे .

      शेवटी , सर्व बाबतीत सरस असलेल्या  व्यवस्थेने- इंग्रजांनी -  बाजी मारली ! असे असले तरी ,  कर्तबगारी , शौर्य , साहस , देशाभिमान इ कोणत्याही बाबतीत मराठी राजवट  कमी नव्हती . तरीही , आपल्याला काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा येत नाही . मराठी रियासति मध्ये – पार शिवाजी महाराजां पासून १६८० - ते सवाई माधव राव – १७९५ पर्यन्त , सगळ्या राज्यकर्त्यांचे अल्पायुष्य , विशेषता: महत्वाच्या व्यक्तींचे , अवेळी व अचानक –एकामागोमाग झालेले मृत्यू , इंग्रजांच्या चढत्या काळातच – नेमका १७६१ ला पानिपतला झालेला मराठी फौजेचा पराभव , इंग्रजांच्या कर्तुत्ववान व महत्वाच्या व्यक्तींच्या वेळीसच – मराठी राजवटीमध्ये , नालायक नेतृत्व येणे किंवा  पेशवे व इतर थोडे अपवाद वगळता , महत्वाच्या सरदारां नंतरची पिढी ही , जवळपास सरसकट अयोग्य अशी निपजणे इ, बाबतीत , दैवाचे फासे अनुकूल पडले नाहीत , असे जर म्हटले , तर चूक ठरणार नाही . इथे नेपोलियन बोनपार्टचे उद्गार आठवतात “ I know , he is a good General , but is he lucky ? “  

 [ “ दैव “  ह्या बाबतीत , प्रत्येकाचं मत , दृष्टीकोण वेगळा असू शकतो . प्रयत्नवाद विरूद्ध  दैववाद , हा वाद नेहमीचाच आहे . रामदासांनी सुद्धा ह्यावर भाष्य केले आहे , ज्यात प्रयत्नवादाच्या बाजूने कौल दिला आहे ! ]  रियासतकार सरदेसाई यांनी त्यांच्या “ मेन करंट्स ऑफ मराठा हिस्ट्री “ – १९३३ , पान – २०७ वर , खालील दिलेला गीतेचा श्लोक देऊन , असे काहीसे म्हटले आहे की - बर्‍याच घटनांच्या   बाबतीत तर्क संगत उत्तरे देता येत नाही . शेवटी “ दैव “ हेही , मानवी व्यवहारा मध्ये , पाचवे महत्वाचे अंग आहे , असे गीते मध्येही संगितले आहे [ अध्याय १८ , श्लोक १४ ] !    

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् |
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् || 14||

कार्या  मागचे अधिष्ठान , कारण , कर्ता आणि प्रयत्न ह्या चार अंगां  बरोबर , दैव हे ही पाचवे अंग आहे 

[ त्यांच्या अचूक शब्दां साठी , पुस्तक वाचावे  ]

                        समाप्त ……………………………



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा