Menu

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

 

१७ आणि १८ व्या शतकात सुद्धा जंजिरा अजिंक्य का राहिला ?

जंजिरा आणि सिद्दी

भारतातील हबशी जमातीतील लोकांना – सिद्दी महणून ओळखले जात असे . ही जमात पूर्व आफ्रिकन असून , गुलाम म्हणून त्यांना भारतात आणले गेले होते . अंगाच्या गुणांच्या जोरावर – शौर्य , चिकाटी , दर्यावर्दीपणात कौशल्य - त्यांनी भारतीय राजकारणात जम बसवला . ( मलिक अंबर – ज्याने अहमदनगरची निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला होता , तो सुद्धा हबशी होता . )

अहमदनगरच्या निजामाने , रामभाऊ कोळी यांच्या कडून , १४९० मध्ये जंजिरा जिंकला . निजामाने  प्रथम पासूनच आशा हाबयशांपैकी एकाची , जंजिरा किल्ल्यावर नेमणूक केली . हे हबशी जरी निजामशाहीचे मंडलीक होते तरी , हळू हळू ते स्वतंत्र वागायला लागले आणि निजामशाहीचे नियंत्रण नाममात्र राहिले . त्यांनी जंजिरा हेच आपले ठाणे बनवले आणि आजू बाजूच्या किनाऱ्या वर ( ३०-४० की मी ) आपली सत्ता कायम केली . १७ व्या शतकात त्यांच्या कडे जंजिरा धरून ८ किल्ले होते . तेंव्हा पासूनच जंजिरा म्हणजे सिद्दी हे समीकरण कायम झाले ते १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतात विलीन होई पर्यन्त कायम होते . ( सिद्दी हे नाव जमात दर्शक आहे . प्रत्यक्षात ती वेगवेगळी माणसे होती )

जंजिरा व रायगड हे अंतर सरळ रेषेत जेम तेम ५० की मी आहे . त्यामुळे स्वराज्यास तो धोकादायक होता . शिवाजी  महाराजांनी “ आज्ञा पत्रात “ म्हटल्या प्रमाणे “ सिद्दी हा घरातील उंदरा सारखा “ होता .  किनाऱ्यावरील जनतेची उभी घरे / पिके जाळणे , किंवा पकडून नेणे , हत्या करणे इ विध्वंसक कामे करीत असे . एकट्या मराठ्यांनीच ( शिवाजी व संभाजी महाराज - १७ व्वे आणि शाहू महाराज व कान्होजी आंग्रे - १८ व्वे शतक ) जंजिरा जिंकण्याचे  अविरत प्रयत्न केले . इंग्रज व पोर्तुगीजांकडे राजकीय इच्छा शक्तिच  नव्हती . उलट त्यांनी सिद्दीला – मराठयानवर  दबाव ठेवण्या साठी,  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, मदतच केली .

जंजिरा

जंजिरा हा जलदुर्ग आहे , जो एका छोट्या ( ५.७ हेक्टर क्षेत्रफळ ) बेटावर बांधला गेला आहे . १७ व्या शकात सुद्धा तो चांगलाच संरक्षित होता . किनाऱ्या पासून जवळ  ( ५०० मीटर ) असूनही फक्त ओहोटीच्या वेळेसच जमिनी वरून जाता येते . भरतीच्या वेळेस छोट्या बोटीनेच प्रवास करावा लागतो . किल्ल्या वर दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत . ह्याची बांधणी दगडांची असून त्याच्या रक्षणा करता १७/१८ व्या शतकात जवळ पास ५७५ तोफा होत्या . ह्या तोफानचा पल्ला ५०० मी ( छोट्या तोफा ) आणि मोठ्या तोफानचा  - २ ते ३ की मी किंवा जास्त असा होता . अशा तोफा, बंदूकान मुळेच जमिनी वरील / सागरी हल्ल्याला तोंड देण्यास जंजीरा समर्थ होता . १७ / १८ व्या शतकातील त्यांच्या आरमारा विषयी दोन उल्लेख सापडतात ज्याच्या वरून त्याच्या आरमारी सामर्थ्याची कल्पना येऊ शकेल . १७ व्या शतकात सिद्दी कडे ४०-५० गुराब होते . ( महाराष्ट्राचा इतिहास , मराठा कालखंड , शिवकाल – १६३० – १७०७ . संपादन डॉक्टर वी गो खोबरेकर . महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळ – २००६ – पीडीएफ, प्रकरण २२ – जंजिरेकर सिद्दीशी भांडण ) . १७२५ मध्ये सिद्दी रसूल याकूत खान – इंग्रज व पोर्तुगीजांच्या उचकावण्याला बळी पडून, आपली १२ पाल , २ गुराब ( frigates ) आणि १०० गलबत ( gallivats ) – ( ५-६००० माणसांचे ) आरमार घेऊन कुलाब्याला वेढा घालण्या करिता आला होता . ( Kanhoji Angre The Maratha Admiral . An account of his Life and Battles with English . by Manohar Malgaonkar Asia Publishing House 1959 PDF page 282 ) त्या काळच्या आरामरात – पाल हे सर्वात मोठे लढाऊ जहाज , त्या नंतर गुराब व नंतर गलबत असा क्रम होता . ह्या दोन्ही उल्लेखांचा एकात्रित विचार केला तर अस लक्षात येत की, १८ व्या शतकाच्या सुरवातीस सुद्धा, कोकण किनाऱ्यावर, एव्हडे सशक्त आरमार कोणा कडेच नव्हते . त्यामुळे जंजिऱ्याला सागरी वेढा घालणे कोणालाच शक्य नव्हते !  शिवाय जमिनी वरील युद्धा करता स्वतंत्र सैन्य त्यांच्या कडे होते . ह्या तिन्ही साधनान मुळे – किल्ल्यावरील तोफा - बंदूका , सशक्त आरमार व सैन्य – सिद्दीला नमवून जंजिरा जिंकणे सोपे काम नव्हते . जांच्याकडे पक्का सागरी वेढा घालण्या एव्हडे सशक्त आरमार आणि सिद्दीची जमिनी वरील  सत्ता उखडून टाकण्या एव्हडे सैन्य – पायदळ व घोडदळ असेल , तेच राज्यकर्ते , जंजिरा जिंकू शकत होते . १७ व्या काय पण १८ व्या शतकाच्या सुरवातीस – मराठे, इंग्रज, आणि पोर्तुगीजांकडे एव्हडे सामर्थ्य नव्हते ! पोर्तुगीज किंवा इंग्रज यांच्याकडे जरी चांगले आरमार होते तरी सैनिक शक्ति नव्हती , आणि माराठ्यांकडे सैनिक शक्ति होती, तरी आरमार तेव्हडे सशक्त नव्हते .

सिद्दी विरुद्धच्या मराठ्यांच्या मोहिमा

शिवाजी महाराजांनी १७५६/७ मध्ये कोकणात जेव्हा तळे-घोसाळे जिंकले , तेव्हा पासून त्यांचा संबंध सिद्दीशी यायला सुरवात झाली . तेव्हाच महाराजांच्या लक्षात आले की सिद्दीला  संपवायचे असेल , तर आपल्याकडे चांगले आरमार पाहिजे . तेव्हा पासूनच त्यांनी, जवळ जवळ शून्यातून आपले आरमार तयार करायला सुरूवात केली .

१६५७ मध्ये त्यांनी रघुनाथ बल्लाळ  सबनीस यांना जंजिरयावर पाठवले . पाठवले परंतु त्यात त्यांना यश आले नाही . नंतर महाराजांनी १६६९ मध्ये मोठी मोहीम हाती घेतली – ज्यात सैन्य व आरमारी शक्तीचाही वापर केला . जमिनीवरील ७ किल्ले ही जिंकले आणि जंजिरयावर सागरी मोहीम सुरू केली. शेवटी सिद्दी फत्तेखान शरण यायला तयार झाला . परंतू , सिद्दी फत्तेखानच्या हाताखालील – सिद्दी कासिम , सिद्दी सांबूल आणि सिद्दी खैरीयात यांनी बंड करून जंजिरा ताब्यात घेतला व सिद्दी फत्ते खानला तुरुंगात टाकले आणि लढाई सुरू ठेवली . त्याच बरोबर त्यांनी लगेच एक राजकारण केल . विजापूरकरांची मांडलिकी सोडून , मोगलांची पत्करली . औरंगजेबने तातडीने – दोन जहाजे , ३ गुराब आणि २५ गलबते असा आरमारी काफिला सिद्दीच्या मदतीला पाठवला . शेवटी शिवाजी महाराजांना ही मोहीम सोडून द्यावी लागली . परंतू त्यांनी जिंकलेल्या दांडा – राजपुरीस नौदलाचा काफिला तैनात केला .

१६७५ मध्ये त्यांनी जंजिऱ्या जवळील कांसा बेट ताब्यात घेऊन त्यावर पद्मदुर्ग बांधून  पूर्ण केला ( राजा शिवाजी , उतारार्ध , पुरंदरे प्रकाशन १६ वी आवृत्ती २००८ – पान ३८३ ) . १६७६ मध्ये महाराजांनी परत एकदा जंजिरा मोहीम हाती घेतली . १० हजार सैन्य घेऊन मोरोपंतांना पाठवले . आणि लय पटलावर , रात्री गुपचुप जाऊन जंजिरयाच्या तटाला शिड्या लावायची कामगिरी सोपवली . १२०० धारकरी तयार केले , जे शिड्यांवरून चढून हल्ला करून जंजिरा ताब्यात घेणार होते, अशी ही योजना होती .  लय पाटलांनी आपले काम फत्ते केले व तटाला शिड्या लावून काही तास वाट पहिली , परंतू धारकरी पोहोचू शकले नाही .शेवटी त्यांना पहाटे पूर्वी परत यावे लागले . अशी ही मोहीम फसली . ( पान ४०३/४/५ ) . १६८० मध्ये शिवाजी महाराजांनी खंदेरी बेटावर सागरी किल्ला बांधून पूर्ण केला व इंग्रज आणि जंजिरयावर दबाव वाढवला .    

संभाजी महाराज आणि सिद्दी

१६८० मधील शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर , सिद्दीने  किनारपट्टीवर उपद्रव फारच वाढवला .  त्याचा बंदोबस्त करणे संभाजी महाराजांना भाग होते . १६८१ मध्ये कोंडाजी फर्जनद  व त्याच्या साथीदारांनी संभाजी महाराजान बरोबरीच्या मतभेदाचे कारण देऊन , जंजिरयात प्रवेश मिळवला . त्यांनी किल्ल्यात घातपात करायचा, मग हल्ला करून किल्ला जिंकायचा असा संभाजी महाराजांचा बेत होता . परंतू ह्या काटाचा सुगावा , सिद्दीला लागून कोंडाजी फर्जनद व त्याच्या साथीदारांना आपले प्राण गमवावे लागले . १६८२ मध्ये दादाजी रघुनाथ देशपांडे यांना दांडा राजापुरी जिंकायला पाठवले . २० हजार सैन्यासह राजे स्वत: तथे गेले आणि १५ दिवस सतत जंजिरयावर तोफानचा  मारा केला . हा मारा इतका जबरदस्त होता की किल्ल्याची भिंत कोसळून पडायची वेळ आली होती .

त्याच बरोबर त्यांनी , जंजिरया भोवतीची जागा – दगड , लाकडे, माती टाकून भरायला, ५०००० माणसे कामाला लावली . ह्या मार्गावरून जंजिऱ्यावर सरळ हल्ला चढवायचा असा त्यांचा बेत होता . परंतू त्याच वेळेस सिद्दीच्या विनंती वरून औरंगजेबाने , नवाब हसन आली खान याला २ हजार घोडदळ आणि १५००० पायदळ देऊन कोकणात पाठवले . त्याने लगेच कल्याण जिंकले . त्यामुळे शेवटी  संभाजी राजे यांना मोगली सेनेचा मुकाबला करायला सिद्दी वरील ही मोहीम अर्धवट टाकून निघून जावे लागले . तरीही दादाजी देशपांडे यांनी प्रयत्न चालू ठेवले ,पण त्यात यश आले नाही .

पुढे राजेंनी सिद्दीला शह देण्याकरता, अंजदीव येथे किल्ला / आरमारी तळ उभारण्याचा प्रयत्न केला , परंतू पोर्तुगीजांनी तो हाणून पाडला . नंतर इंग्रजान बरोबर संबंध सुधारले व करार केला . त्यामुळे मुंबईचा उपयोग करून , माराठ्यां विरुद्धच्या कारवाया करणे सिद्दीला अशक्य  झाले . १६८२ मधील औरंगजेबाच्या दख्खनच्या स्वारी मध्ये संभाजी राजे अडकून पडले , आणि २ वर्षांची सिद्दी विरुद्धची मोहीम मागे पडली .

[ प्रकरण-३० संभाजी महाराज व सिद्दी संघर्ष – महाराष्ट्राचा इतिहास , मराठा कालखंड , भाग १ , शिवकाल १६३० – १७०७ – डॉक्टर वि गो खोबरेकर , महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति  मंडळ – मुंबई , २००६ , pdf ]  

कान्होजी आणि सिद्दी

संभाजी राजेनचा १६८९ मध्ये वध झाल्यावर , राजारामच्या कारकिर्दीत कान्होजी १६९८ मध्ये आरमार प्रमुख / सरखेल झाले . तेंव्हा पासूनच त्यांच्या सिद्दी बरोबर चकमकी चालू झाल्या . कान्होजिंनि  आपले आरमार सक्षम करायला सुरवात केली . त्याचबरोबर मोगलां पासून बरीचशी कोकण किनारपट्टी जिंकून घेतली . तरीही सिद्दीचा उपद्रव कमी झाला नाही . मग त्यांना सिद्दीकडे लक्ष द्यावे लागले .

१७०१ मध्ये सिद्दीने खंदेरी व कुलाब्याला वेढा घातला , परंतु त्यात त्याला बरीच हानी सोसून माघार घ्यावी लागली . १७१३ मध्ये कान्होजी , शाहू महाराजांच्या पक्षाकडे वळल्या वर त्यांना शाहू महाराजांचे ( पेशव्यांचे ) सैनिकी पाठबळ लाभले . त्या नंतर १७१५ मध्ये त्यांनी सिद्दी बरोबर एक करार केला , ज्यानुसार , सिद्दी सागरी हद्दीतून पुढील १० वर्षे नाहीसा झाला . १७२५ मध्ये सिद्दीने वर उल्लेखिल्या प्रमाणे , मोठे आरमार गहेरून कुलाब्याला वेढा घातला . अशा काही घटना सोडल्या तर कान्होजींनि जंजिरा जिंकण्याचा फारसा प्रयत्न केल्याचे अढळत नाही  . किंबहूना, सिद्दी पेक्षा , त्यांना इंग्रज , पोर्तुगीज , डच अशा परकीय सत्तानशी सामना करावा लागला .   

शाहू महाराज आणि सिद्दी

१७२० नंतर शाहू महाराज व पेशवे यांचे सगळे लक्ष उत्तरेकडील ( जमिनी वरील ) सत्ता वाढवण्या कडे लागले होते . त्यामुळे सिद्दी ( जंजिरा ) हा विषय त्यांच्या पुढे नव्हता . परंतु ही परिस्थिति १७३३ मध्ये बदलली . त्या वर्षा पासून , शाहू महाराजांना सिद्दी विरुद्ध जंगी मोहीम काढावी लागली, ज्या मागे  ब्रम्हेन्द्र स्वामी ( जे पेशवे व इतरांचे “ गुरू स्वामी “ होते ) यांचा आग्रह होता . ( येथे, त्या आग्रहामागची कारण परंपरा लक्षात घ्यायची जरूरी नाही )

१७३३ ची जंजिरा मोहीम – शाहू महाराजांच्या सांगण्या वरून, बाजीराव पेशवे आणि फत्तेसिंग भोसले एप्रिल १७३३ मध्ये सिद्दीच्या प्रदेशात आले आणि मोहीम सुरू झाली . मुख्य उद्देश , जंजिरा जिंकून सिद्दीला नामशेष करायचे हा होता ! त्याकरता सेखोजी आंग्रे याची मदत घेतली ( कान्होजी नंतर त्यांचा मुलगा सेखोजी, सरखेल झाला ) . परंतु पावसाळा तोंडावर आल्या मुळे सेखोजी सागरी मोहीम काढायला तयार झाला नाही . मग बाजीराव राजापूरीला आले , आणि – राजापुरी , तळे, घोसाळे, बिरावाडी ही सिद्दीची ठाणी भराभर हस्तगत केली . हे सर्व होत असतांना , प्रतिनिधींनी, बाजीराव यांच्याशी विचार विनिमय न करता , रायगड जिंकला व शाहू महाराजांची वाहव्वा मिळावली . तेव्हा पासून बाजीराव आणि प्रतिनिधी यांच्यातील तेढ वाढत गेली .

इकडे , सेखोजीने, जून अखेरीस थळचा मोठा किल्ला व पेन नदी जवळील रावळी किल्ला सिद्दी पासून हस्तगत केला . सेखोजीच्या आईने बंकाजी नाईक याला  अंजनवेल , गोवळकोट  वगैरे ठाणी जिंकायला पाठवले . आशा रीतीने सिद्दी विरुद्ध जमिनी वरील फार मोठी कारवाई सुरू केली गेली . परंतु अचानक सेखोजी ऑगस्ट १७३३ मध्ये मरण पावला आणि मोहिमेला वेगळेच वळण लागले . ( संभाजी आंग्रे , ज्याच्याकडे विजयदुर्ग  होता , त्याने या मोहिमेत भाग घेतला नाही . मानाजी आंग्रे मात्र सामील झाला.)  

तिकडे सिद्दी ने उंदेरि इंग्रजांना देऊन , त्यांची मदत मिळवली . सूरतेहून सिद्दी मसूद सागरी कुमक घेऊन येणार होता, ज्यास अडवण्या करता शाहू महाराजांनी उमाबाई दाभाडे व दामाजी गायकवाड यांना लिहिले होते . परंतु ह्या दोघांनी काहीही न केल्यामुळे सिद्दीला सूरतेची कुमक मिळाली . इंग्रजांनीही  लढाऊ जहाजे व इतर सामान सिद्दी कडे पाठवले . त्यांनी डिसेंबर १७३३ मध्ये सिद्दी बरोबर – एकमेकांना मदत करायचा करार केला .

या सर्व घटनानमुळे बाजीरावांनी डिसेंबर महिन्यात, जंजिरयाचा वेढा उठवून सिद्दी बरोबर तह करून माघार घेतली. तरीही शाहू महाराजांनी ही मोहीम पुढे सुरू ठेवली . १७३४/३५ मध्ये बऱ्याच घटना घडल्या. १७३६ मध्ये चिमाजि अप्पा कोकणात आले. त्यांनी व इतर सदार यांनी मिळून सिद्दी सात , उंदेरीचा सिद्दी याकूब , सिद्दी अंबर अफवानी या प्रमूख सरदारांना ठार मारले . यामुळे सिद्दीची अर्धी शक्ति खच्ची झाली व सिद्दी रहमान याने बाजीरावान  बरोबरचा तह कायम करून युद्ध थांबवले .  परिणाम स्वरूप जंजिरा , अंजनवेल, गोवळकोट इ प्रदेश सिद्दीकडेच राहिला . 

या मोहिमेचे फलित - मूळ उद्देश - जंजिरा , अंजनवेल , गोवळकोट घेऊन सिद्दीचा नायनाट करायचा, हा होता . तो सफल झाला नाही . शाहू महाराजांनी या ४ वर्षाच्या मोहिमेत बराच पैसा ओतला. बाजीराव, चिमाजि अप्पा, सेखोजी व मानाजी आंग्रे, पिलाजी जाधव, उदाजी पवार, प्रतिनिघी बाजी भीमराव इ या कामी झटत होते. मराठ्यां कडील सुभानजी घाटगे, कोंड नाईक, बाळाजी शेणवाई इ नामांकित सरदार कामी आले . एव्हडे करूनही सिद्दी अर्धा मुर्धा का होईना ,पण जंजिऱ्या सकट 

राहिला .

ही मोहीम फसण्याची कारणे अनेक आहेत . एकतर ही मोहीम , मे १७३३ पासून दुतोंडी ( बाजीराव – प्रतिनिधि ) होती . त्यात सेखोजीचे अकाली मरण आणि बाजीरावची पहिल्या ७ महिन्या नंतरची माघार या घटनांनी ग्रासली गेली . त्यात संभाजी व मानाजी यांच्या वितुष्टाची भर पडली . सागरी मोहिमे अभावी ही मोहीम फक्त जमीनिपूर्तीच मर्यादित राहिली . त्याच बरोबर सिद्दीने इंग्रज ,मोगल , सुरतेचा सिद्दी यांची मदत मिळवली आणि त्याचा लढण्याचा हूरूप आणि आरमारी शक्ति वाढली. त्यामुळेच त्याला मराठ्यांच्या हल्ल्याला , खूप हानी सोसूनही तोंड देता आले व त्याने आपली सत्ता कशी बशी राखली .    

थोडक्यात, मराठ्यांचे आपापसातील मतभेद, सागरी मोहिमेचा अभाव आणि सिद्दीस मिळालेली बाह्य मदत ह्या कारणांनी ही मोहीम फसली व जंजिरा जिंकता आला नाही !

जंजिरा अजिंक्य का राहिला ?

सिद्दीचे एकमेव शत्रू मराठे . त्यामुळे फक्त मराठ्यांनी त्याच्या विरुद्ध अनेक मोहिमा काढल्या . शिवाजी महाराज यांनी ३ ( १६५७, १६६९, १६९६ ), संभाजी महाराजांनी २ ( १६८१, १६८२ ) आणि शाहू महाराजांनी १ ( १७३३-३७ ) आशा मोहिमा उतरत्या क्रमाने काढल्या, ज्यात त्यांना यश आले नाही . या सर्व मोहिमांचा एकत्रित विचार केल्यास काही गोष्ट स्पष्ट होतात . सिद्दीचा आत्मा म्हणजे जंजिरा . तो जिंकला की सिद्दी संपला ही गोष्ट जरी खरी असली, तरी ती प्रत्यक्षात आणणे  किती कठीण होते हे लक्षात येते .

जंजिरा हा अभेद्य जल दुर्ग होता ज्याला सिद्दीच्या समर्थ आरमाराचे संरक्षण होते . ते भेदायला मराठा आरमार फार कमी पडत होते . ( तुळाजी आंग्रे विरुद्ध जिंकायला, नाना साहेबा पेशव्यांना १७५६ मध्ये इंग्रजांच्या आरमाराची मदत घ्यावी लागली होती , हे लक्षात घेतले पाहिजे ) . प्रभावी सागरी  मोहिमे आभावी ह्या सर्व मोहिमा जमिनी पुरत्या मर्यादित राहिल्या . त्यात सिद्दीने राजकारण खेळून, वेळो वेळी, इंग्रज व मोगल ह्यांची मदत मिळवली .

१७ व्या शतकात शिवाजी व संभाजी महाराज यांना जेव्हडे महत्व ( धोका ) जंजिरयाचे वाटले  तेवहडे १८ व्या शतकात शाहू महाराज व नंतर पेशवे - यांचे सर्व लक्ष उत्तरेतील सत्ता वाढवण्या कडेच असल्या मुळे, यांना वाटले नाही ! जंजिरा हा विषय त्यांच्या दृष्टीने तेव्हडा महत्वाचा नव्हता ! ( शाहू महाराजांनी सिद्दी विरुद्धची मोहीम , ब्रम्हेन्द्र  स्वामी यांच्या आग्राहा मुळे काढली होती. तो धोकादायक आहे म्हणून नष्ट करायला आपणहून काढलेली नव्हती ! )

 या सर्व कारणांमुळेच जंजिरा ४५० वर्षे ( १४९० पासून ) अजिंक्य राहिला व १९४८ मध्ये भारतात विलीन झाला !

++++++++++

        

                

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा