Menu

मराठी राजवटीच्या र्हासाची कारणे - भाग – २

 

मराठी राजवटीच्या र्हासाची कारणे -  भाग – २    

ब १. २ ) “ मराठी राजमंडळाच्या  ( confederacy ) “ मधील रचनात्मक दोष . ( काही  दोष , फक्त मराठी राजमंडळा पुरते  सीमित नसून , तेव्हाच्या प्रचलित भारतीय पद्धती मध्येच दिसतात . )

 शाहू महाराजांनि लावलेली राजमंडळाची व्यवस्था

राजराम महाराजान पासून सुरू झालेली वतनदारी / सरंजामशाहीची पद्धत , शाहू महाराजांनी सुद्धा पुढे चालवली . परंतु त्यात महत्वाचे बदल केले . एकतर बाळाजी विश्वनाथला पेशवे नेमले आणि त्यांच्या कडे कारभार सोपवला . नंतर जेव्हा प्रमुख सरदारांचा योग्य रीतीने व राज्याच्या विस्तारकरिता उपयोग करण्याची वेळ आली , तेव्हा एक नवीन रचना तयार केली . प्रमुख सरदार व पेशवे यांचे “ राज मंडळ “ स्थापन केले . त्यावेळेस शाहू महाराज व बाळाजी विश्वनाथ यांना , सरंजामशाहीची व्यवस्था, जी रूजली होती , ती मान्य करण्या शिवाय गत्यंतरच नव्हते . त्या  व्यवस्थेला / रचनेला योग्य आकार देऊन एक व्यवस्थित असा  “मराठी राज मंडळाचा [ loose Maratha confederacy ] साचा “  तयार केला . त्यात सरदारांचे हित , त्यांच्या पराक्रमाला वाव आणि राज्य विस्तार करण्याचे व त्याचेच पुढे प्रशासन करण्याची संधी मिळेल असे पाहिले . ह्या राज मंडळात , परस्पर सहकार्य , सामंजस्य व हिताचे रक्षण यावर भर होता . ह्यात एकत्रित राहून कार्य करण्याचे अपेक्षित होते. त्यात सर्वात महत्वाचे स्थान हे छत्रपतींचे होते .त्यानंतर पेशव्यांचे होते .  या “ राज मंडळा वर “ वचक ठेऊन त्यावर जमेल तेव्हडे नियंत्रण ठेवण्याचे काम शाहू महाराज करत  होते . त्यांना सर्व प्रजा व सरदार मानीत, कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार होते . त्यांचा तो नैतिक अधिकार होता . शाहू महाराजांच्या मृत्यू [ १७४९ ] नंतर मात्र ही व्यवस्था डळमळीत होऊ लागली , कारण त्यांच्या नंतर, नैतिक किंवा समर्थ नेतृत्व कोणत्याही छत्रपती कडे नव्हते .शाहू महाराज , कर्तुत्ववान पेशवे आणि मल्हारराव होळकर , महाद्जि शिंदे , रघुजी ( पहिले ) भोसले इ  सरदार होते , तो पर्यन्त ( १७९४/९५ ) ही व्यवस्था नीट काम करत होती .  परंतु त्याही वेळेस पेशव्यांचे त्यावर पूर्ण नियंत्रण नव्हते . नंतर मात्र ही व्यवस्था हळू हळू ढिली होत गेली .

मराठी राजमंडळ किती प्रभावी होते , याचा पुरावा , मराठी राजवटीचा  वेगाने झालेला विस्तार – फक्त ४० वर्षात [ १७२० ते १७६० ] जवळपास शून्यातून भारताच्या बहुतांश भागात पसरली , यात दिसतो . जरी सुरवात [ १७०७ मध्ये शाहू महाराजांच्या  सुटकेच्या वेळेस ] मोगलांची  ताबेदारी परत्करून झाली , तरी नंतर दिल्लीच्या पातशाहिलाच मराठ्यांवर अवलंबून राहाण्याची पाळी आली ,  इतकी  मराठी राजवट  प्रभावशाली झाली . त्याची सुरवात १७५२ मधील पातशाहा व पेशवे यांच्यातील  कराराने झाली – ज्या योगे मराठी राजवट  मोगलांचे , अंतर्गत व बाह्य शत्रू / आक्रमणापासून  रक्षण करण्यास बांधील झाली . पुढे परिस्थित अशी झाली की , १७७२ मध्ये महादजि शिंदे यांच्या संरक्षणा खालीच पातशाहाला दिल्लीत प्रवेश करावा लागला. पुढे तर दिल्लीच्या पातशाहाने १७८४ मध्ये - पेशव्यांना “ नायब मुनईब   “ मिर बक्ष  “ नेमले . बादशहाने  महाद्जिंना “ वकील इ मुतालिक सरकार मधील सर्वोच्च स्थान बाहाल केले .  कालाय तस्मै नमा: ! ही सर्व किमया – मराठी राज मंडळ , प्रभावी नेतृत्वा खाली काय करून दाखवू शकत होती याचा सज्जड पुरावा होय ! [ ह्या सर्व घटनांचा मराठी रियसतीस – फायदा / तोटा किती , झाला किंवा झाले ते योग्य / अयोग्य होते , हा इथे प्रश्न नाही .या बाबत मतभेद होऊ शतात आणि आहेत . परंतू  इथे फक्त मराठी राज मंडळामुळे झालेल्या विस्तारा बद्दल वस्तुस्थिति मांडलेली आहे ] .

असे असूनही “ राज मंडळा “ [ कोनफेडरसी ] आणि " बारभाई " मध्ये काही मूलभूत दोष होते

 

१ – पहिला दोष  – " राज मंडळ " १७१३ - १७२० मध्ये बाळाजी विश्वनाथ आणि शाहू महाराज यांनी अस्तीत्वात आणले , ज्यात पेशव्यांच्या नेतृत्वा खाली , इतर सरदारांनी राहावे असे ठरले . अर्थात छत्रपती शाहू महाराज हे राज्याचे " पालक " होते व त्यांच्याच नावाने कारभार केला जात होता .   असे मंडळ , एका विशिष्ट परिस्थितून निघालेला , त्यातल्या त्यात चांगला पर्याय होता . शिवाजी महाराजां सारखे प्रभावशाली किंवा शाहू महाराजां सारखे नैतिक पण समजूतदार असे नेतृत्व हा ह्याचा कणा होता . परस्पर सामंजस्य हा ह्याचा आधार होता . पेशवे आणि सरदार घरण्यांमधील ऐक्य हयातच  राज्याचे व आपले हित आणि त्यावर अस्तित्व अवलबून आहे ही जाणीव सर्वांना होती . ह्या ऐक्या शिवाय आपण शत्रूला तोंड देऊशकत नाही हे पक्के माहीत होते .

 

१७७४ मध्ये अस्तीत्वात आलेले “ बारभाई मंडळ “ ही याचीच पण वेगळ्या स्वरूपात आलेली व्यवस्था होती . ह्या " मंडळात " नाना फडणीस , सखाराम बापू , महाद्जि शिंदे , हरपंत फडके , तुकोजी होळकर , सरदार रास्ते इ मात्तबर मंडळी सामील होती व त्यांनी कारभार हातात घेतला .बारभाई मंडळ अस्तीत्वात आले - राघोबदादास पेशवाई पासून दूर ठेवण्याकरिता , आणि सवाई माधवराव याला पेशवाई मिळवून देण्या करता .   ही व्यवस्था १७९५ मध्ये सवाई माधवरावचा मृत्यू होई पर्यन्त कार्यरत होती .त्यांनी चांगला कारभार केला.  इंग्रज , निजाम , हैदर , टिपू यांना तोंड दिले .त्या पैकी काही महत्वाच्या घटना – १७७४ – पहिले इंग्रज – मराठा युध्ध , १७७६ – इंग्रज – मराठे  पुरंदर तह , १७८२ – सलभाईचा – इंग्रज मराठे तह , १७८४ – महाद्जि  दिल्लीत सर्वोच्च , १७९० – इंग्रजां बरोबर - टिपू विरुध्द्ध – पुणे तह , १७९५ – निजामा विरुध्ध्ची खरड्याची लढाई इ . नंतर ह्यातील व्यक्तींच्या एका पाठोपाठ झालेल्या मृत्यू नंतर बारभाईची व्यवस्था कोलमडली .

 

थोडक्यात, ही दोन्ही मंडळे परिस्थिला तोंड देण्या करता अस्तीत्वात आली . त्या मागे , एक कायम स्वरूपी मंडळाची व्यवस्था करणे हा विचार नव्हता किंवा तसे करणे जमले नाही . “ राज मंडळ व बारभाई मंडळ “ हे कोणत्याही कायद्याने “ अस्तीत्वात आले नव्हते . शिवाय ती व्यक्ति केन्द्रित , औपचारिक व्यवस्था होती . ह्या दोन्ही मंडळात पेशवे हेच कार्यकारी प्रमुख व छत्रपती हे राज्य प्रमुख होते .तिच्यातही अंतर्विरोध हा अंगभूत होता . एकमेकांशी न पटणे किंवा एकीने काम करणे हे न जमणे , हा तर मराठ्यांचा खास “ अवगुण “ इथे पदोपदी दिसला . यावर – प्रभावी आणि कर्तबगार नेतृत्व असे पर्यन्त , अंकुश ठेवणे शक्य झाले . ज्या वेळेस प्रभावी , सर्वमान्य , कर्तबगार नेतृत्व , त्यांच्या मृत्युंमुळे नाहीसे झाले , त्याबरो बरोबर ही व्यवस्था फार वेगाने विनाशा कडे गेली . १७९५ नंतर दुसर्‍या बाजीरावाच्या नालायक नेतृत्वा खाली ही व्यवस्था पार कोलमडली . पुढे घडलेला इतिहास हा ज्ञात आहे .

२ – दुसरा दोष -  ह्या राज्य व्यवस्थे मध्ये – वंशपरंपरागत पद्धतीने , आपोआप नेमणूका होत असत . भारतात सर्व राज्य सत्तेत हे राजमान्य होते व ती परंपरा होती . या मध्ये  कर्तबगारी , योग्यता , सर्वसम्मती इ सर्व गौण होते . योग्य अशी व्यक्ति वारस होईलच याची खात्री नव्हती . सत्ते करता वरसांची आपापसात भांडणे , स्पर्धा ,फाटाफूट , दगाबाजी , हिंसा हे त्यावेळच्या जवळ पास सर्व  राज्यांमध्ये / वतनदारी मध्ये / जागिरी मध्ये घडत होते . याचेच दुष्परिणाम , वर वर्णन केल्या प्रमाणे सरदार घरण्यांच्या दुसर्‍या / तिसर्‍या पिढीच्या वारसांत दिसला , जी मुळीच लायक आणि कर्तुत्ववान नव्हती .   

 

३ – तिसरा दोष – अशा व्यवस्थे मध्ये , पेशवे वा मंडळ यांची स्वता:ची किंवा राज्याची अशी स्वतंत्र फौज / लश्कर / आरमार नव्हते . जे होते ते फार मर्यादित व पेशव्यांचे / छत्रपतींचे  [ हुजरातीचे ] रक्षण करण्याकरिता असे . ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे ,अशी मोठी फौज पदरी बाळगण्या करिता लागणारा पैसाच रियासतीकडे कधी नव्हता . पैशाची नेहमीच चणचण ! ( कदाचित, शाहू महाराज / बाळाजी विश्वनाथ यांनीच असे ठरवले असेल )  प्रत्यक्ष शत्रूशी लढताना त्यांना , मराठी सरदारांच्या फौजेवरच प्रामुख्याने अवलंबून राहावे लागत होते . ह्याचा परिणाम नेहमी दिसायचा . अब्दाली ( पानिपत ), निजाम , इंग्रज वगैरे बाह्य शत्रूंशी लढतांना – नेतृत्व जरी पेशवे करीत असले तरी जवळ पास सगळी फौज , ही इतरांची असे . शिवाय प्रत्यकाने , कधी निघायचे , किती फौज घेऊन याचे हे त्या त्या सरदारांवर अवलंबून असे . अशी धेडगुजरी व्यवस्था घेऊनच पेशव्यांना लढाया कराव्या व जिंकाव्या लागल्या . १७९५ च्या खरड्याच्या लढाई पर्यन्त , बहूतांश लढाया जिंकल्या सुद्धा ! त्याकाळी अशीच रीत जवळपास सर्व राजवटीन मध्ये होती ! [ शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मात्र , राज्याची स्वतंत्र फार मोठी फौज / आरमार होते , जे त्यांच्या अधिपत्त्या खाली होते . सरदारांच्या फौजेवर महाराज फारसे अवलंबून नव्हते . तशीच व्यवस्था ईस्ट इंडिया कंपनी कडे होती . फौजे करिता , कंपनी फक्त त्यांच्या मांडलिक सुभेदारांवर अवलंबून नव्हती . निजाम , अवध असे सुभेदार लढायात फौजा पाठवायचे , परंतू कंपनिकडे स्वता:ची अशी स्वतंत्र फौज होती , जी त्यांनी त्यांच्या पद्धती प्रामाणे , प्रशिक्षण  देऊन ( कवायती ) तयार केलेली असे .  १७७४ च्या सुमारास कंपनीच्या पदरी सुमारे ५३ हजार फौज होती .पैकी सुमारे ४० हजार एतत्देशीय फौज असून , १३ हजार गोरी फौज होती .कंपनी स्वता:ची फौज उभारू शकली कारण त्यांच्या कडे तेव्हडा पैसा होता ! ह्याचा फायदा त्यांना मिळाला ]    

 

अशा – परिपूर्ण नसलेल्या व्यवस्थेच्या यशस्वीतेचा पुरावा , मराठी राजवटीच्या , विविध जीवघेणे आघात सोसूनही , वेगाने झालेल्या विस्तारा मध्ये  सापडतो . शिवाय , हेही सिध्ध झाले की , कितीही दोष ह्या व्यवस्थे मध्ये असले तरी , १८ व्या शतकाच्या शेवटी आणि १९ व्या शतकाची आरंभी , एकमेव मराठी राजवट ,  हीच काय ती ,  उभ्या भारतात , इंग्रजांना टक्कर देणारी , शिल्लक राहिली होती ! असे असूनही , अशा व्यक्ति केन्द्रित  व औपचारिक  व्यवस्थेतील कच्चे दुवे ह्याच कालखंडात उघडे पडून , राजवट  वेगाने विनाशाकडे गेली !

 

ब १.३ ) पेशवे घराण्यातील दुही आणि महत्वाच्या सरदार घराण्यातील ( शिंदे , होळकर , गायकवाड , भोसले इ ) सत्तेकरता झालेली भांडणे

महत्वाची सरदार घराणी – होळकर ( इंदोर ) , शिंदे ( ग्वाल्हेर ) , गायकवाड ( गुजरात ) , भोसले ( नागपुर ) , पवार ( धार ) हे मराठी रियासतीचे आधारस्तंभ होते . ह्या सर्व घराण्यात कर्तुत्ववान पुरुष – मल्हार राव होळकर , राणोजी शिंदे , राघूजी भोसले , आनंदराव पवार इ होऊन गेले . ह्यांनी मिळून मराठी राजवट  , खासकरून उत्तरेत वाढवली . १७६१ च्या जीवघेण्या परभवा नंतर सुद्धा , महादजि शिंदे , यांनी प्रथम, माधवराव पेशवे व नंतर नाना फडणीस यांच्या बरोबर काम करून , उत्तरेत मराठी सत्ता पुनरस्थापित केली . मोगल , रोहिले , जाट , राजपूत यांना वठणीवर आणले आणि मराठी राजवटीचा  दरारा परत बसवला . असे जरी माधवरावांचे कर्तुत्व असले , तरी त्यांच्या कारकिर्दीत राघोबादादा यांनी सतत कट कारस्थाने करून मोडता घातला . त्यामुळे माधवरावांना त्यांच्या ११ वर्षाच्या कारकीर्दीतली महत्वाची वर्षे आणि शक्ति , राघोबाबदादा व त्यांची  कारस्थाने निपटण्यात गेली . त्यामुळे , इंग्रज आणि हैदर ह्या दोन उदयोन्मुख शक्ती व धोक्यांकडे , जेव्हडे लक्ष द्यायला हवे होते, ते देता आले नाही .  

राघोबा दादांच्या पेशवाईच्या लोभापायी , माधवराव असतानाच , १७६२ पासूनच  राघोबा दादांच्या वागणूकीतून , ह्या दुहीला सुरवात झाली , व पुढे ती वाढत जाऊन शेवटी आपापसातील लढाया आणि शेवटी दादा साहेबांच्या कैदेत तिचे पर्यवसन झाले . ह्या दुहीचा प्रतिध्वनि / प्रतिक्रिया , बर्‍याच सरदार घराण्यात दिसूलागली . तेव्हापासूनच सरदार घराण्यात फाटाफूटीला सुरवात झाली . एकाने माधवरावांचा पक्ष  घेतल्यास , दूसरा राघोबदादांचा घेत असे किंवा उलटे सुद्धा होई . अशी उभी दुही माधावरावांनी जरी काबूत ठेऊन , आपला वचक निर्माण केला , तरी त्यांच्या मृत्यू नंतर मात्र  , दादासाहेबांच्या  हट्टामुळे , तिचे पर्यवसन नारायणरावच्या शनिवारवाड्यातील खुनात ( १७७३ ) झाली . ही घटना संपूर्ण मराठी रियासतीला हदरवून टाकणारी होती . त्यातूनच बारभाईचा ( नाना फडणवीस व इतर ) उदय होऊन , सवाई माधवराव पेशवे यांना जन्मा नंतर , फक्त ४० व्या दिवशी ( २९ मे १७७४ – पुरंदरवर  ) पेशवाई मिळण्यात झाली . 

प्रत्यक्ष पेशव्यांच्याच घरात दुफळी निर्माण झाल्यावर , इतर सरदार घराण्यांच्या बाबतीत त्याचे   परिणाम होणे ओघाने आलेच .रियासतीत झालेल्या ह्या उभ्या दुही मध्ये , प्रत्येक सरदार घराण्यातील वारसा हककवरून झालेले वाद / आपापसातीतल भांडणे / लढाया , ह्यामुळे भर पडली ! ह्या दोन्ही गोष्टींचा फायदा इंग्रज , निजाम सारख्या शत्रूंनी घेतल्यास तो , त्यांचा दोष नसून , तसे करणे हे राजकारणात अपरिहार्य होते . अशा दुहेरी आघाताचा – पेशव्यांच्या घरातील आणि गायकवाड , होळकर , शिंदे , भोसले घराण्यातील अंतर्गत दुही / भांडणाचा परिणाम , मराठी राजवट  खीळ-खिळी होण्यास सुरवात झाली .       

ह्या सर्व सरदारात , कर्तुत्ववान सरदारान पैकी , महादजि शिंदे ( १७२५ – १७९४ ) हे शेवटले , ज्यांनी वरील कामगिरी शिवाय इतर महत्वाची कामे केली उ – कवायती फौजेची उभारणी , होळकर घराण्यातील मतभेत मिटवण्याचे  प्रयत्न , मराठी रियासतीतील अंर्गत मतभेदांना समजूतदारपणे , एका मर्यादेत ठेवले . सर्वात महत्वाचे म्हणजे , इंग्रजांना यशस्वीपणे तोंड देऊन , त्यांना डोके वर काढू दिले नाही . अशातर्‍हेने मराठी राजवटीची निस्सीम, निरलस सेवा केली ! १७९४ मध्ये पुणे भेटीवर आले असताना ते मृत्यू पावले . हा रियासतीला बसलेला , फार मोठा धक्का  होता . त्यानंतरही , नानांनी अत्यंत कौशल्याने परिस्थिति हाताळून, निजामा विरुद्ध जवळ जवळ सर्व मराठी सरदारांची एकी घडवून , त्याचा खरड्याला १७९५ मध्ये पराभव केला व मराठी राजवटीची किर्ति उत्तुंग केली !

सवाई माधवरावांच्या १७९५ मधील मृत्यू  नंतर १७९६ मध्ये दूसरा बाजीराव ( दादा साहेबांचा पुत्र ) पेशवा झाला . नानांच्या १८०० मधील मृत्यू नंतर मात्र परिथिति झपाट्याने बदलत गेली . १७९५ मध्ये दिसलेली एकी  झपाट्याने नष्ट होऊ लागली . दुसर्‍या बाजीरावच्या कारस्थानी व नालायकी मुळे , प्रत्येक सरदार आपापले हित जपून जवळपास स्वतंत्र होऊ लागला . शिंदे , होळकर , पवार , गायकवाड , पटवर्धन इ मोठे सरदार स्वतंत्र वागू लागले व आपापसात भांडू लागले . संपूर्ण राज्याचा विचार तर सोडाच पण इंग्रजांशी सामना करायचा असेल तर , परस्पर सहकार्य व एकी करावी हा विचार सुद्धा मागे पडला . [ दुसर्‍या मराठे इंग्रज युद्धात ( १८०२/३ ) , शिंदे आणि भोसले यांच्या मदतीला , यशवंतराव होळकर गेला नाही . ते तिघे एकत्र लढले असते तर इंग्रजांचा पराभव नक्की झाला असता . नंतर  इंग्रजांनी एकट्या यशवंतराव होळकरला गाठले , तेव्हा त्याचे डोळे उघडले , परंतु तो पर्यन्त वेळ निघून गेली होती ] त्यामुळेच इंग्रजांचे फावले आणि “ फोडा आणि झोडा “ ह्या राजकारणाचा वापर करून एकेका सरदाराशी सामना केला .

ब २  ) आर्थिक दुर्बलता – सतत पैशाची चण चण

कोणत्याही काळातील राजवट , जर आर्थिक बाबतीत कमकूवत असेल , तर तिचे स्थान डळमळीत व्हायला वेळ लागत नाही ! हे १८ व्या शतकात जेव्हडे लागू होते , तेव्हडेच २१व्या शतकाच्या काळातही ते लागू आहे ! प्रत्येक बाबतीत पैशा वाचून अडते व ही गोष्ट लष्करी , राजकीय प्रगतीच्या आड येते . हे एक कालातीत सत्य आहे . ही गोष्ट शिवाजी महाराजांनी पूर्ण पणे ओळखली  होती आणि त्यांनी त्यांची राजवट पैशाच्या बाबतीत स्वयंपूर्ण केली होती !

मराठी राजवटीच्या विस्तारामागे प्रमुख किंवा एकमेव कारण हे आर्थिक चणचण हेच होते , असा निष्कर्ष रियासतकारांनी काढला आहे . “ या दृष्टीने मराठी राज्याचा फैलाव व नाश हे दोन्ही प्रकार केवळ द्र्व्येच्छे मुळे उद्भवले असे दिसून येते “ . ( मराठी रियासत   – खंड -४ – गो. स . सरदेसाई – पान ३ ते ५ . “ मराठशाहीचा उत्कर्षाप्कर्ष , आर्थिक बाजू “  )  या लेखात रियासतकारांनी – सतत आर्थिक विवंचना , द्रव्यार्जनात अगतिकता , द्र्व्योत्पादनासाठी स्वार्‍या - आशा तीन शीर्षका खाली विस्ताराने हा विषय चर्चिला आहे व तो वाचनीय आणि विचारकरायला लावणारा आहे . पान ५३ वर ते म्हणतात “ मोगल बादशाहीत बंगाल प्रांत संपन्न म्हणून मशहूर होता . औरंगजेबाच्या युद्धास द्र्व्याचा पुरवठा बंगालने  केला “.( असे समृध्द्ध प्रांत मराठी राज्यात शेवट पर्यन्त नव्हते . )

“ १८ व्या शतकात - ,मोघाल साम्राज्याच्या एकंदर राष्ट्रीय उत्त्पंना पैकी ५० % वाटा हा बंगाल सुभ्याचा होता “

The Mughal Empire had 25% of the world's GDP. Under the Mughals, Bengal Subah generated 50% of the empire's GDP, and thus had 12% of the world's GDP.[7] Bengal was an affluent province that was, according to economic historian Indrajit Ray, globally prominent in industries such as textile manufacturing and shipbuilding.[8] https://en.wikipedia.org/wiki/Bengal_Subah) 

 आर्थिक बाबतीत दूसरा संदर्भ आपणास नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ईस्ट इंडिया कंपनी संबंधीच्या पुस्तकाच्या परीक्षणातून मिळतो . त्या पुस्तकाचे लेखक Mr.William Dalrymple पुस्तकात म्हणतात   “ बंगाल हा कंपांनीच्या शासनाखाली येणारा पहिला प्रदेश बनला . व्यापारी संस्थे पासून   एका सामर्थ्यशाली सत्तेपर्यंत कंपनीचा प्रवासही प्रथम इथेच झाला .”  “तांत्रिक प्रगति पेक्षा भारतातील अफाट आर्थिक सामर्थ्य हाच भारतातील त्यांच्या बंगाल नंतरच्या विजयाचा पाया असल्याचे त्याचे लेखक आवर्जून सांगतातपहा लोकसत्ता – २२ फे २०२० , पान ८ , निखिल बेललरीकर यांचे Mr.William Dalrymple’s “ The Anarchy – The East India Company Corporate Violence and the Pillage Of an Empire “ Blumbari Publishing – चे परीक्षण )

रियासतकार आणि Mr.William Dalrymple ह्यांच्यानुसार -  कंपनी आणि मराठी राजवटीच्या उत्कर्ष किंवा अपकर्ष यांच्या मागे , समर्थ किंवा कमजोर आर्थिक बाजू हे महत्वाचे कारण आहे, हे मत सहज पटण्या सारखे आहे .  ( दोघांनीही , वेगवेगळ्या काळात २० आणि २१व्या शतकात , वेगवेगळ्या ठिकाणी राहून , आर्थिक बाबतीत, तोच निष्कर्ष काढला आहे , हे लक्षात घेण्या सारखे आहे ! आर्थिक बाजूचा रियासतीवर झालेला परिणाम , ह्या बाबतीत , मराठीत बरेच संशोधन होणे जरुरीचे आहे  )

मराठी रियासतीला अशी आर्थिक चण चण भासण्या मागचे, पहिले कारण –१७०७ मधील शाहू महाराजांच्या सुटकेच्या वेळेपासूनच चणचणीनेच झालेली सुरवात .  शाहू  महाराजांची सुटका झाली ( १७०७ ) तेव्हा मराठी राजवट जिवंत असली तरी खजिना रिकामा होता . त्यामुळे त्यांना सुरवती पासूनच कर्ज काढून राज्य करावे लागले . त्या कामी बाळाजी विश्वनाथ यांनी मोलाची मदत केली . दुसरे म्हणजे , जरी दक्षिणेतील ६ सुभयांच्या चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा १७१९ मध्ये बाळजिनी  दिल्लीहून आणल्या , तरी त्याची आममलबजावणी करून पैसे मराठी राजवटीत येणे हे सहज व आपोआप होणारे काम नव्हते . निजाम व इतर मोगल सुभेदार व सरदार हे त्यास विरोध करत होते . ( कारण त्यामुळे त्यांचे भवितव्य पणास लागणार होते . ) त्या करताच बाजीराव व चिमाजी अप्पास मोहिमा काढाव्या लागल्या . १७०८ नंतर कर्जाने सुरवात – कर्ज वसूली करिता मोहिमा – मोहिमेचा खर्च पुरा करण्या करता कर्ज – परत मोहिमा – परत कर्ज , असे चक्र शेवट पर्यन्त चालू होते . मराठी राजवट  ह्या चक्रातून कधीही बाहेर पडू शकली नाही !

उदारहरणार्थ -  बाजीरावने चिमाजी अप्पास लिहीलेल्या एका पत्रात – एकेठिकणी ७ वाक्यात – ५ वेळेस “ पैका (पैसे)  “ असे शब्द आलेले आहेत –[ मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा ( १७२० – १७४० )– वि गो दिघे – पुरस्कार – राजवट कार सरदेसाई ]. ब्रम्हेंद्रस्वामी यांना लिहीलेल्या एका पत्रात , बाजीराव म्हणतात “ हल्ली , मी बहुतांचा देणेकरी होऊन , माझी कुतरोढ चाललेली आहे; हीच मला नरक यातना वाटते . सावकार व शिलेदार यांच्या पाया पडता पडता , माझ्या कपाळाचे कातडे गेले !( मराठे व इंग्रज  - न चि केळकर –– पान ७८ )  थोरल्या माधवरावाच्या वेळी दौलतीला मोठे कर्ज झाले होते की , मरते समयी माधवरावास ते एक मोठे दू:ख वाटले व त्यांना समाधान वाटावे म्हणून रामचंद्र नाईक परांजपे याने , सावकारस आपल्या नावाचे कर्जरोखे मोबदला करून देऊन , माधवरावास मोकळे केले . नामवंत सरदार परशुरामपंत पटवर्धन , हरिपान्त फडके यांच्या पत्रातून सुद्धा कर्जबाजारीपणाचा बोभाटा फारच दिसून येतो . दुसर्‍या बाजीरावचा सेनापति बापू गोखले , हेही कर्जा मुळे हैराण झाले होते .

दुसरे महत्वाचे कारण - वतनदारी / जागिरदारी . हे वतनदार / जागिरदार , त्यांच्या मार्फत जमा झालेला त्या भागाचा महसूल ठरलेल्या प्रमाणात सरकारी खजिन्यात जमा करीत नसत किंवा टाळा टाळ करीत असत . ह्या अशा “ गळती “ मुळे , त्यांचे उत्पन्न आणि श्रीमंती जरी वाढत असली , तरी राज्याचे उत्पन्न कमी होत असे . बर्‍याच वेळेस , हे ठरलेले प्रमाण , फार गुंतागुंतीचे असे , ज्यामुळे पेशवे आणि सरदार यांच्यात , उत्पन्नाच्या वाटणी वरून वाद होत .त्यामुळे सुद्धा राज्याच्या खजिन्यात कमी भरणा होत असे .

त्याच प्रमाणे इतर राज्यांकडून करारात / तहात ठरलेले खंडणीचे हप्ते सुद्धा पूर्णपणे वसूल होत नसत .एव्हडेच काय तर , कर्ज काढून केलेल्या स्वार्‍यांच्या खर्चा इतकी खंडणी / चौथाई वसूल होत नसे , ज्यामुळे परत कर्ज काढण्याची वेळ येत असे ! अशा परिस्थितितही  पेशव्यांनी राजवटीच्या कर्जाची पूर्णपणे परतफेड करून राज्य विस्तार केला आणि १०५ वर्षे पेशवाई – पर्यायाने मराठी राजवट  – जिवंत ठेवली  , हे त्यांचे कर्तुत्व मान्य होण्या सारखे आहे !      

तिसरे कारण - भरमसाठ व्याजाने घ्यावे लागणारे कर्ज . पेशवाईच्या सुरवातीच्या काळात व्याज दर खूपच चढा होता [ शाहु महाराजांच्या रोजनिशीत असा , उल्लेख आहे की बाजीराव , जेव्हा सिद्दिच्या स्वारीवर गेले , तेव्हा , स्वारीच्या खर्चा करता काढलेल्या रकमेवर , दरमहा , दर शेकडा – ३ रुपये , म्हणजेच दारसाल दर शेकडा  ३६ रुपये – ३६ % !  इतका होता . नानासाहेबाच्या वेळेस  तो दरमहा दर शेकडा – १ रु पासून १ १/२ रु पर्यन्त इतका होता - १२ ते १८% पर्यन्त असलेला दिसतो ]  इतक्या भरमसाठ व्याजाने घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची रक्कम जर , मुद्दलाच्या जवळपास जाणारी असेल तर , परतफेड करणार्‍याचे  हाल झाल्यास नवल नाही . घेतलेले कर्ज , त्यावरील भारसाठ व्याज , वाढलेले खर्च व त्या प्रमाणात उत्पन्नाची वाढ न होण्याने , मराठी राजवटीला पैशाची चण चण नेहमी जाणवत असे .

चौथे कारण – ईस्ट इंडिया कंपनीकडे बंगाल , बिहार सारखे भरघोस उत्तपन्न देणारे प्रेद्श व गंगा यमुना पलीकडील प्रदेश आणि कर्नाटक या सारखे सुपीक प्रदेश होते . तसे भरपूर उत्तपन्न देणारे कोणतेच प्रदेश , मराठी रियासती कडे नव्हते . त्यामुळे शत्रूंचा पराभव करून , नंतर खंडणी/ चौथाई – सरदेशमुखी , वसूल करण्या वरच भर द्यावा लागत होता . अशा ह्या चार महत्वाच्या कारणांमुळे मराठी राजवट  कधीच " सुखवस्तू " झाली नाही . ( कंपनीच्या उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा असेच दिसून येते .कंपनीच्या  एकत्रीत भारताच्या उत्पन्न मध्ये बंगाल , मद्रास व मुंबई इलाख्याचे उत्पन्नाचे आकडे हेच दर्शवतात – १७९२ – अनुक्रमे – ६७ % ,३०% आणि ३ % , १८०९/१० – ६१% , ३४ % आणि मुंबई फक्त ५ % , १८२१/२२ – ६१% , २५ % आणि मुंबई वाढून १४ % होते ! ) 

जवळपास शेवट पर्यन्त , मराठी राजवट  ही – कर्ज काढून , वसूली करिता स्वार्‍या , स्वार्‍यांकरिता झालेल्या खर्चा मुळे परत कर्ज – ह्या चक्रातून बाहेर पडू शकली नाही ! राज्याचे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ कधी जमला नाही . पैशाच्या बाबतीत उसंत कधीच मिळाली नाही. नेहमीच हता तोंडाशी गाठ . त्याचे पर्यवसन पेशवाईत , सततचा कर्जबाजारीपणा असलेले राज्य  होण्यात झाली !

अर्थकारण आणि लष्करी सामर्थ्य यांचा संबंध

“ सैन्य पोटावर चालते “ ही उक्ती प्रसिध्द्ध आहे . सैन्य उभे करून , मोहिमा किंवा लढाया करणे , ह्या करता “ पैसा “ लागतो , हे १८ व्या शतकातही लागू पडत होते आणि आजही त्याच प्रामाणात ,लागू आहे .  त्याबाबतीत , खलील आकृती , १८ व्या शतकात “ अर्थ चक्र “ कसे काम करत होते हे दाखवते

आकृती – १ -  अर्थ चक्र आणि प्रदेश विस्तार     

            

 १८ व्या शतकात , दोन्ही - मराठी आणि इंग्रजी – राजवटीच्या बाबतीत हे “ अर्थ चक्र “ काम करत होते . असे “ अर्थ (धन/पैसा) चक्र “ – दोन्ही दिशांनी फिरते ! चढया चक्रात , अधिक पैसा , अधिक सैन्य , अधिक प्रदेश व त्यातून अधिक पैसा , असे चढे / वाढत जाणारे चक्र तयार होते . पण काही कारणा मुळे हे चक्र , थांबले किंवा तुटले , तर ते लगेच उलटे किंवा उतरत्या क्रमाने काम करते ! कमी पैसा , कमी किंवा भाडोत्री सैन्यावर भर , या मुळे पराजय . त्या मुळे प्रदेश आक्रसतो , त्यामुळे परत कमी उत्पन्न व कमी सैन्य ! आशा रीतीने क्रमा क्रमाने राज्य , उत्पन्न व सैन्य कमी कमी होऊन शेवटी ती राजवट फक्त नावापुरती उरते !  चढया चक्रा मुळे प्रदेश / राज्य विस्तार होत जातो , परंतू उतरत्या चक्रामुळे , राज्य / प्रदेश आक्रसत जाऊन , शेवटी विलय होतो !

 

   मराठी राजवट  आणि इंग्रज ( कंपनी ) हे दोघेही , ह्याच “ चक्रातून “ गेले . मराठी रियासतीचे चक्र , १७६१ च्या पानिपत परभवा मुळे थांबले आणि नंतर ह्याच चक्राचा “ उलटा “ प्रवास सुरू झाला ! परंतू कंपनीचे तसे झाले नाही . १७५७ प्लासी आणि १७६४/५ च्या बकसरच्या लढायानंतर हेच चक्र , सतत चालू राहून , शेवटी १८१८ मधील पेशवाईच्या शरणागती पर्यन्त चढत्या क्रमाने  वाढतच गेले . १७६५ मध्ये कंपनीचे भारतातील एकंदर उत्पन्न – रु १.९६ कोटी होते(लष्करा वर खर्च – रु १४ लाख )  . ते चढत्याक्रमाने वाढतच गेले . १७७५ – रु ३.८९ कोटी (लष्कर खर्च – ७७ लाख ) , १७८५ – रु ६.४६ कोटी (लष्कर खर्च – ३६५ लाख ) कोटी झाले , १७९५ – रु ८.०२ कोटी ( लष्कर खर्च – ३६५ लाख ) , १८०५ – रु १७.५६ कोटी (लष्कर खर्च – ८४५ लाख ) कोटी इतके होते . उत्पन्न वाढी मुळे , कंपनी सैन्य संख्या वाढवू शकली . १७५७ –ला प्लासीच्या लढाई च्या वेळेस कंपनी कडे फक्त ३००० च्या आसपास सैन्य होते . १७७०-८० पर्यन्त ते ३५,००० झाले . १७९०-१८०० पर्यन्त वाढून ७०,००० झाले . शेवटी दुसर्‍या इंग्रज – मराठी राजवटीच्या युद्धाच्या वेळेस – १८०० – १८१० दरम्यान ते १,५३,००० इतके वाढले , जे त्या वेळच्या – शिंदे , होळकर , भोसले – यांच्या एकत्रीत सैन्याच्या तुल्यबळ होते . अशा मोठ्या व शिस्तबद्ध सैनिकांच्याच जोरावर , गव्हर्नर वेल्सलीने , एकाच वेळेस वेगवेगळ्या आघाड्यांवर मोहिमा काढून – प्रथम १७९९ – टिपू आणि नंतर १८०३ – ५ दरम्यान – शिंदे , भोसले व मग होळकर ह्यांचा पराभव करून , मराठी रियासतीचे आधारस्तंब मोडून काढले आणि पेशव्यांना एकटे पाडले .

ह्याच कालखंडात – मराठी राजवट  , निजाम , हैदर / टिपू , ह्यांचे उत्पन्न कमी कमी होत गेले ! पेशव्यांचे उत्पन्न – १७६० ते १८०० पर्यन्त जवळपास ४ - ५  कोटी एव्हडेच स्थिर होते , जे १८१३ मध्येते २ कोटी पर्यन्त घसरले आणि १८१८ मध्ये ते १.६ कोटी एव्हडे कमी झाले , असा अंदाज आहे.

 

चढया अर्थ चक्राचा दूसरा परिणाम हा सैन्याच्या  रचनेवर होतो . स्वता:चे सैन्य वाढल्यामुळे , भाडोत्री सैनिकांवर कमी अवलंबून राहता येत असे . त्यामुळे १७९० च्या सुमारास कंपनीकडे स्वता:चे व भाडोत्री सैन्य व इतर यांचे गुणोत्तर ३:१ इतकेच होते . या उलट १८०० च्या सुमारास शिंदे / होळकर , भोसले , इत्यादींच्या सैन्या मध्ये भाडोत्री ( पेंढारी ) सैनिकांचा जास्त भरणा होता - कारण उत्पन्नच कमी होत गेले होते !  आशा भाडोत्री सैनिकांचा जास्त भरणा असलेल्या सैंनिकांचा सामना जेव्हा कंपनीच्या स्वता:च्या शिस्तबद्ध सैन्यावर भर असलेल्या सैन्याशी पडायचा , तेव्हा बहुतेक वेळेस इतरांचा पराभव होत असे . ( ह्याचा अर्थ नेतृत्व , लष्करी व्यूह रचना इ गोष्टी कमी महत्वाच्या होत्या असे नाही )

१८ व्या शतकातल्या कोणत्याही राजवटीत , अर्थकारण आणि राज्य विस्तार / विलय यांचा सरळ सरळ संबंध होता . अर्थातच – राजकारण , नेतृत्व , परंपरा , प्रदेश , एकी/ दुही इ गोष्टी सुद्धा महत्वाच्या होत्या . बहुतेक वेळेस अर्थकारण आणि राज्याचे लष्करी सामर्थ्य याचा संबंध दुर्लक्षीला जातो . परंतू कंपनी आणि एतत्देशीय राजवटींच्या बाबतीत तो फारच महत्वाचा ठरला !

                                          ....या पुढील लिखाण, भाग – ३ वर

 

 

                                             

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा