Menu

मराठी राजवटीच्या र्हासाची कारणे – भाग – १

 

मराठी राजवटीच्या र्हासाची कारणेभाग – १

मराठी राजवटीच्या र्हासामागील कारणे – एक चिंतन

मराठी राजवटीची पार्श्वभूमी

मराठी राजवटीची सुरवात १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला तेंव्हा पासून झाली  . राजवटीचा  अंत , १८१८ मध्ये , दुसरा बाजीराव , इंग्रजांना शरण जाऊन त्याने पेशवाई वर उदक सोडले तेंव्हा , झाला . मराठी राजवटीचा  कालखंड एकंदर १४४ वर्षांचा भरतो . त्यामध्ये बरेच चढ उतार आणि स्थित्यंतरे आली . १६८० मधील शिवाजी महाराजांचा अचानक मृत्यू , १६८९ मधील संभाजी राजांचे औरंगजेबाच्या हतून झालेले शिरकाण , १७०० मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू , नंतरचा १७०७ पर्यंतचा तराराणीचा एकाहाती लढा . १७०७ मधील औरंगजेबाचा मृत्यू , लगेच शाहू महाराजांची मोगलांनी केलेली सुटका  आणि १७०८ मध्ये त्यांनी  स्वता:चा केलेला राज्याभिषेक , येथ पर्यन्त मराठी राजवट  ही जवळपास महाराष्ट्रापुरतीच सीमित होती ( अपवाद फक्त दक्षिणे कडील , काही प्रदेश जिंजी इ जो शिवाजी महाराजांनी जिंकला होता ) . मराठी राजवट  विस्तारली ती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत . विशेषता: १७२० ते १७४० मध्ये थोरले बाजीरावांच्या नेतृत्वा खाली ती माळवा , बुंदेलखंड ( उत्तर प्रदेशचा एक भाग ) इथपर्यंत पसरली . पुढे नानासाहेब पेशवा यांच्या कारकिर्दीत १७६० पर्यन्त , ती जवळपास भारतभर पसरली . नंतर १७६१ मधील पानिपतच्या पराभवा मुळे तिची थोडी पीछेहाट झाली , परंतु , थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत १७७२ पर्यन्त , ती पुन्हा प्रस्थापित झाली. हीच स्थिति पुढे , नाना फडणीस  ( बारभाई ) व महादजि शिंदे यांच्या नेतृत्वा मुळे , १८०० पर्यन्त कायम होती .

म्हणजे १६७४ च्या राज्याभिषेकापासून १८०० पर्यन्त जवळजवळ १२६ वर्षे , मराठी राजवट  विविध आघात ( शिवाजी महाराज , संभाजी व राजाराम महाराजांचे लागोपाठचे मृत्यू , औरंगजेबाची स्वारी , छत्रपतींच्या दोन ( कोल्हापूर / सातारा ) गाद्या , पानिपत , अंतर्गत दूही , नारायणरावांचा खून , इ ) पचवून , नुसती जगलीच नाही तर ,तिने उभारी घेऊन भारतभर आपले हातपाय पसरले !   परंतु त्यानंतर , १८०० ते १८१८ पर्यंतच्या फक्त १८ वर्षात , राजवट  अस्ताला गेली ! थोडक्यात , १७२०-४० च्या फक्त २० वर्षात तिचा फार वेगाने विस्तार झाला व १८०० पासून तिच्या र्हासाला सुरवात होऊन , १८१८ पर्यन्त च्या १८ वर्षात ती लयाला गेली सुद्धा ! ज्या वेगाने ती विस्तारली त्याच वेगाने तिचा र्हास झाला ! 

मराठी राजवटीचा  र्हास  

मराठी राजवटीच्या र्हासमागील कारणां बद्दल बर्‍याच इतिहासकारांनी व अभ्यासकांनी विस्ताराने लिहिले आहे . र्हासा मागील कारणां मध्ये , मराठी सरदारांस असलेली वतनदारीची हाव ,  शास्त्रीय आणि चौकस दृष्टीकोनाचा अभाव , कवायती फौजेचा पुरेशा प्रमाणात न केलेला अंगीकार आणि “ गनिमी काव्यावर / घोड दळावर “ जास्त भर  , निकृष्ट तोफखाना , ब्राम्हण समूहा विषयीचा पक्षपात व त्यांच्यातील वितुष्ट , धार्मिक बाबींचा पेशवाईतील पगडा इ दाखवण्यात आलेली आहेत . अशा बाबी महत्वाच्या आहेत व त्याचा थोडा फार परिणाम मराठी रियासतीवर झाला असेलही . ह्या बाबीन मुळे, काही घटना तशा का घडल्या, ह्याचा उलगडा होऊ शकतो . परंतू राजवटीच्या र्हासाला ह्या फक्त अशा गोष्टी कारणीभूत झाल्या असे मानणे हे अयोग्य आहे . कारण त्यामुळे , मूलभूत अशा कारणांकडे लक्ष जात नाही !

भारतभर पसरलेल्या व शंभर वर्षाहून जास्त टिकलेल्या मराठी राजवटीच्या र्हासामागे मूलभूत अशी कारणे असायला हवीत . अशी मूलभूत कारणे सर्वसाधारण पणे – रचनात्मक , धोरणात्मक , दिशात्मक  किंवा सामाजिक , आर्थिक – अशी असतात . तशी ती आहेतही !  ( कधी कधी  दैव / नियती हेही महत्वाचे कारण ठरू शकते ! हा विषय पुढे विस्ताराने येईल ! ) 

मराठी राजवटीच्या र्हासाला सुद्धा “ उदय- अस्त “ हा जगाचा नियम लागू होतो . त्याला कोणताही आणि कोणीही अपवाद नाही . प्रत्येक राजवट / राजवट  , जशी जन्माला येते , तशीच ती अस्तालाही जाते . मोगल , आदिलशाही , कुतुबशाही , व अगदी इंग्रजी राजवट  ही सुद्धा अस्ताला गेली ! त्यामूळेच आपला शोध हा महत्वाच्या दोन प्रश्ना  पुरता केन्द्रित होऊ शकतो .

पहिला प्रश्न - मराठी राजवटीच्या र्हासाची कारणे काय होती ? तिचा र्हास लांबू शकला असता का ? दूसरा प्रश्न - तो एव्हड्या वेगाने का झाला ? पहिल्या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे  आहे . त्यात मराठी राजवटीची  रचना , पेशवाई , सरदार घराणी , शेवटच्या कालातले नेतृत्व इ अंतर्गत कारणे आहेत . त्याच बरोबर इंग्रज ( ईस्ट इंडिया कंपनी )  , हे बाह्य कारणही आहे . तात्पर्य -  अंतर्गत व बाह्य आशा दोन्ही कारणां मुळे र्हास झाला. दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि स्पष्ट आहे – १७९५ नंतरचे नेतृत्व नालायक निघाले !

अ ) १ ) मराठी राजवटीचा  र्हासा मागील कारणे काय होती ? तो लांबू शकला असता का ?

२ ) १८०० नंतर , फक्त १८ वर्षात इतक्या वेगाने , ही  राजवट  अस्ताला  कशी गेली ?

दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर लेखाच्या शेवटी आहे . पहिल्या प्रश्नाच्या उपप्रश्नाचे उत्तर हे निसंशय , तो लांबू शकला असता असे आहे . मराठी राजवटीचा  र्हास एव्हड्या लवकर – १४४ वर्षात झाला नसता . तो झाला याचे प्रमुख कारण – राज्यकर्त्यांना लाभलेले अल्पायुष्य ! त्याच बरोबर एका मागोमाग झालेले करत्या आणि कर्तबगार पुरूषांचे मृत्यू ! त्याबाबत रियासतकार सरदेसाई यांनी काढलेले उद्गार लक्षात घेण्यासारखे आहेत !

“ मृत्यूच्या दृष्टीने मराठी इतिहास तपासू लागले म्हणजे असे वाटते की मराठ्यांचा भाग्योदय कधी होऊच नये असा परमेश्वरी नेमानेम असावा की काय ? शिवाजी महाराज , बाजीराव व माधवराव पेशवे ही कर्तबगार माणसे दहावीस वर्षे जास्त जगती तर हा इतिहास खात्रीने बदलला असता “ शेवटी ते म्हणतात “ मराठी राज्य इतक्या लवकर मोडले का , याचे उत्तर दोन माधवराव पेशव्यांचा अकाली मृत्यू होय , हेंच समर्पक मानावे लागेल “ ( मराठी राजवट  – खंड ५ – निग्राहक माधवराव , अपेशी नारायणराव , दुराग्रही रघुनाथराव . १९९० आवृत्ती – पान २६९ ) रियासतकार सरदेसाई सारख्या व्यासंगी , प्रसिद्ध आणि साक्षेपी इतिहासकारांस सुद्धा हे कारण जाणवले !  

इतिहासात , जर – तर हे मंजूर नसले तरी , आपण फक्त एव्हडेच म्हाणू शकतो की मराठी राजवटीचा  र्हास इतक्या लवकर ( फक्त १४४  वर्षात ) व्हायला , कर्तबगार माणसांचे अकाली व लागोपाठचे मृत्यू व राज्यकर्त्या पुरूषांना मिळालेले अल्पायुष्य हेच होय . आणि हेच समाधानकारक उत्तर हया प्रश्नाचे आहे !

 सुरवातीच्या राज्यकर्त्याना लाभलेली  अल्प कारकीर्द ( आयुष्य ):- राजवटीच्या सुरवातीच्या स्थापनेच्या काळात पहिल्या ३/४ राज्यकर्त्यांनी  किती वर्षे  राज्य केले  हे अतिशय महत्वाचे असते .त्या राजवटीचे आयुष्य हे बरेचसे त्यावर अवलंबून असते . याच पहिल्या चार राज्यकर्त्यांच्या काळात त्या त्या राज्यकर्त्यांनी राज्य विस्तार केला , आर्थिक उर्जितावस्था आणली  आणि राज्याला सलग असे प्रशासकीय , लष्करी धोरण ठेऊन राज्य केले.  ह्याचा अर्थ त्यांना बंडखोरी , फुटीरता इत्यादींचा सामना करावा लागला नाही असे नाही . हे सर्व होऊनही त्यांच्या राजवटीला त्यांनी शक्ति व स्थैर्य दिले .ह्या पहिल्या चार राज्यकर्त्यांच्या आयुष्याशी , कर्तुत्वाशी – त्या त्या राजवटीची पुढील वाटचाल , यशापयश अवलंबून असते !  

मोगली राजवटीला  , पहिल्या ४ पातशाहांच्या काळात – अकबर (१५५६), जहांगीर , शहजहान व औरंगजेब ( १७०७ ) , जवळ जवळ १५० वर्षे स्थैर्य लाभले . म्हणजेच एकेका राज्यकरत्याने ( पातशाहाने )  - सरासरीने जवळपास ३८  वर्षे राज्य केले . इतर समकालीन काही राजवटीतील पहिल्या चार राज्य कर्त्यांचा कार्यकाळ – अहमदनगरची निजामशाही – ९८ वर्षे  (  १४९० ते १५८८ ) , विजापूरची आदिलशाही- ६८ वर्षे  (  १४९० ते १५५८  ) , गोवळ्कोंड्याची कुतुबशाही -६२ वर्षे  (  १५१८ ते १५८० ).

मोगलांच्या पहिल्या ४ पातशाहांनी जेवढे राज्य केले ( १५० वर्षे ) तेव्हड्याच कलावधीत , संपूर्ण मराठी राजवट  - भोसले व पेशवे घराणी यांनी राज्य करून , १४४ वर्षात अस्तास ही गेली !

मराठी रियासति मध्ये कारकिर्दीची विभागणी – छत्रपती व पेशवाई अशी झाली होती . १६७४ ते १७१३ – पहिली ३९ वर्षे – छत्रपतींनीच कारभार केला . परंतु १७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाईची वस्त्रे मिळाल्यावर , पेशवे हे कारभारी बनले . तेंव्हा पासून पेशवाई सुरूझाली , ती १८१८ पर्यन्त होती .

पहिल्या ५  राज्यकर्त्यांची ( छत्रपतीची ) - फारच अल्प अशी कारकीर्द -  शिवाजी महाराज , १६७४ मधील राज्याभिषेका नंतर फक्त ६ वर्षे जगले . गादीवर बसल्या नंतर , शंभू राजे – ९ , राजाराम – ११ , तारा राणी ( आपण छत्रपती समजू ) १७०० ते १७०८ पर्यन्त राज्य  करू शकली . शाहू महाराजांनी १७०८ ते १७१३ पर्यन्त – छत्रपती आणि कारभारी म्हणून राज्य केले  ( तो पर्यंत, कारभारी आणि छत्रपती ही दोन्ही पदे त्यांच्याकडे होती. १७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथला पेशवाईची वस्त्रे दिली .   छत्रपती म्हणून त्यांनी १७०८ ते १७४९ – ४१ वर्षे राज्य केले . त्यांच्याच राजवटीत राजवटीचा  सर्वात जास्त विस्तार झाला ! )  .  छत्रपती शिवाजी महाराज ( १६७४ राज्याभिषेक ) ते  शाहू महाराज (१७१३ ) पर्यन्तच्या ३९ वर्षात – ५ छत्रपतींनी स्वता: राज्य केले. म्हणजेच त्यांचा कार्यकाल हा सरसरीने फक्त ८ वर्षे होतो .(मोगलांच्या पहिल्या ४ राज्यकर्त्यांची कारकीर्द सरासरीने ३८ वर्षे भरते !) 

मराठी राजवटीच्या इतर राज्यकर्त्यांची ( पेशव्यांची ) कारकीर्द

शाहू महाराजांचा कार्यकाळ हा ४१ वर्षांचा होता ( १७०८ ते १७४९ ) . त्यांच्या सुरवातीच्या काळात ,  परिस्थिति  मुळे त्यांनी , बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे ( पहिले प्रधान ) म्हणून नियुक्त केले ( १७१३ ) . तेव्हा पासून “ पेशवाई “ सुरू झाली ती १८१८ पर्यन्त – ३ जून १८१८  ला , दुसर्‍या बाजीरावाने , आशिरगडाजवळ – ढोलकोट येथे , जनरल माल्कम याच्या स्वाधीन होऊन , त्याने राज्यावर उदक सोडले , तो पर्यन्त !  म्हणजेच पेशवाई १०५ वर्षे होती . परंतु ह्याच काळात एकंदर ८ पेशवे झाले . बाळाजी विश्वनाथ ( ७ वर्षे ) , थोरले बाजीराव ( २० वर्षे ) , नाना साहेब ( २१ वर्षे ) , माधव राव ( ११ वर्षे ) , नारायण राव व राघोबा दादा ( प्रत्येकी जेमतेम १ वर्ष ) , सवाई माधवराव ( २० वर्षे  ), व शेवटी –  दुसरे बाजीराव ( पळपुटा बाजीराव ) यांनी १८१८ पर्यन्त राज्य केले ( २२ वर्षे ) . ह्या सर्व पेशव्यांच्या बाबतीत कार्यकाल (१७१३ ते १८१८ – ८ पेशवे ) थोडा वाढून – सरासरी ( फक्त १३ वर्षे ) होता .

थोडक्यात , मराठी राजवटीच्या १४४ वर्षांच्या आयुष्यात ( १६७४ ते १८१८ ) - ५ छत्रपती व ८ पेशवे यांनी राज्य केले . एका राज्यकर्त्याने ( छत्रपती व पुढे पेशवे मिळून ) सरासरी फक्त ११ वर्षे राज्य केले . या उलट अगदी अकबर पासून ( १५५६ ) ते १८१८  पर्यन्त , जेव्हा मराठी राजवट  लयाला गेली , तो पर्यन्त १५ पाशहानी , २६२ वर्षे दिल्लीवर राज्य केले . म्हणजेच सरसरीने १७.५  वर्षे राज्य केले . म्हणजेच मराठी राजवटीच्या राज्यकर्त्यांच्या पेक्षा , मोगल राज्यकर्त्यानेरासरिने ६.५ वर्षे जास्त ( ११ वि १७.५ वर्षे ) राज्य  केले . राज्य कर्त्यांच्या - जन्म , मृत्यू , कार्यकाळ सहित यादी कडे नजर फिरवली तरी हे लक्षात येते .

छत्रपती आणि पेशवे या दोघांच्या ही बाबतीत , कार्यकाळ , इतर राजवटीनच्या तुलनेत फारच कमी होता , हे सर्वमान्य होण्या सारखे आहे . विशेषता: मोगल राज्यकर्त्यांच्या बरोबर तुलना केली तर ही बाब कोणास ही लगेच लक्षात येते . कोणत्याही राज्यकर्त्याला – १० / १२ वर्षाचा काळ हा फारच अपुरा असतो – विशेषता: जर ती राजवट  – जवळपास भारतभर पसरलेली असली तर . 

करत्या पुरूषांचे लागोपाठ झालेले मृत्यू  - पेशवाईच्या बाबातीत दुसरी एक विशेष बाब आपल्या लक्षात येते , ती म्हणजे , करत्या सवरत्या पुरुषांचे झालेले – लागोपाठ मृत्यू . थोरले बाजीराव २८ एप्रिल १७४०, मध्ये अकाली मृत्यू पावल्यावर लगेचच त्यांचे सख्खे बंधु , चिमजी अप्पा – १७ डिसेंबर १७४० मध्ये मरण पावले . फक्त ८/९ महिन्यांच्या कलावधीत पेशवाईतील दोन कर्तुत्ववान माणसे मरण पावली . काही इतिहासकार ह्या दोघांना – राम – लक्ष्मण – जोडीची उपमा देतात . दोघांनीही एकमेकांच्या साथीने मोठे पराक्रम केले . ( चिमजी अप्पा काही वेळेस बरेच आजारी  असायचे . याउलट थोरल्या बाजीरावांचे होते. त्यांना झालेल्या पहिल्या आजारा मध्येच त्यांचा अंत झाला . )

अशीच गोष्ट १७६१ मध्ये घडली . पानिपत युद्धात , विश्वासराव ( वय १९ वर्षे ) नानासाहेबांचे मोठे चिरंजीव आणि सदाशिवराव भाऊ – वय ३१ वर्षे  ( चिमाजी आप्पांचा मुलगा  ) दोघेही कामास आले . लगेचच पानिपतच्या धक्क्या मुळे नानासाहेब पेशव्यांचा १३ जून १७६१ मध्येच मृत्यू झाला . थोडक्यात १७६१ च्या पहिल्या सहा माहीत – पेशवाईतील ३ करते सवरते पुरुष मृत्यू मुखी पडले . कोणत्याही घराण्यावर आणि राजवटीवर हा दुहेरी आघात – मोठा व इतिहासाला कलाटणी देणारा पराभव आणि ३ मृत्यू -  जीवघेणा ठरू शकला असता  . परंतु त्यातूनही मराठी राजवट  सावरली .

परत एकदा , १७९४ ते १८०० च्या ६ वर्षात अशाच अकाली व लागोपाठच्या मृत्युचा धक्का मराठी रियासतीला बसला . महादजि शिंदे – १७९४ , नामवंत पराक्रमी सरदार – हरिपन्त फडके – १७९४ , सवाई माधवराव १७९५ , परशुराम भाऊ पटवर्धन – १७९९ , नाना फडणीस – १८०० .विशेषता: महाद्जी शिंदे , सवाई माधव राव आणि नाना फडणीस यांच्या लागोपाठच्या मृत्युन मुळे , मराठी रियातीवर झालेल्या आघातातून , ती सावरली गेली नाही . त्या नंतर फक्त १८ वर्षात –१८१८ मध्ये , मराठी रियासतेचा अस्त झाला  !

अल्पायुषी राज्यकर्ते आणि त्यामुळे अल्प असा राज्य काल त्याच्या जोडीला -  तीन वेळेस , लागोपाठ झालेले करत्या , पराक्रमी आणि महत्वाच्या व्यक्तींचे मृत्यू, हे दोन्ही एकत्र केल्यास त्याचा , रियासतीवर झालेल्या परिणामांची दाहकता लक्षात येऊ शकते .

राज्यकर्त्या व्यक्तींचे मृत्यू हे प्रत्येक राजवटीत होत असतात . महत्वाचे असते – त्यांची कारकीर्द किती वर्षे झाली ( कमी / जास्त )आणि त्यावेळेस आजूबाजूची परिस्थिति कशी होती ( अनुकूल / प्रतिकूल किंवा नाजूक ) होती . प्रतिकूल परिथिति किंवा नाजूक परिस्थिति असताना झालेल्या , महत्वाच्या राज्यकर्त्या व्यक्तिचे मृत्यू हे रियासतीवर महत्वाचे परिणाम करू  शकतात . त्याच्या जोडीला जर त्यांचा कार्यकाळ अल्प असेल तर , परिणाम गंभीर किंवा इतिहासाला कलाटणी देणारे सुध्धा ठरू शकतात . शिवाजी महाराज ( आयुष्य – ५० वर्षे), थोरले बाजीराव ( आयुष्य – ४० वर्षे ) सदाशिवराव भाऊ   ( आयुष्य – ३१ वर्षे ) आणि माधवराव पेशवे ( आयुष्य – २८ वर्षे ) हे याच माळेतील आहेत . ह्या व्यक्तींना जर १०/१५ वर्षे जास्त  आयुष्य मिळते , तर निदान मराठी रियासतीचे आयुष्य नक्कीच वाढले असते ! कदाचित , इतिहास सुद्धा बदलला असता !

ह्याच करणा मुळे म्हणावेसे वाटते की – राज्यकर्त्यांची अल्पायुषी कारकीर्द आणि लागोपाठ झालेल्या महत्वाच्या व्यक्तींचे मृत्यू ह्यांनी मराठी राजवटीच्या र्हासात आणि विशेषता: फक्त १४४ वर्षात होण्यात , हातभार लावला .

मराठी राजवटीचा  र्हासामागे काय कारणे असावीत ?

खालील उद्गार , अत्यंत महत्वाच्या अशा गोष्टीं विषयी आहेत , जे अतिशय मोजक्याच पण स्पष्ट शब्दात मराठी राजवटीच्या र्हासा मागील कारणांकडे आपले लक्ष वेधतात .

ख्यातनाम इतिहास संशोधक – गणेश हरी खरे यांचे उद्गार - मराठ्यांच्या उत्तरेतील विस्तारा बद्दल आहेत -    “ मराठे न जाते तर आणखी कोणी गेले असते व बलिष्ठ होऊन मराठ्यास त्रास देते . तेंव्हा मराठ्यांनी पसरा मांडला ते ठीकच केले , पण मांडलेला पसरा आवरून धरण्या इतकी – मनुष्य , द्रव्य व बुद्धी , ही बळे आमच्यापाशी नव्हती .  त्यांचा तुटवडा पडला व तो भरून काढण्याचे उपाय आम्ही शोधू शकलो नाही , हा आमचा दोष “ [ निजाम पेशवे संबंध – १८ व्वे शतक – टी एस शेजवलकर – १९५९ आवृत्ती , पान ५५ ] 

वरील उद्गार जरी मराठ्यांच्या उत्तरेतील विस्तारा बद्दल असले , तरी ते मराठी राजवटीच्या र्हासा बद्दलही तेव्हडेच लागू होतात . वरील वाक्यात , तीन बाबींचा उल्लेख केला आहे . एक – भारतभर पसरलेल्या मराठी राजवतीला आवरायला  ( प्रशासकीय आणि लशकरी बाबीत ) - मनुष्य ( पुरेसे कर्तुत्ववान मनुष्यबळ ) , द्रव्य ( पैसा / धन ) व बुद्धी ( राजकारण ) – लागतात , जी राजवटी कडे पुरेशा प्रमाणात नव्हती . दोन -– ह्या तीन गोष्टींचा तुटवडा भरून काढायला जे रचनात्मक उपाय लागतात ते आमच्यापाशी नव्हते किंवा तशी व्यवस्था करू शकालो नाही  . तीन – हा आमचा दोष आहे . थोडक्यात , ही बाब अंतर्गत आहे ! इतरेजन ह्याला जबाबदार नाहीत ! खर्‍यांनी , मराठी राजवटीच्या अगदी वर्मावर बोट ठेवले आहे !

अशा सर्व बाबींचा एकत्रित विचार केला तर खालील गोष्टी , मराठी राजवटीच्या र्हासाला कारणीभूत आहेत , हे साधार दाखवून देता येईल . आणि हेही लक्षात येते की , राजवटीच्या र्हासाच्या कारणां बाबत , खरे यांचे उद्गार हे कसे लागू होतात !

 

-    पहिले महत्वाचे अंतर्गत कारण म्हणजे ( ब १ ) - हळू हळू खीळ खिळी होत गेलेली मराठी राजवट  . असे  होण्यास काही महत्वाची कारणे

एक ( ब १.१ ) - प्रथम छत्रपती व नंतर पेशवे पदाचे झालेले अवमूल्यन

दोन ( ब १.२ ) – “ मराठी राजमंडळाच्या  ( confederacy ) “ मधील रचनात्मक दोष . ( काही  दोष , फक्त मराठी राजमंडळा पुरते सीमित नसून , तेव्हाच्या प्रचलित भारतीय पद्धती मध्येच दिसतात . ) 

तीन ( ब १.३ ) – पेशवे घराण्यातील दुही आणि महत्वाच्या सरदार घराण्यातील सत्तेकरता झालेली भांडणे  

-    दुसरे महत्वाचे अंतर्गत कारण म्हणजे ( ब २ )  मराठी राजवटीचे अर्थकारण ( सुरवाती पासूनच भासलेली पैशाची कमतरता )

-    तिसरे महत्वाचे कारण , जे बाह्य कारण आहे ( ब ३ ) – १७५७ नंतर वाढत गेलेले , इंग्रजांचे ( ईस्ट इंडिया कंपनीचे ) – राजकीय , लशकरी आणि आर्थिक सामर्थ्य  

 

ब १ ) हळू हळू खीळ खिळी होत गेलेली मराठी राजवट  

ब १.१ ) आधी छत्रपतींच्या स्थानाचे व नंतर पेशवे पदाची झालेली अवनती   - शिवाजी महाराज स्वता: छत्रपती व कारभारी होते . स्वता: रणांगणावर त्यांनी अनेक वेळा नेतृत्व केले . राज्या संबंधी बाबींवर , अष्ट प्रधान मंडळाचा सल्ला ते  घेत , परंतु शेवटी निर्णय हा त्यांचाच असे . त्याची अम्मल बजावणी मात्र , अष्ट प्रधान मंडळ किंवा इतरान कडून करवून घेत . संभाजी महाराज ह्यांनी शिवाजी महाराजान प्रमाणेच , स्वता: औरंगजेबा बरोबरच्या युद्धाचे नियंत्रण केले व सर्व कारभार आपल्या हाती ठेऊन राज्य केले . रणांगणावर सुद्धा नेतृत्व केलेले आणि कारभारी व छत्रपती ही दोन्ही पदे भूषवलेले ते शेवटले राजे .राजाराम महाराजांनी व शाहू महाराजांनी रणांगणावर नेतृत्व केले नाही . इथपासूनच छत्रपतींच्या गादीचे महत्व कमी व्हायला सुरवात झाली ! 

शाहू महाराजांच्या ऐन तारुण्यातील प्रदीर्घ अशा [ १६८९ ( वय – ७ )ते १७०७ ( वय – २५ ) – १८ वर्षे ] मोगलांकडील कैदे मुळे , त्यांना लष्करी मोहिमा आणि नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही , किंवा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव सुध्धा मिळाला नाही . त्याची परिणीती पुढे , त्यांना राज्य करण्याकरता पेशव्यांवर अवलंबून होण्यात झाली . [ छत्रपती आणि कारभारी हे विभाजन राजाराम महाराजांपासूनच सुरू झाले होते . राजाराम महाराजांना देखील , १६८० ( वय – १० ) ते १६८९ ( वय – १९ ) मध्ये ठेवलेल्या नजर कैदे मुळे  लष्करी , राजकीय व प्रशासकीय अनुभव मिळूशकला नाही . त्यामुळेच त्यांना जिंजीला गेल्यावर या गोष्टीं करता इतरांवर अवलंबून राहावे लागले. त्यांना  १६८९ मध्ये , महाराष्ट्रातून कराव्या लागलेल्या पलायनामुळे, राज्याच्या प्रशासनाची विभागणी करून – रामचंद्रपंत आमत्य आणि शंकरजी नारायण सचिव यांना द्यावे लागले . ] ह्या दोन्ही छत्रपतीच्या काळातील आशा परिस्थिमुळे त्यांना – फक्त राज्यप्रमुख – हीच भूमिका निभवावी लागली . इथूनच छत्रपतींच्या गादीची महती कमी होत गेली . पुढे १७०८ मध्ये छत्रपतींच्या झालेल्या दोन गाद्यान मुळे व ताराराणीनी १७५२, १७५३, व १७५८ मध्ये शपथेवर दिलेल्या साक्षीमुळे – की , रामराजे महाराज , हे छत्रपतींचे खरे वारसदार नाहीत , ह्यामुळे तर छत्रपतींच्या गादीची पार शोभा गेली . अशा घटनां मुळे एक महत्वाचा राजकीय परिणाम असा झाला की, छत्रपतींचा , पेशव्यां वरील जरूरी असलेला “ वचक किंवा त्यांना ताब्यात ठेवणारे “ असे स्थान जवळपास नष्ट झाले . त्यामुळे , छत्रपती व कारभारी पेशवे यांच्यातील सत्तेचा समतोल नष्ट झाला आणि पेशव्यांना महत्व येत गेले ! छत्रपतींची गादी ,  मग शोभे पुरती झाली . हा फार मोठा व दूरगामी परिणाम करणारा दोष मराठी रियासती मध्ये उत्पन्न झाला .

पेशवाईचा उदय – बाळाजी विश्वनाथ [ पेशवाई मधील पहिले पेशवे ] , थोरले बाजीराव , चिमजी अप्पा , नानासाहेब पेशवे यांच्या पराक्रमामुळे व कर्तुत्वामुळे  पेशव्यांचा प्रभाव वाढत गेला . अर्थात त्यात पेशव्यांनी राजकारणही केले .  परंतु त्यांच्या वाढत्या प्रभावा करता त्यांचा पराक्रम ,  इतरांचे नाकर्तेपण आणि काही जणांचे राज्य विरोधी वर्तन , हेही तेव्हडेच जबाबदार होते .त्या बाबत फक्त पेशव्यांना दोष देता येत नाही .शाहू महाराजांनी त्यांच्या मृत्यू समयी ( १७४९ ) पेशव्यांवर राज्याचा सर्व कारभार सोपवला व पेशवाई वंश परंपरागत केली . त्यामुळे फक्त पेशवेच मराठी रियासतीचे सर्वे सर्वा झाले .

पुढे पेशव्यांच्या घरामध्येच १७६१ मध्ये नानासाहेबांच्या मृत्यू नंतर  – राघोबा दादा आणि माधवराव यांच्यात सत्ते वरून गृह कलह निर्माण झाला . पुढे त्याची परिणीती , १७७३ मध्ये नारायणराव पेशव्यांच्या हत्येत झाली . ह्या मुळे मराठी रियासती मध्ये , आधी छत्रपती मग – पेशवे , अशी दोन्ही स्थाने – एका मागोमाग कमकुवत झाली . त्यामुळे समर्थ , सर्व मान्य असे केंद्रीय नेतृत्वच राहिले नाही .

इथे मोगली राजवटीच्या र्हासाशी साम्य दिसते . औरंगजेबाचे एकतंत्री समर्थ केंद्रीय नेतृत्व १७०७ मध्ये , त्याच्या मृत्यू मुळे नष्ट झाले . त्या नंतर त्या जागी कोणतेही योग्य किंवा कर्तुत्ववान नेतृत्व गादी वर आले नाही . त्यामुळे मोगली सत्ता  खिळखिळी व्हायला सुरवात झाली . हळू हळू एकेक मोगली सुभेदार - बंगाल , हैदराबाद , अवध वगैरे स्वतंत्र होऊ लागले .

ह्या दोन मोठ्या राजवटींच्या साम्या वरून एकच गोष्ट सिद्ध होते की , केंद्रीय सत्ता, दुबळ्या व लायकी नसलेल्या माणसाच्या हातात गेल्यावर , त्या राजवटीचे – मोगल किंवा मराठी असो – पतन ह्याला वेळ लागत नाही !  

 

                                           ....या पुढील लिखाण, भाग – २ वर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा