Menu

 

महादजि शिंदे यांचे ( यूरोपियन धर्तीवरचे ) कवायती सैन्य      

महादजि शिंदे यांचा पूर्वेतीहास – शिंदे घराण्याचा मूळ पुरुष – रणोजी शिंदे , जे  थोरल्या बाजीरावां बरोबर कामगिर्‍या करून नावारूपाला आले  . रणोजी शिंदे – १७४४ ला वारले . त्यांना तीन मुलगे होते – जायपपा , दत्ताजी , ज्योतिबा . रखेली पासून तुकोजी आणि महादजि हे मुलगे झाले . तुकोजी हा , रोणोजी असतांना वारला .जयप्पाला राजपूत राजा बीजेसिंग याने दगाबाजी करून त्याचा खून केला . दत्ताजी पानिपत ( १७६१ ) च्या आधी लढाईत मरण पावला .  जयप्पाचा मुलगा – जनकोजी हा पानिपत ( १७६१ ) च्या लढाई नंतर कैदेत मारला गेला  .  त्यामुळे शिंदे घराण्यात वारसा बद्दल प्रश्न उभा राहिला . महाद्जि जो राणोजींचा अनौरस पुत्र होता , तोच फक्त उरला  . परंतू ते औरस वारस नसल्या, मुळे शिंदे घराण्याची सरदारकी त्यांना मिळण्यात अडचणी येऊ लागल्या . मधील काळात त्यांनी स्वतंत्रपणे माळव्यात आपले बस्तान बसवण्याचा उपक्रम चालू ठेवला होता .  सरतेशेवटी थोरल्या माधवरावांनी १५ जाने. १७६८ मध्ये , त्यांना शिंदे घराण्याचा वारस म्हणून सरदारकी दिली .

महादजींची कामगिरी ( जन्म १७२५ - मृत्यू १७९४ ) - त्यावेळची उत्तर हिंदुस्तानाली परिस्थिति फाऱ बिकट होती . पानिपतच्या पराभवा मुळे , मराठी राजवटीचा दरारा खूपच कमी झाला होता . त्यात  दिल्लीच्या बादशाही मध्येही फाऱ गोंधळाची परिस्थिति होती . त्यामुळे जाट , राजपूत , रोहिले हे आपापले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करू लागले . महादजींना प्रथम त्यांच्याशी झगडावे लागत होते .

त्यातच भर म्हणून , त्याच सुमारास -१६६५ नंतर , इंग्रज ( कंपनी ) त्यांचे राजकीय वर्चस्व  वाढवण्याच्या खटपटीला लागले होते .  पुण्याला , पेशव्यांच्या घरातच राघोबादादा मुळे गृह कलह उभा राहिला . दक्षिणेत १७६१ मध्ये , हैदर अलीचा उदय झाला होता  .त्यमुळे पेशवे ,गृह कलह आणि हैदर/निजाम यांच्या मधेच गुंतून पडले आणि त्यांना उत्तर हिंदुस्तानाकडे फारसे लक्ष द्यायला फुरसत मिळाली नाही . आशा परिस्थितिला तोंड देत , महादजींनी १७८० – पहिल्या इंग्रज - मराठा युद्धा पर्यन्त स्वता:ला उत्तर हिंदुस्थानात भक्कमपणे स्थापन केले होते .

याच कालखंडात , महादजींच्या हे लक्षात आले होते की , जर आपल्याला ( मराठी राजवटीला ) हिंदुस्थानात ( त्याकाळी – नर्मदा  नदीच्या उत्तरेस हिंदुस्तान समजले जात असे )  – राजपूत , मोगल , जाट  व रोहिले व मोगल यांना काबूत ठेऊन सत्ता राखायची असेल , तर स्वता:ची अशी खडी फौज असणे जरूरीचे आहे . तो पर्यन्त त्यांनी इंग्रजांच्या यूरोपियन धर्तीवरच्या कवायती फौजांची कामगिरी सुध्धा अनुभवली होती . पक्का निर्णय झाल्यावर त्यांनी फ्रेंच जनरल डी बोईग्न याला पाचारण करून नोकरीवर ठेवले . त्याला १७८४च्या आरंभी  यूरोपियन धर्तीवर - ८५० जणांची  एक, आशा दोन पायदळाच्या पलटणी उभ्या करायला सांगितल्या . जनरल डी बोईग्न याने, इंग्रजांच्या धर्तीवर २ कवायती पलटणी, ६ – ८ महिन्यात तयार केल्या . पुढील ४-५ वर्षात ( १७८८/८९ पर्यन्त ) , त्या पलटणींनी चांगली कामगिरी केली . या कलावधीत , डी बोईग्न याला दुय्यम स्थान व कामगिरया होत्या , ज्यावर तो असमाधानी होता . त्याने मग महादजींना आशा पलटणींची संख्या १०-१२ हजारपर्यंत ( एक ब्रिगेड ) वाढवण्याचा प्रस्ताव दिला . तो प्रस्ताव महादजींना – त्यांच्या सरदारांच्या विरोधामुळे आणि इतर बाबीन मुळे स्वीकारता आला नाही . त्यामुळे डी बोईग्न , राजीनामा देऊन त्यांना १७८९ मध्ये सोडून गेला. परंतू लगेच १७९० मध्ये महादजींनी त्याला परत बोलावून , तो प्रस्ताव स्वीकारला व १० – १२ हजार सैनिकांचा कवायती कंपू  ( आधी १ ब्रिगेड, व नंतर आणखी एक . मिळून २३-२५ हजार स्वयंपूर्ण कवायती फौजा  ) , यूरोपियन धर्तीवर , तयार करायला संगितले . शिवाय आग्र्याला, वजनाने हलक्या तोफा ( ३,, १२ पौंडी ) व दारूगोळा तयार करण्याचा कारखाना काढला , ज्यात काही काळानंतर उत्कृष्ट २०० तोफा तयार केल्या गेल्या . ह्या तोफा इंग्रजांच्या तोडीच्या होत्या . ह्या सर्व उपक्रमाच्या खर्चा करता महादजींनी डी बोईग्न याला सुपीक प्रदेश तोडून दिला . अशा भक्कम पाठिंब्या मुळे , डी बोईग्न याने हा कंपू ( brigade) वर्षभरात तयार केला . काही यूरोपियन अधिकारी त्याने पदरी ठेवले . त्या पैकी काही  [ पेरोन ( फ्रेंच ) , मिकेल फिलोज ( इटालियन ) , सेंगस्टर ( स्कोच -- ज्याला आग्र्याला तोफा बनवण्याच्या कामावर ठेवले )  , कर्नल पेड्रोन ( फ्रेंच ) ,जॉन हेसिंग इ.  ] ज्यांना आशा सैनिकांचे नेतृत्व / योग्य कामे दिली  .

असा हा कवायती कंपू ( २ ब्रिगेड ) स्वयंपूर्ण होता . त्यात १२००० पायदळ , ६५०० घोडदळ आणि, गोलंदाजां सहित १०० तोफा , योग्य तेव्हडा दारूगोळा आणि वाहतूकी साठी - बैल , उंट , घोडे  होते . शिवाय इतर कारागीर आणि कारकून असत .  प्रत्याक्षात अशा कंपूने विविध लढायत  मोठे पराक्रम गाजवले , ज्याचे श्रेय अर्थातच डी बोईग्न  याला जाते !  

 ( एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे की , महादजींची सगळी फौज कवायती नव्हती . बाकी फौज ही नेहमी प्रमाणे – इतरान सारखीच होती , ज्यात घोडदळ बहू संख्येने होते .)     

कवायती फौजे बद्दल – नावावरूनच लक्षात येत , की अशी फौज विविध कवायती नुसार काम करते . प्रत्यक्षातही , त्यांच्या हालचाली शिस्तबध्द्ध व इशार्यानुसार ( शिट्टी, झेंडे किंवा ड्रम्स ) होत असत . प्रत्येकाला ( अधिकारी , सैनिक इ ) जागा , काम नेमून दिलेले असे त्यानुसार काम होत असत . सर्वांना वरिष्ठांचे हुकूम पाळावे लागत . ह्या सैनिकांना एकच पोशाख ( लाल कुडता व पांढरी तुमान ) दिलेला असे . त्यांच्याकडील बंदुकाना सांगिनी ( bayonet ) जोडलेल्या असत . अशा फौजां बरोबर स्वतंत्र घोडदळ , तोफखाना व इतर सामग्री दिलेली असे ज्याच्या मुळे ते लढाईच्या मैदानावर जवळपास स्वतंत्र पणे हालचाली करू शकत असत .

अशी फौज , हल्ला , बचाव किंवा माघार घेतांना गोंधळात पडत नसे .  माघार सुध्धा शिस्तबद्ध होत असे . त्यामुळे वेळ पडल्यास माघारी नंतर , प्रतीहल्ला करणे शक्य होत असे . वरिष्ठ / अधिकारी बळी पडला किंवा जखमी झाला तरी पळापळ न होता, लढणे चालू राहत असे . तेव्हाडेच महत्वाचे म्हणजे त्यांना वेळेवर पगार दिला जात असे . ( सैन्य हे पोटावर चालते ! )

अर्थात ह्याची दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे . महादजींच्या कवायती फौजे मधील सर्व वरिष्ठ अधिकारी हे खास करून यूरोपियन असत , ज्याचा, पुढे दौलतराव शिंदेना, दुसर्‍या मराठा – इंग्रज युद्धात ( १८०२/३ ) तोटा झाला . कारण हयातले काही अधिकारी इंग्रजांना मिळाले , काहींनी इंग्रजां विरुद्ध लढायला नकार दिला . पेरोन ( फ्रेंच ) याने तर चक्क फितूरी केली ! त्यामुळे सैनिकांच्या काही पलटणी  निर्नायकी झाल्या व लढाई मध्ये सुसूत्रता उरली नाही ज्याचा परिणाम – माघार किंवा पराभव होण्यात झाला . अर्थात असे वर्तन सर्वच यूरोपियन अधिकार्‍यांनी केले नाही . काही शेवट पर्यन्त एकनिष्ठ राहिले .

अशा सैन्याचा भर एका जागी गाडून उभे राहून लढाई करणे हा होता .ह्यात बंदूक धारी पायदळाची संख्या फार जास्त असे व तोफा , बंदूकान वर मदार होती . त्यामुळे त्यांच्या हालचाली हळू होत असत . अशी फौज पावसाळ्यात – दारूगोळा ओलसर  होत असण्याच्या शक्यते मुळे - लढण्यास कुचकामी होती .  अशी खडी फौज तयार करणे व बाळगणे हे फार खार्चीक काम होते . त्यांना नियमितपणे पगार द्यावा लागत असे .म्हणूनच महादजींनी डी बोईग्न याला त्याच्या फौजेच्या खर्चा करता जवळपास १५-२० लाख रुपये उत्पन्नाचा मुलुख तोडून दिला होता .      

यूरोपियन लढयांच्या पद्धती व कवायती फौजा --  १८ व्या शतकाच्या मध्या पासून , यूरोपियन पद्धती मध्ये कवायती पायदळाचे महत्व फार होते . त्यांची संख्या , घोडदळा पेक्षा जास्त होती . पायदळाचे प्रमूख शस्त्र हे सांगिनी ( बायोनेट ) लावलेल्या बंदूका हेच होते . हातघाईच्या लढाईत त्याचाच वापरकरून हाणामारी होत असे . हलका व फिरता   तोफखाना ( ३/६/१२ पौंडी – घोडे / बैलांनी ओढू शकणार्‍या , चाके असलेल्या फिरत्या तोफा. त्या बरोबर योग्य / लागेल तेव्हडा दारू गोळा ) होता .  कवायती फौजा प्रत्यक्षात लढताना , सर्वसाधारणपणे पोकळ चौकोना सारखी रचना करीत . त्यात ,प्रत्येक बाजूस , ३ किंवा ४ सांगिनी लावलेल्या बंदूकधारी शिपायांच्या ओळी असत . त्या पैकी १ किंवा २ ओळीतील सैनिक एका गुढग्यावर बसत असत आणि मागील २ ओळीतील शिपाई उभे राहून एकामागोमाग , आळी पाळीने  आशा तर्‍हेने गोळीबार करीत  . ह्या चौकोनाच्या केंद्र स्थानी - राखीव फौजा , अधिकारी व इतर मंडळी व समान असे .

खालील चित्रे ही फक्त कल्पना येण्या करता आहेत ( सर्व चित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत ) 

            


१ - युरोपियन पद्धतीने बंदूकांची मारागिरी 



२ - युरोपियन पद्धतीच्या सैन्याची रचना - पोकळ चौकोन  


३ - ६ पाउंडी फिरती तोफ 



४ - तोफेचा "ग्रेप शॉट " .   ( हया " शॉट " मधे  जे छोटे गोळे दिसताहेत , ते उडवल्यावर विखरतात , आणि संमोरील शत्रूच्या सैन्या वर पडून बरीच हानी पोहचवत  ) 

ह्या चौकोनाच्या पुढे थोड्या अंतरावर  - ओळीने तोफखाना ( ३/६/१२ पौंडी ) उभा केलेला असे . तोफखान्याचे प्रमुख काम ,  शत्रूच्या चाल करून येणार्‍या घोडदळावर , मारगिरि करून जास्ती जास्त हानी पोहचवायची हे असे . उभ्या बंदूकधारी शिपायांचे ही तेच काम होते .  तोफखाना एक विशिष्ट पद्धतीचा दारूगोळा वापरायचे ( ग्रेप शॉट ) , ज्यात लहान अनेक छोटे गोळे असत व ते फुटल्यावर त्या गोळ्यांचा वर्षाव होत असे . त्यामुळे घोडदळाचे – खूप नुकसान होत असे . आशा – ग्रेप शॉट वापरत असलेल्या तोफा आणि शिपायांच्या बंदूकांच्या दुहेरी मार्‍यामुळे  , शत्रूच्या घोड दळाची जबरदस्त हानी होत असे व बर्‍याच वेळेस त्यांना माघार घ्यावी लागत असे . आशा तर्‍हेच्या तोफा व बंदूकांच्यादुहेरी मार्‍याला कसे तोंड द्यायचे , ह्याचे उत्तर पारंपारिक देशी घोड दळाकडे नव्हते .   

१८ व्या शतकाच्या मध्या वरील मराठी राजवटीच्या फौजा -  

पारंपरिक लढायत घोड दळाला जास्त महत्व होते , घोडदळ – घोडदळाशी आणि पायदळ – पायदळाशी , लढाई करीत असे . पायदळ – घोडदळ आशा लढाया कमी होत असत . शिवाय संख्येने कमी परंतू, लांब पल्याच्या भारी तोफखान्याचा . वापर केला जात असे . त्यामुळे घोडदळाला तोफांपासून धोका कमी होता . पारंपारिक शास्त्रास्त्रे, – तलवार , भाला इ यांचा वापर केला जात असे . पायदळा कडे बंदूका असत , पण त्यावर मदार नसे . संख्या आणि डावपेच ह्यावर जास्ती भर असायचा.

मराठ्यांनी संख्ये पेक्षा डावपेचावर भर दिला . शक्यतोवर सामोरा समोर , एकाजागी उभे राहून - लढाई करणे ते टाळत असत . स्वता:ची कमीत कमी हानी करून लढाया जिंकायचे डावपेच  वापरले . त्यात घोडदळावर मदार होती . वेगवान  हालचाली करून शत्रूला कोंडीत पकडायचे किंवा त्याची रसद ( अन्न/ पाणी / पैसा / मदत इ ) पूर्ण पणे मारून त्यांना शरण आणायचे हे धोरण होते ( गनिमी कावा ) . थोरले बाजीराव ( १७४० पर्यन्त ) यांच्या फौजांमध्ये फारसा डाम डौल नसायचा . ते स्त्रियांना फारसे बरोबर नेत नसत . तोफखाना नसायचा . बाजारबुणगे फारसे नसायचे . या सर्वांमुळे , हालचाली फार जलद व्हायच्या , कारण घोडदळ हेच प्रमूख “अस्त्र“ होते . पेंढारी / गारदी किंवा भाडोत्री सैनिक तो पर्यन्त फारसे प्रचलित नव्हते ( परंतू पुढे , हा साधेपणा बदलत गेला . १७६१ च्या पानिपत मोहिमेच्या वळेस बाजार बुणगे , स्त्रिया , डाम डौल असा पसारा खूपच वाढला होता . इतका टोकाचा बदल फक्त २० वर्षात झाला होता ! अर्थात एक गोष्ट सांगायला पाहिजे की , मराठ्यान मध्ये प्रथम - सदाशिव राव भाऊंनी, इब्राहीम खान गारदीच्या तोफखान्याचा मोठ्या प्रमाणावर - पद्धतशिर वापर केला . शिवाय एकाजागी उभे राहून लढण्याची पद्धत अंगिकारली , ज्या वरून मल्हार राव होळकरांशी त्यांचे मतभेद झाले . मराठी राजवटीत गारद्यांचा शिरकाव तेव्हा पासून झाला असे जाणकारांचे म्हणणे आहे . )   

मराठी राजवटी  मध्ये घोडदळाची संख्या – गनिमी कावा पद्धती मुळे, पायदळा पेक्षा फार जास्त होती .त्यांच्या हालचाली वेगाने होत असत . त्यामुळे – गतिमान लढाया खेळून शत्रूला जेरीस आणता येत असे .परंतू ह्या पद्धती मध्ये शत्रूचा निर्णायक पराभव करणे किंवा नायनाट करणे शक्य होत नसे . मुख्य भर हा शत्रूस कोंडीत पकडून, नंतर तह करून खंडणी वसूल करणे हाच होता .  ही फौज वेळ पडल्यास पावसाळयातही लढू शकत असे , जो एक मोठा फायदा होता.

अशा फौजा जवळपास बेशिस्त व विस्कळीत असत . ह्या फौजेची कूच म्हणजे “ झुंडीची “ कूच असे ! ह्यांना पगार वेळेवर मिळेल ह्याची खात्री नसायची . बर्‍याच वेळेस ह्यांचे पगार ४-८ महीने तुंबून रहात , ज्या मुळे कधी कधी बंडाळी मजण्याची परिस्थिति येई . अशा फौजेतील सैनिक पराभव दिसू लागल्यास किंवा महत्वाची व्यक्ति बळी पडल्यास, जीव वाचवण्यास, पळा-पळी करण्यास तत्पर असत . तोफखान्यास कमी व मोजकाच दारूगोळा पुरवला जात असे, ज्यामुळे त्यांचा परिणामकारक उपयोग होत नसे . शिवाय जास्त भर हा भारी तोफखान्यावर होता , जो वाहून नेणे हे महाकठीण होत असे आणि हालचाली हळू होत असत .

शिवाय प्रत्येक सरदारांच्या फौजेची लढण्याची तर्‍हा वेगळी होती . भोसल्यानच्या फौजा पारंपारिकच  राहिल्या . होळकरांनी फार मर्यादित प्रमाणात कवायती फौजेची उभारणी केली . महाद्जि शिंदे आणि पुढे दौलतराव शिंदे यांचा भर हा कवायती फौजेवर होता .   

हे सर्व असूनही , ह्या फौजा रणांगणावर शौर्‍यात कुठेही कमी पडत नव्हत्या . म्हणूनच मराठी राजवटींच्या फौजा इतर देशी राजवटीन समोर विजयी होत असत .

पारंपारिक मराठी राजवटीच्या घोडदळाकडे    

महादजींच कर्तुत्व -- मराठी राजवटीतील इतर सरदारान मध्ये उठून दिसते कारण त्यांनी पुणे दरबारच्या मदतीवर अवलंबून न राहता , स्वता:च्या बळावर - राजपूताना , बुंडेलखंड आणि माळवा आशा फार मोठ्या प्रदेशातील – राजपूत , जाट , रोहिले आणि मोगल यांना नमवून , मराठी राजवटीचा दरारा, पानीपत ( १७६१ ) आणि मल्हारव होळकरांच्या मृत्यू ( १७६६ ) नंतर उत्तरेत पुनरस्थापित केला .

१७७० नंतर मराठी राजवटीत – थोरले मध्यवराव पेशवे , महादजि शिंदे , अहिल्याबाई होळ्कर  इ नि पूर्ण पणे ओळखला होते की , इंग्रज हे त्यांचे भविष्यातील प्रमूख शत्रू असतील , आणि खरा सामना शेवटी त्यांच्याशीच होणार !

त्याकाळातील महादजि शिंदे हे पहिले की ज्यांनी हे नुसते ओळखालच नाही , तर इंग्रजांच्याच    “ भाषेत “ त्यांना उत्तर देण्याकरता कवायती फौजा तयार करणे , तोफखान्याचा आग्रा येथे कारखाना काढणे व त्यांचा वापर इतर देशी राजवटीन विरुद्ध करून विजय मिळवणे हे प्रत्यक्षात आणले !

त्यात त्यांना खास करून १७९०-९४ या कालखंडात महत्वाच्या लढाया जिंकण्यात कवायती फौजेची मोलाची मदत झाली ( १७८८ आग्रा येथे – इस्माईल बेग विरुद्ध , १७९० मेरता येथे – इस्माईल बेग आणि जयपूर,जोधपूरचे राजे यांच्या विरुद्ध ,  १७९३ लाखेरी येथे – होळकर आणि अलवारचा राजा विरुद्ध ) . मराठी राजवटी मध्ये ते एकमेव सदार होते , ज्यांनी कवायती फौजेचे महत्व ओळखून त्याची मोठ्या प्रमाणावर उभारणी आणि यशस्वी वापर केला .  ( त्याचा फायदा ,  पुढे, त्यांचे वारस - दौलतराव शिंदे यांना झाला. ) राजकारण आणि भक्कम सैन्य शक्ति उभी करून – इंग्रजांना दिल्ली पासून दूर ठेवले . एव्हडे सगळे करूनही ते शेवट पर्यन्त पेशव्यांशी एकनिष्ठ राहिले , हे महत्वाचे !

महादजींच कर्तुत्व , योग्यता आणि योगदान ह्या वर एक स्वतंत्र प्रकरण लिहाव लागेल , येईल इतकी त्यांची कामगिरी महान होती !   

+++++++++++++++++++++++

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा