आपल्या जिव्हाळ्याच्या - मराठी राजवटीच्या विविध अंगाच्या बाबतीत - उदय ,विस्तार , अस्त व त्या मागची राजकीय , आर्थिक , सामाजिक , लष्करी , प्रशासकीय इ बाबींची बर्याच इतिहासकारांनी आणि अभ्यासकांनी साधक बाधक चर्चा केली आहे . तरीही इतिहास प्रेमी , अभ्यासकांनी त्यात भर घालणे हे कधीही थांबवू नये, असे माझे मत आहे . आणि म्हणूनच हा अल्पसा प्रयत्न सुरू केला !
इतिहास घडवणारी आपल्या सारखीच माणसे असतात . त्यांच्यातही गुण दोष असतात . त्यांनाही काम करायला २४ तासच मिळतात . त्यांनाही आपल्या सारखी सुख दुख्खे: असतात . तरीही आपण त्यांच्या कडून फार अवास्तव अपेक्षा ठेवतो . घडलेल्या वाईट किंवा अनिष्ट गोष्टीं बाबत त्यांना दोष देतो , जे बर्याच वेळेस चुकीचे नसेलही , पण प्रत्येक वेळीस बरोबर असेलच अस नाही .
इतिहास हा – व्यक्ति ( स्वभाव, व्यक्तिमत्व , जन्म इ ) , परिस्थिति आणि दैव – ह्यांचा विणलेला गोफ असावा . ह्या तिघांचा एकत्रित परिणाम इतिहासात घडलेल्या घटनात दिसतो . कधी कधी परिस्थितीच नायक असते , जिच्या समोर बर्याच वेळेस नमते किंवा शरण जावे लागते ( परिस्थिति मध्ये – त्या व्यक्ति पूर्वीची परिस्थिति , भौगोलिक , सामाजिक , राजकीय , वैयक्तिक अशा सर्व बाबी आल्या . ) कधी कधी दैव नायकाची भूमिका वटवते . कधी कधी ( शिवाजी महाराजान सारखी ) माणसे , इतिहासाची “ नायक “ असतात . दुसर्या बाजीराव सारखी व्यक्ति – परिस्थिति , पार बिघडवते , तर नाना फडणीस – महादजि शिंदे , शाहू महाराज , थोरले माधव राव - ह्यांच्या सारखी माणसे परिस्थितीला सावरून , वळण द्यायचा प्रयत्न करतात . काही माणसे – राजाराम , ताराराणी , रामचंद्र पंत अमात्य ( आज्ञापत्र लिहिणारे ) हे परिस्थितिशी टक्कर देतात . त्यांच्या स्वभावाचा, वागणूकीचा , आपापसातील संबंधांचा आणि निर्णयांचा फार मोठा परिणाम इतिहासावर होत असतो .
आपण इतिहासातील घडणार्या घटनान बद्दल – फक्त व्यक्तीलाच दोष किंवा श्रेय देतो , परंतु , विशेषता: परिस्थिति बद्दल फारच कमी वेळेस विचार करतो . ( दैव या बाबत तर कधीच नाही ! ) .
कधी कधी परिस्थितीच अशी असते की – ती व्यक्ति जो निर्णय घेते – तो अपरिहार्य असतो . सर्वोत्तम नसेल , पण त्यातल्यात्यात “ कमी हानीचा असेल . उ शाहू व बाळाजी विश्वनाथ यांनी स्थापन केलेलं “ मराठा राजमंडळा “ च घेता येईल . औरंगजेबाच्या स्वारी मुळे ( १६८१ – १७०७ ) शिवाजी महाराजांनी लावलेली उत्तम व्यवस्था , पार नष्ट होऊन फारच गोंधळाची परिस्थिती झाली होती . शहुंची सुटका झाली तेव्हा हाती सैन्य नाही , पैसा नाही , छत्रपतींच्या गादीचीही शाश्वती ! दाभाडे , जाधव , आंग्रे अशी सरदार मंडळी फार प्रबळ झालेली असताना त्यांच्या पुढे असलेल्या पर्यायात “ मराठा राजमंडळ “ ( Maratha Confederacy ) स्थापन करून पुढे जाणे , हाच त्यातल्यात त्यात चांगला उपाय होता ! त्याबाबत शाहू महाराज आणि बाळाजी विश्वनाथ यांना दोष देण्यात अर्थ नाही !
दुसरे उदाहरण राजाराम महाराजांनी परत सुरू केलेली “ वतनदारी “ . आपण हे लक्षात घेत नाही की , त्यांच्या पुढे पर्यायच नव्हता ! तो पर्यन्त औरंगजेबाने भराभर वतनदारीची आमिषे दाखवून , बर्याच मराठी सरदारांना आपल्या बाजूला वाळवून घेतले होते . मग औरंगजेबाच्या प्रचंड सेने समोर - लढायला सरदारांना उद्युक्त कसे करणार ? त्यामुळेच नाइलाजाने त्यांना वतनदारी परत सुरू करून लढा उभा करावा लागला ! ह्याबाबत त्यांना दोष देता येत नाही !
पेशव्यांना असा दोष दिला जातो की , त्यांनी जाणून बुजून अष्ट प्रधान मंडळ मोडीत काढून स्वता:ला पुढे आणले . खरतर अष्ट प्रधान मंडळ – या रचनेला तडे जयला – संभाजी महाराजांच्या वेळे पासूनच सुरवात झाली होती . १६८१ – १७०७ च्या स्वातंत्र्य लढाईत तर ती फारच विस्कळीत झाली होती . शिवाय शाहू महाराजांनी नेमलेल अष्ट प्रधान मंडळ मुळीच प्रभावी नव्हतं . अशा वेळेस थोरल्या बाजीरवानी जर स्वपराक्रमाने आपल्याला सिद्ध करून जम बसवला तर त्यांना कसा दोष देता येईल ? आणि शेवटी ते सत्तेचे राजकारण होते , ह्याचा कधीच विसर पडता कामा नये . ( आजही power politics चालतेच की ! )
इतिहासात कोणत्याही महत्वाच्या व्यक्तिच्या कार्याचे मूल्यमापन करतांना , त्या वेळची परिस्थिति ध्यानात घेतली तर ते मूल्यमापन जास्त वस्तुनिष्ठ होईल ! टीकेची धार बोथट होउ शकेल .त्या व्यक्तिला न्याय मिळू शकतो किंवा होणारा अन्याय टळू शकतो .
परिस्थिति शिवाय , आणखी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे . पहिली म्हणजे , आपण जेव्हा व्यक्तीचे मूल्यमापन करीत असतो तेव्हा , आपल्या सद्य स्थितीच्या दृष्टिकोनातून ते करत असतो जे चुकीचे असू शकते . ( Historian John Keay put it best: ‘The conduct of states, as of individuals, can only be assessed by the standards of their age, not by today’s litigious criteria. Otherwise, we’d all be down on the government of Italy for feeding Christians to the lions.’ – Reference – page 21 – “Inglorious Empire – What The British did to India “ by Shahi Tharoor – 2017 )
आपण त्या व्यक्तीच्या वेळेस असलेला काळ , विचार , परंपरा ह्यांचा संदर्भ ठेऊन केला , तरच आपले निष्कर्ष योग्य असण्याची शक्यता जास्त असते . त्या वेळेचा काळ ( १८ व्वे शतक ) आणि सद्य स्थिति ( २१ व्वे शतक ) या मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे . समाजाचा विचार , परंपरा , चालीरीती ह्या बदलत असतात . त्यामुळे माणसांची वर्तणूक बदलत असते . त्या काळी जे शिष्ट संमत असेल , चालत असेल, ते आज निषिद्ध असू शकेल .
उदाहरणार्थ सैन्या बरोबर जात असलेले बाजार बुणगे ( गरजेच्या वस्तूंचा बाजार व माणसे ) , एकंदरीतच समाजावर असलेला धर्माचा जबरदस्त पगडा , सत्ते करता वारसांच्या मध्ये होत असलेली हत्याकांड , बंड आणि परकीयांची किंवा बाहेरील सत्तेची मदत घेणे , स्वारी नंतरची लुटा-लूट व जाळपोळ - हे त्या काळच्या सगळ्या एतत्देशीय घराण्यात वा राज्यात कमी जास्त प्रमाणात सर्रास होत होते. ( ह्यातील काही गोष्टी – सत्ते करता भांडणे वगैरे – आजही पाहायला मिळतात )
उत्तम उदाहरण म्हणजे १८ व्या शतकाच्या मध्यावर एतत्देशीय राज्यांच्या सैन्या मध्ये असलेला भाडोत्री सैनिकांचा भरणा . असे बेशिस्त व विस्कळीत सैन्य , पराभव दिसता क्षणी पळून जाऊन जीव वाचवण्याचीच शक्यता असे . अशा सैन्याची गाठ जेव्हा शिस्तबद्ध व एकमुखी नेतृत्व असलेल्या परंतु संख्येने फार कमी असलेल्या इंगजी सैन्याशी पडत असे , तेव्हा सुरवातीच्या बहुतेक लढायात इंग्रजांना विजय का मिळाले हे स्पष्ट होते . परंतु आपल्या समोर सध्याच्या शिस्तबद्ध सैन्याचे चित्र असते किंवा – शिवाजी महाराजांच्या काळातील जिवावर उदार होऊन लढणार्या आणि एकनिष्ठ सैन्याचे चित्र असते . ( अशा सैन्या समोर इंग्रजांना विजय मिळणे शक्यच नव्हते ) अशी चित्रे मनात ठेऊन जर १७५० नंतरच्या लढायांचा विचार केला तर तो चुकीचा ठरेल .
हे एक प्रचलित सत्य आहे की , जित्यास सर्व गुण चिटकावले जातात आणि परभूतास सर्व दूषणे ! कोणताही निर्णय – बरोबर की चूक , हे आपण त्या निर्णयाच्या परिणामान वरून ठरवतो . बर्या वेळेस ते योग्य असते . पण काही वेळेस – विशेषता: दैवाचे फासे प्रतिकूल पडल्यास योग्य निर्णयाचे परिणाम प्रतिकूल होऊन , आपण तो निर्णय किंवा ती व्यक्ति चुकीची वागली असे ठरवतो ! ( इतिहासात “ दैव “ हे विचारात घेतले जात नाही ! )
त्याच बरोबर हेही आपण विसरतो की , निर्णय घ्यायच्या वेळेस , भविष्य कोणास ही माहीत नसते ! परंतू , आपण मूल्यमापन करत असतो , ते घटना घडून गेल्या वर ! म्हणजेच आपल्याला निर्णय आणि परिणाम हे दोन्ही माहीत असतात , पण निर्णय घेणार्याला , त्यावेळेस , फक्त निर्णय माहित असतो ! ( त्याच बरोबर , जवळपास सर्व जण निर्णय घ्यायच्या वेळेस, फक्त नजीकच्या परिणामांचा विचार करतात . दूरगामी ( लॉन्ग टर्म ) परिणामाचा विचार फारच थोडे जण , ते सुद्धा क्वचितच करतात ! )
याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंग्रजांची हिंदुस्थानातील राज्य उभारणी , ज्याची सुरवात १७५७ च्या प्लासीच्या लढाई पासून झाली . इंग्रजांच्या १७५७ नंतरच्या बंगाल मधील उदयाला , पेशव्यांना ( मराठी रियासतीला ) काही अंशी जबाबदार धरले जाते . परंतू – १७५७ प्लासी व १७६४ बक्सर लढाई च्या वेळेस खुद्द ईस्ट इंडिया कंपनीलाच कल्पना नव्हती की पुढे जाऊन हिंदुस्थानात त्यांना राज्या उभारणी करता येईल , तर पेशव्यां सकट इतरांना कशी असेल ? १७५७ च्या प्लासीच्या लढाईच्या वेळेस , स्वता: रॉबर्ट क्लाइव यालाच खात्री नव्हती की इंग्रज् लढाई जिंकतील ! तसेच , जगत सेठ व ऊमिचंद या बलाढ्य व्यापार्यांना आणि मीर कासिम ( सिराज चा सेनापति ) यांना, १७५७ मध्ये कसे काय माहीत असणार , की आपली मदत घेऊन जिंकलेल्या लढाई नंतर , इंग्रज त्यांना पूर्ण पणे निष्प्रभ करून बाजूला टाकतील ! आणि त्यांनी केलेल्या मदतीचे दूरगामी परिणाम स्वरूप , इंग्रज , हिंदुस्थानात पुढे राज्य कर्ते होतील ! त्यामुळेच ह्या तिघांना दगाबाजी/ फुटीरपणा बद्दल दोष देता येईल , पण इंग्रजांच्या राज्य उभारणीच्या सुरवतीला कारणीभूत झाल्या बद्दल नक्कीच नाही !
वरील व्यक्त केलेली काही पथ्ये पाळून , मराठी राजवटीच्या र्हासाची कारणे मांडायचा प्रयत्न केला आहे . हे काम फार कठीण व गुंतागुंतीचे होते . प्रामुख्याने १६७४ ते १८१८ अशा विस्तृत कालखंडाचा , तिच्या मधील विविध व्यक्तींचा विचार करावा लागत होता . शिवाय या विषयावर झालेले बरेच लिखाण लक्षात घेऊन , वेग वेगळी पुस्तके वाचूनच विषयाचा अभ्यास करावा लागला . मी इतिहासकार नसून अभ्यासक असल्याने, बरेच फायदे / तोटे झाले . एका सामान्य माणसाच्या भूमिकेत जाऊन हे सर्व काम करण्याचा घाट घातला व पूर्ण केला . प्रामाणिक व नि:पक्षपाती पणे , विचारपूर्वक केलेला हा प्रयत्न कागदावर तो कसा उतरला आहे , हे वाचकांनी ठरवायचे आहे ! शेवटी – चूक / भूल – द्यावी – घ्यावी !
+++++++++++++++++++
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा