मराठी ( मराठा ) राजवटीचे आरमार – शिवकाल ( १६५९ ) ते पेशवाई ( १८०० )
मराठी आरमाराचा पाया रचून, बांधणी शिवाजी महाराजांनी केली . त्यावर कळस
चढवला तो कान्होजी आंग्रे यांनी ! त्या
मुळेच भारताच्या मध्य युगीन नाविक इतिहासात दोघांचे नाव ठळक अक्षरात कोरले गेले
आहे !
मराठी
आरमाराच्या इतिहासाचे प्रामुख्याने तीन भाग करायला लागतील . पहिला – शिवकालीन नौदल – ( १६५७ ते
१६९४ ) , दूसरा कान्होजी आंग्रे यांचा कालखंड ( १६९४ ते १७२९ ) . तिसरा –
पेशवाईतील नौदल – ( १७२९ ते १८०० ) . १८०० नंतर मराठी नाविक इतिहासात फारसे काही घडले नाही ,
त्या मुळे त्या नंतरच्या कालखंडाचा येथे विचार केला नाही .
१ ) शिवकालीन नौदल –
शिवाजी
महाराज हे भारततातील पहिले दृष्टे राजे होते की ज्यांनी – पायदळ व घोडदळा बरोबरच
सुसज्ज नौदलाचे महत्व जाणून त्याची स्थापना केली . त्यांनी नुसती स्थापनाच केली नाही तर,
सर्वांगीण नाविक शक्ति वाढवण्या करता पद्धतशीर प्रयत्न केले. त्याकरता त्यांनी जहाज
बांधणी कारखाने काढले ( ठाणे, कल्याण, भिवंडी, अलिबाग, विजय दुर्ग, आणि मालवण येथे
), नाविक सदार तयार केले ( मायनाक भंडारी, दौलत खान, राम दळवी, तानाजी सावंत,भिवजी
( सिधोजी ) गुज्जर – जे नंतर सरखेल झाले, अचलोजी मोहिते, ईब्राहीम खान इ ) , सागरी
किल्ले बांधले ( सिंधु दुर्ग , खंदेरी ) , जहाजांची देखभाल करायला गोद्या बांधल्या
( अलिबाग , विजय दुर्ग ) . शून्यातून – १६५७ ते १६८० पर्यन्तच्या २३ वर्षात जवळ
जवळ १६० - २०० जहाजांचे नौदल तयार केले ( मराठे व इंग्रज, न चिं केळकर १९३३ दुसरी आवृत्ती, पान ६१ ) . या नौदलाच्या जोरावर
त्यांनी सिद्दीला ( जंजिरा ) पराभूत करण्याचे प्रयत्न केले . तसेच इंग्रज , डच ,
पोर्तुगीज इ परकीयांना मर्यादेत ठेवले .
नौदलाच्या प्रकारां विषयी – आजच्या
भाषेत समुद्रावरील नौदलाचे मुख्य दोन प्रकार
होतात – एक – ज्याला “ ब्ल्यु वॉटर नेव्ही “ म्हणतात ते. ब्ल्यु वॉटर
नेव्ही, हे उघड्या समुद्रात लांबवर जाऊन सागरी लढाया करणारे असे असते. १७/१८ व्या
शतकात अशा नौदलात मोठी जहाजे ( ३०० – १००० टन वजनाची ), ३ - ५ मोठी शिडे असणारी व २० – ६० लहान मोठ्या आणि अचूक पल्ला असणाऱ्या तोफांनी
युक्त अशी असत. त्याच बरोबर, रसद पुरवण्या करता लहान आकाराची जहाजे पण असत. अशी
जहाजे समुद्री वाऱ्याचा जोर, योग्य दिशेने असल्यास , फार वेगाने पाणी कापत प्रवास
करू शकत असत. तीच जहाजे, वारा नसल्यास किंवा किनाऱ्या वरील उथळ पाण्यात काहीच
हालचाल करू शकत नसत. इंग्रज, पोर्तुगीज, डच ह्या परकीयांचे नौदल आशा प्रकारचे
होते. त्यामुळेच ते जगभर आपल्या वसाहाती स्थापन करू शकले !
दूसऱ्या
प्रकाराला “ ब्राऊन वॉटर नेव्ही “ म्हणतात. असे नौदल किनाऱ्यालगत वावरणारे व
त्याचे रक्षण करणारे असते. शिवाजी
महाराजांनी तयार केलेले नौदल हे आशा प्रकारचे होते. त्यातील जहाजे लहान ( १२० टना
पर्यन्त होती ). त्यावर २ - १० छोट्या तोफा असत परंतू त्या लांब किंवा अचूक
नव्हत्या. बऱ्याच संख्येने गुराब ( ४ तोफा ) आणि गलबते ( २ तोफा ) होती. अशा
जहाजांवर एक किंवा दोन डोलकाठ्या असत. ह्या पैकी बऱ्याच नौका वेळपडल्यास
वल्हवून प्रवास करू शकत होती. शिवाय
छोट्या सपाट तळ असलेल्या नौका मोठ्या संख्येने होत्या. अशा तऱ्हेची जहाजे / नौका
किनाऱ्या लगतच्या खाडीमध्ये किंवा उथळ पाण्यात सहज वावरू शकत असत. त्यांना समुद्री
वाऱ्याची मदत न मिळाल्यास फारसा फरक पडत नसे, कारण त्या वल्हवून पसार होऊ शकत.
परंतू असे नौदल खोल समुद्रात जाऊन सागरी
लढाया करण्याच्या योग्य नव्हते. तसेच वाऱ्याचा उपयोग करून फार वेगाने प्रवास करू
शकत नसत. त्यामुळेच अशी जहाजे / नौका किनाऱ्या पासून लांब जायला टाळत असत. थोडक्यात
ब्ल्यु वॉटर नेव्ही मधील जहाजे – किनाऱ्या
लगत येऊ शकत नसत आणि ब्राऊन वॉटर नेव्ही मधील - किनाऱ्याहून लांब जाऊ शकत नसत. त्यामुळे
किनाऱ्या जवळील समुद्रात मराठ्यांचे नौदल वर्चस्व गाजवू शकत असे, पण खोल समुद्रात
किंवा किनाऱ्या पासून लांब मात्र, उलटी परिस्थिति होई.
हा
मूलभूत आणि महत्वाचा फरक स्वदेशी आणि परकीय नौदलां मध्ये होता. शिवाजी महाराजांचे
नौदल (ब्राऊन वॉटर नेव्ही) प्रकारचे होते व इंग्रज, पोर्तुगीज अशा परकीयांचे
ब्ल्यु वॉटर नेव्ही प्रकारचे होते. ( पुढे कान्होजी आणि तुळाजी आंग्रे यांनी इंग्रजां
सारखी मोठी जहाजे बांधली. परंतु त्यांची संख्या कमी होती आणि त्यावरील तोफा व
दारूगोळा तितक्या चांगल्या प्रतीचा नव्हता. )
शिवाजी
महाराजांचे नौदल, हे सिद्दीचा पराभव करायला, किनाऱ्याच्या किल्ल्यांचे / प्रदेशाचे
रक्षण करणे, सागरी व्यापार निर्धोक करणे व इंग्रज / पोर्तुगीज अशा परकीयांच्या
जहाजांवर वचक ठेवण्या करता तयार केले होते . खोल समुद्रात जाऊन लढाया करून प्रदेश
जिंकणे हा उद्देशच नव्हता.
शिवाजी महाराजांच्या नौदला विषयी खास बाबी -
१)
शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण जिंकल्यावर तेथे किल्ला बांधला. तोच दुर्गाडी
किल्ला. आपल नौदल उभारण्या संबंधीत त्यांची ही पाहिली महत्वाची हालचाल होती.
२)
१६५७/८ मध्ये जेंव्हा शिवाजी महाराजांनी
तळे घोसाळे जिंकले तेव्हा त्यांची हद्द, सिद्दीच्या प्रदेशाशी ( नागोठणे )
भिडली आणि तेंव्हाच त्यांनी ओळखले की, किनाऱ्याला आणि स्वराज्याला सुद्धा सर्वात
जास्त धोका हो सिद्दी पासून आहे. ( रायगड आणि जंजिरा हे सरळ रेषेत अंतर फक्त ५२ की
मि आहे.) शिवाय, तो उभी पिके जाळणे, माणसे पळवणे,प्रदेश उद्ध्वस्त करणे, असे
उद्योग करून जनतेला खूप त्रास देत असे. त्याचा पराभव / बंदोबस्त करायचा असेल तर
फक्त जमिनी वरील त्यांची रसद तोडून चालणार नाही. त्या करता सुसज्ज नौदल असणे
गरजेचे आहे हे त्यांना उमगले.
३)
१६५७ च्या सुरवाती नंतर फक्त ८ वर्षात त्यांनी बसरूर ( बेदनूर-कर्नाटक )ची सागरी
मोहीम ( ८ फेब्रूवारी १६६५ ), स्वता: भाग घेऊन यशस्वी केली. हीच त्यांची पहिली व
शेवटची सागरी मोहीम, ज्यात त्यांनी भाग घेतला . त्यात ६००० फौज, तीन मोठी जहाजे व
८५ गलबते होती.
४)
शिवाजी महाराजांनी बांधलेल्या नौदलात, जहाजे/नौका यांची बांधणी जरी
इंग्रज/पोर्तुगीज यांच्या सारखी होती तरी, त्यांचा आकार (वजन-टन), प्रकार, त्या
वरील तोफा/दारू गोळा हे सर्व कमी प्रतीचे
होते. ( हीच उणीव १८ व्या शतकात सुद्धा कायम होती. कान्होजी व तुळाजी
आंग्रे यांनी ती बऱ्याच प्रमाणात भरून काढायचा प्रयत्न केला. )
५)
बरेच प्रयत्न करूनही शिवाजी महाराजांना ( नंतर संभाजी महाराज व पुढे पेशवे यांना
सुद्धा ) सिद्दीचा पराभव करून त्याला जंजिऱ्याहून समूळ उखडून टाकणे जमले नाही. याचे
प्रमूख कारण – सिद्दीचे मोठे आणि शक्तिशाली नौदल, आणि मराठ्यांचे त्याच्या मानाने
लहान नौदल हे होते. त्यामुळे जंजिऱ्याला पक्का सागरी वेढा घालणे त्यांना जमले
नाही. शिवाय वेळो वेळी इंग्रज, पोर्तुगीज, मोगल इ सिद्दीला ( रसद, तोफा/दारूगोळा,
नाविक ) मदत करत असत.
६)
१६७९ मध्ये शिवाजी महाराजांनी खांदेरी बेट ताब्यात घेऊन त्यावर सागरी किल्ला बांधायला सुरवात केली. सिद्दी आणि इंग्रज यांनी बरेच
प्रयत्न करूनही त्यांना खांदेरी जिंकणे जमले नाही. त्यावेळेस झालेल्या व १६७४ ची
सातीवलीची अशा काही मोजक्याच सागरी लढाया शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत झाल्या.
७)
आंग्रे घराण्याची नाविक कारकीर्द,- सेखोजी आणि तुकोजी ( कान्होजींचे वडील )
आंग्रे, यांच्या पासून झाली. ते दोघेही शिवाजी महाराजांच्या नौदलात सुवर्णदुर्गा
वर होते.
शिवाजी
महाराजांच्या १६८० मधील मृत्यू नंतर, संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या प्रचंड
आक्रमणाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे तयार झालेल्या आरमाराचा उपयोग करून
सिद्दीला पराभूत करणे जमले नाही. ( १६८१/८२ मध्ये त्यांनी दोन मोहीमा सिद्दीविरुद्ध
काढल्या होत्या, परंतु त्यात आरमाराचा ऊपयोग मोठ्या प्रमाणावर नव्हता. ) संभाजी
महाराजांच्या १६८९ मधील वधानंतर, राजाराम महाराजांना, जिंजी ( तामिळनाडू ) येथे
जाणे भाग पडले. अतिशय अस्थिर अशा परिस्थि मुळे त्यांना आरमाराकडे लक्ष द्यायला
जमले नाही. परंतु त्यांच्या, नंतर आलेल्या ताराराणींच्या कारकीर्दी मध्ये कान्होजी
आंग्रे यांचा उदय झाला.
२ ) कान्होजी आंग्रे यांचा कालखंड ( १६९४ – १७२९ )
कान्होजी
आंग्रे यांचा जन्म – १६६९ च्या सुमारास झाला असावा. त्यांचा मृत्यू ४ जुलै १७२९ मध्ये
वयाच्या ६० व्या वर्षी झाला. ते मराठ्यांच्या नौदलात १६८१/८२ मध्ये सामील झाले
असावेत. १६९४ मध्ये ताराराणींनी कान्होजी यांना विजयदुर्गचा सरखेल नेमले, आणि
ध्वजाधिकारी व सेना सरखेल अशा पदव्या दिल्या. पुढे कान्होजिंनी आपले ठाणे कुलाबा
येथे स्थापन केले. १६९८ पर्यन्त, त्यांनी मोगलांनी जिंकलेला किनाऱ्यावरील, जवळपास
सर्व प्रदेश जिंकला व किल्ले परत मिळवले. १६९८ मध्ये सिधोजी गुज्जर वारले आणि
मराठा नौदलाची सूत्रे कान्होजिंच्या हातात आली. त्याच वर्षी राजाराम महाराजांनी,
ते सताऱ्यास असतांना – कान्होजीस, वयाच्या ३० व्या वर्षी – वस्त्रे, सरखेल पद, आणि
सुवर्ण दुर्गाची मुखत्यारी दिली. तेंव्हा पासून कान्होजिंच्या नाविक कारकीर्दीस
बहर आला.
तोपर्यन्त
त्यांना पूर्ण कल्पना आली होती, की आपली जहाजे इंग्रज / पोर्तुगीज यांच्या
जहाजांच्या तुलनेत- आकार, वजन, तोफा इ बाबतीत - कमी प्रतीची आहेत. लगेच, त्यांनी
आपले नौदल सक्षम करण्या करता हालचाली सुरू केल्या. मान्युएल डी कार्वालो या
पोर्तुगीज इसमास आपला जहाज बांधणी आणि रचनेचा सल्लागार नेमला आणि इंग्रजांच्या
तोडीची काही जहाजे तयार केली. तसेच अनेक परदेशी तंत्रज्ञ, बंदूकबाज, बंदूकीच्या
नळया आणि दारू तयार करणारे कारागीर अशा अनेकांना, आपल्या नोकरीत ठेवले. खलाशांना वेळेवर
चांगले पगार देऊ केल्या मुळे अनेक, डच, पोर्तुगीज, अरब त्यांच्याकडे चाकरीस येऊ
लागले. १७०४/५ च्या सुमारास कान्होजीं कडे १६-२० तोफा असलेली १० गुरबे, ज्यात काही
४०० टन वजनाची पण होती. शिवाय, ४-१० तोफांची, ६०-१२० टनाची ५० गलबते होती. हा काफिला जरी लहान असला तरी
सक्षम होता.
पेशवे
बाळाजी विश्वनाथ यांच्या प्रयत्नाने कान्होजी, ताराराणींचा पक्ष सोडून शाहू
महाराजांना सामील झाले. १७१३ मध्ये शाहू महाराजान बरोबर झालेल्या कारारा प्रमाणे
त्यांना १० जंजिरे ( सागरी किल्ले ) , १६ जमिनीवरील किल्ले ( राजमाची इ ) व ३६ लाख
उत्पन्नाचा मुलुख मिळाला. कान्होजींना “ सरखेल व वझारत – ए – आब “ हे हुद्दे वंश
परंपरेने कायम झाले. शिवाय पेशव्यांच्या मार्फत, जरूर असेल तेव्हा सैनिकी मदत
मिळण्याची हमी मिळाली. त्या मुळे कान्होजींच्या – समुद्र व जमीन, ह्या दोन्ही बाजू
समर्थ झाल्या. परंतु त्यांचे खरे कर्तुत्व, मराठ्यांचे सागर किनाऱ्या वरील वर्चस्व
गाजवण्यात दिसले.
कान्होजींना
सुद्धा, शिवाजी महाराजां प्रमाणेच तीन प्रमुख समस्यांना तोंड द्यायचे होते. १ )
मराठी व्यापारी जहाजांचे, मलबारी
चाच्यांपासून रक्षण करणे, २ ) कोकणातील जनतेचे सिद्दी पासून रक्षण करणे, ३ ) कोकण
किनाऱ्यावर आपली सत्ता स्थापन करणे. त्यात त्यांना – जंजिरेकर सिद्दी, मुंबईचे
इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज, वेंगुर्ल्याचे डच, वाडीचे सावंत अशा नाविक शक्तींना
तोंड द्यायचे होते.
आपले आरमारा
सक्षम केल्यावर, मग त्यांनी आपले “दस्तक” नसलेली ( आपल्या सागरी हद्दीतून
प्रवासाकरता लागणारा परवाना, ज्याकरता “कर” भरावा लागत होता ) जहाजे पकडण्याचा /
बुडवण्याचा सपाटा चालू केला. शिवाजी महाराजांचे हेच धोरण होते ! ( अशा तऱ्हेच्या
परवान्याची पद्धत १६/१७ व्या शतकात, अरबी समुद्रात, पोर्तुगीजांनी प्रथम सुरू
केली. अशा परवान्यांना ते “ करताज “ म्हणत
असत. जी जहाजे त्यांचा “करताज” घेतल्या शिवाय प्रवास करीत, त्यांना ते पकडून ठेवीत
किंवा सरळ बुडावीत असत . १६ व्या शतकात ते स्वता:ला अरबी समुद्राचे राजे म्हणवून
घेत होते ! )
कान्होजींना
असे धोरण राबवताना, इंग्रज, पोर्तुगीज इ जबर परकीय नाविक शक्तींचा सामना करावा
लागला. त्यातल्या त्यात, इंग्रजांबरोबर त्यांचे सर्वात जास्त झगडे झाले. ह्याला
कारण इंग्रजांची लबाडी. मुख्य मुद्दा - जहाज कोणाच्या मालकीचे, माल कोणाचा आणि
दस्तक कोणी घ्यायचे , हा होता . जहाज मालक इंग्रज नसले तरी माल इंग्रजांचा असे व
इंग्रजी निशाण लावून अशी जहाजे प्रवास करीत. कान्होजींच्या दृष्टीने अशा जहाजांनी
मराठ्यांचे दस्तक घेणे जरूरीचे होते. त्यामुळे कान्होजींनी हरकत घेतली व तशी जहाजे
पकडण्याचा सपाटा लावला. ह्या परिस्थित भर पडली ती, कान्होजींच्या वाढत्या नाविक
शक्ति मुळे. इंग्रजांना मुंबईच्या तर पोर्तुगीजांना गोव्याच्या सुरक्षिततेची काळजी
वाटू लागली ! वेंगुर्ल्याच्या डच लोकांना कान्होजींचे वर्चस्व सहन होत नव्हते .
सिद्दी तर आधीपासूनच शत्रू होता. परंतु
त्याच्याशी यशस्वी लढा देऊन त्याला नामोहरम केले. शेवटी कान्होजी आणि सिद्दी
यांच्यात ३० जानेवारी १७१५ मध्ये तह झाला व सिद्दी पुढील १० वर्षे सागरी हद्दीतून
नाहीसा झाला.
इकडे
२६ डिसेंबर १७१५ ला चार्ल्स बून हा मुंबईचा गव्हर्नर झाला. त्याने कान्होजींचा
धोका संपवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरवात केली. एप्रिल १७१८ मधील
इंग्रजांचा घेरिया ( विजय दुर्ग ) वरील पहिला
हल्ला अयशस्वी झाला. शेवटी १७ जून
१७१८ रोजी इंग्रजांनी कान्होजीं विरुद्ध
उघडपणे युद्ध पुकारले. खांदेरी वरील मोहीम ( नोव्हेंबेर १७१८ ) अयशस्वी ठरली.
घेरिया वरील दुसरी मोहीम ( सेप्टेंबर १७२० ) ही सुद्धा अयशस्वी झाली. १७२१ मध्ये
इंग्रज व पोर्तुगीज यांनी कान्होजींच्या कुलाब्या विरुद्ध फार मोठी संयुक्त मोहीम
काढली , ज्यात त्यांचे - सैन्य व नाविक दल सामील होते . ह्या मोहिमेला तोंड
देण्याकरता शाहू महाराजांनी पिलाजी जाधव यांच्या नेतृत्वा खाली १००० पायदळ व १५००
घोडदळाची मदत पाठवली. ३० डिसेंबरला बाजीराव
स्वता: २५००० सैन्य घेऊन मदतीला आले. काही चकमकीं नंतर इंग्रज / पोर्तुगीजांना
माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांची युती संपुष्टात आली. पुढे १७२४ मध्ये डचांनी
घेरिया ( विजय दुर्ग ) विरुद्ध मोहीम काढली, ज्यात त्यांना माघार घ्यावी
लागली. अशा तऱ्हेने कोकण किनाऱ्या वरील
सर्व नाविक शक्तींशी लढा देऊन ( स्वकीय – सावंत, देसाई, कोल्हापूरकर, परकीय –
इंग्रज, पोर्तुगीज, डच ) मराठ्यांच्या नाविक शक्तीचे वर्चस्व मान्य कारायला लावले !
त्या मुळे हे सर्वजण एकत्रित किंवा स्वतंत्रपणे कान्होजींचा नाश करायला टपले होते.
कान्होजी आंग्रे यांचे कर्तुत्व : कान्होजींनी
आपली कारकीर्द सुरू केली ( १६९४ ) तेंव्हा, कोकण किनारपट्टी वर मोगलांचे वर्चस्व
होते. त्यामुळे सिद्दी शिरजोर झाला होता. स्वराज्य नष्ट होत आले होते. नौदलाकडे
लक्ष द्यायला कोणालाच फुरसत नव्हती. अशा परिस्थित त्यांना १६९८ मध्ये “ सरखेल “ पद
मिळाले. शिवाजी महाराजांनी तयार केलेले नौदल त्यांना मिळाले असले, तरी कोणत्याही
पाठबळशिवाय त्यांना त्यांची पुनर्बांधणी करावी लागली. मग त्यांनी सिद्दीशी टक्कर
द्यायला सुरवात केली आणि १७१३ पर्यंत, बरीचशी कोकण किनारपट्टी स्वतंत्र पण आपल्या
नियंत्रणाखाली आणली. त्या आधीच आंगऱ्यांचा “ दस्तक “ ( समुद्री परवाना ) इतर
जहाजांनी बाळगण्याची सक्ती सुरू करून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू केली. त्यात
त्यांनी कोणाचीही गय केली नाही. हे करतांना त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, आणि डच,
अशा बलाढ्य नाविक शक्तींना आव्हान दिले, जे ह्या परकीय शक्तींना अपमानास्पद वाटू
लागले होते. १८ व्या शताकाच्या सुरवातीस, एक स्थानिक सागरी सत्ता, तीन समर्थ परकीय
नाविक शक्तींना आव्हान देते , ही घटनाच अभूतपूर्व होती !
मराठी राजवटीत जमिनीवरील युद्धात - शिवाजी
महाराज, थोरले बाजीराव, चिमाजि अप्पा, सदाशिवराव भाऊ, मल्हाराव होळकर, महादाजी
शिंदे, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, असे अनेक कर्तुत्ववान सेनानी होऊन गेले. परंतु
सागरावर वर्चस्व सिद्ध करणारे ते भारतातील त्याकाळचे, पहिलेच सेनानी ! हे सर्वात
महत्वाचे परंतू कठीण काम जवळपास त्यांनी स्वबळावर व स्वतंत्रपणे केले, हे विशेष. राजकारणातही
त्यांनी बरीच दूरदृष्टी दाखवली. राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज,
बाजीराव, अशा ४ राज्यकर्त्यांशी जुळवून
घेऊन आपले राजकीय कौशल्य दाखवले ! ते नुसतेच उत्कृष्ट नौसेनानीच नव्हते, तर चतुर
राजकारणी पण होते, हे त्यांच्या पत्रव्यवहारा वरून दिसून येते. ते उत्तम प्रशासकही
होते. त्यांनी, जमिनी वरील आणि सागरी युद्धात- दोन्ही ठिकाणी आपले कौशल्य दाखवले.
शिवाजी महाराजां नंतर ते भारतातील बहुदा एकमेव असे सेनानी होते की ज्यांनी जमिनी
वर आणि सागरावर आपले प्रभुत्व सिद्ध केले. एका परकीय पुस्तकात कान्होजींना “ लॅंड
शार्क “ (मगर) अशी उपमा दिलेली आहे . मगर जशी पाण्यात आणि जमिनी वर – दोन्ही
ठिकाणी धोकादायक असते, तसेच ते होते ! १८ व्या शतकाच्या सुरवातीस, दोन्ही ठिकाणी त्यांनी आपले वर्चस्व
गाजवले !
थोरल्या
बाजीरावांनी मराठी राजवटीची सत्ता यमुने पर्यन्त नेली , तेच काम कान्होजींनी
सागरावर केल . म्हणूनच भारताच्या मध्य युगीन नाविक इतिहासात, त्यांच्या सारखा
कर्तुत्ववान नौसेनानी झाला नाही असे इतिहासकार आणि नाविक युद्धशास्त्रातील तज्ञ –
दोघेही मानतात . हेच त्यांचे मोठेपण !
३ ) पेशवाईतील नौदल ( १७२९ – १८०० )
कान्होजी
यांना ६ मुलगे व एक मुलगी होती. ( सेखोजी सर्वात मोठा, त्या नंतर क्रमाने, संभाजी
, मानाजी, तुळाजी, येसाजी व धोंडाजी ) कान्होजी यांच्या मृत्यू नंतर शाहू
महाराजांनी २१ जुलै १७२९ मध्ये, सेखोजी याच्या वर “ सरखेल “ पदाची जबाबदारी
सोपवली. त्यांच्याच मदतीने बाजीरावांनी सिद्दी विरुद्धची मोहीम १७३३ मध्ये आखली
होती. परंतु सिद्दीला मोगल व इंग्रज यांनी मदत केल्या मुळे आणि बाजीराव –
प्रतिनिघी यांच्यातील मतभेदा मुळे ही मोहीम पुढे चालू शकली नाही. सेखोजीने –
संभाजी, मानाजी, तुळाजी, यांना सांभाळून चांगला कारभार केला. परंतु सेखोजीच्या
मृत्यू नंतर ( २८ ऑगस्ट १७३३ ), संभाजी- मानाजी , आणि मानाजी- तुळाजी असे वैर
उफाळून आले. त्या नंतर संभाजी आंग्रे सरखेल झाला. परंतु संभाजी – मानाजी आणखी
वितुष्ट वाढले. त्याचा परिणाम बाजीरावांच्या हस्ते १७३५ मध्ये, कान्होजी यांच्या
प्रदेशाची विभागणी होण्यात झाला. मानाजी कडे कुलाबा ते सुवर्ण दुर्ग आणि संभाजी
कडे सुवर्ण दुर्ग ते त्या खालचा दक्षिण भाग आला. ही विभागणी कोणास पसंत नव्हती.
त्या दोघांत मग गृह युद्ध सुरू झाले, ज्याचा फायदा इंग्रज, सिद्दी, पोर्तुगीज
यांनी घेऊन ते आणखी वाढवले. असे असूनही त्या दोघांनी चांगला कारभार केला. संभाजी
१२ जानेवारी १७४२ मध्ये मृत्यू पावला. तो ९ वर्षे सरखेल पदावर होता. त्याला वारस
नसल्याने, कोणास सरखेल करावे हा प्रश्न उभा राहिला. ( १७४८ पर्यन्त मानाजी व तुळाजी असे दोघेच
उरले. येसाजीस तुळाजीने व धोंडाजीस मानाजीने ठार मारले. )
या
सर्व घटनांचे पर्यवसन, आंग्रे यांचे ( पर्यायाने मराठा ) आरमार, विभागण्यात झाला.
इंग्रज व पोर्तुगीज यांना एक गोष्ट पक्की माहीत होती की, तुळाजी-मानाजी यांच्या
एकत्रित आरमारास ते हरवू शकत नव्हते. स्वतंत्रपणे ते एकेकाला हरवू शकत होते. शेवटी
तुळाजी सरखेल झाला. त्याच्याकडे २७ किल्ले / ठाणी आणि ३०,००० घोडदळ होते. त्याने
आपले नौदल सशक्त करायला सुरवात केली, ठाणी मजबूत केली, आणि कोकण किनारपट्टीवर आपली
पकड बसवली. (मानाजी मात्र कुलाब्याला राहून स्वतंत्र कारभार करत होता.) मग त्याने
१७३४ ते १७५४ या काळात, आपले “दस्तक” नसलेली जहाजे पकडण्याचा / बुडवण्याचा सपाटा
लावला, ज्यात इंग्रजांचीही बरीच जहाजे होती.
हे
सर्व करत असतांना त्याने काही घोडचुका केल्या. त्याने शाहू महाराज व पेशवे यांना
दुखावले. शिवाय तो आपल्याला पेशवे यांच्या बरोबरीचा समजू लागला व त्यांना दाद
देईनासा झाला, कारण तो व पेशवे हे छत्रपतींचे सेवक आहेत असे समजे. या उलट
पेशव्याना, इतर सारदारांनी, आपल्याला
प्रमुख मानावे अशी इछा होती. त्याने नाना साहेबा विरुद्ध ताराराणीस सामील
होऊन खुद्द पेशव्यांना शह द्यायचा प्रयत्न केला आणि नाना साहेबांची नाराजी ओढवून
घेतली. ( पेशव्यांना, तुळाजी व मानाजी हे दोघेही नको होते. त्यांना पेशव्यांचे स्वता:चे
नौदल हवे होते , ज्याची स्थापना त्यांनी १७३६ मधील पोर्तुगीजांवरील ( वसई )
विजयानंतर केली. )
शेवटी
नाना साहेबांनी तुळाजीस वठणीवर आणण्या साठी, इंग्रजांची मदत घ्यायचे ठरवले. पेशवे आणि इंग्रज यांच्यात मार्च १७५५ मध्ये
तुळाजीच्या प्रदेश/आरमार विरुद्ध एकत्रित कारवाई करण्या बाबत करार झाला. (
पेशव्यांचे आरमार, स्थापनेच्या जवळ जवळ १५ वर्षा नंतर सुद्धा, तुळाजीच्या मानाने
लहानच होते. ) इंग्रजांनी या मिळालेल्या संधीचा भरपूर फायदा घेतला, कारण तुळाजी व
मानाजी यांच्या एकत्रित नौदलास ते हरवू शकत नव्हते. परंतु एकट्याला गाठून त्याला
हरवू शकत होते.
पेशवे
यांच्या फौजा आणि इंग्रज आरमार यांनी २ एप्रिल १७५५ रोजी सुवर्ण दुर्गावर हल्ला
सुरू केला . ४ एप्रिल रोजी किल्ल्याने शरणागती पत्करली. तुळाजी मग विजय दुर्गाकडे
निघून गेला. ( नंतर तुळजीने पोर्तुगीजां बरोबर करार केला व त्यांची मदत घेतली ) .
पावसाळा संपल्यावर पेशव्यांच्या फौजांनी तुळाजीची लहान मोठी ठाणी काबिज करायला
सुरवात केली. जानेवारी १७५६ पर्यन्त त्यांनी विजय दुर्ग सोडला तर बाकी जवळपास सर्व
प्रदेश काबिज केला. १२ मार्च १७५६ ला इंग्रजांनी ( कंपनी व इंग्लंडच्या राजाचे
आरमर ) विजय दुर्गावर हल्ला सुरू केला. ह्या हल्ल्यात तुळाजीचे आरमार व दारू कोठार
– इंग्रजांच्याच पकडलेल्या जहाजावर
इंग्रजांचा गोळा पडून, लागलेल्या भयानक आगीत नष्ट झाले. शेवटी किल्लेदाराने
१४ मार्च रोजी शरणागती पत्करली. पेशव्यांनी तुळाजीला पकडून कैदेत टाकले. ३०
वर्षांच्या कैदे नंतर १७८६ मध्ये तुळाजी मरण पावला. मध्यंतरी मानाजी आंग्रे १२
मार्च १७५८ मध्ये मरण पावला.
सर्व
इतिहासकारांचे एकमत आहे की, नाना साहेबांनी इंग्रजांची मदत घेऊन तुळाजीला बुडवले,
ही गोष्ट अनुचीत होती. प्रमुख दोन गोष्टीं मुळे नाना साहेबांना दोष दिला जातो. एक –
त्यांनी तुळाजी सारख्या कर्तबगार माणसाचा मराठी राजवटीच्या विस्तारासाठी उपयोग
केला नाही. दुसर म्हणजे – त्यांनी, तुळाजीच्या परभवा नंतर , इंग्रजांना पश्चिम
किनाऱ्यावरील धोका नष्ट होऊन, ते शिरजोर होतील , ही गोष्ट लक्षात घेतली नाही. ही
टीका जरी रास्त असली तरी, दुसरी बाजू सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. टाळी एका हाताने
वाजत नाही, ह्या उक्ती प्रमाणे जेव्हडा दोष नाना साहेबांना दिला जातो तेव्हडाच दोष
तुळाजीस दिला पाहिजे.
एक
गोष्ट इतर इतिहासकारांच्या नजरेतून सुटली असावी. केरळच्या झामोरीन ( समुद्री )
राजाने, आपल्या पूर्वीचा सरदार- तिसरा कुंजली मराक्कर याला, १६०० मध्ये
पोर्तुगीजांच्या मदतीने पराभव, करून पकडले व नंतर त्याला ठार मारले ( बहुतेक
पोर्तुगीजांनी ). या दोन्ही घटनान मध्ये ( पेशवे १७५६ आणि झामोरीन १६०० ) विलक्षण साम्य आहे. फक्त पात्रे , काल व
स्थान बदलले, पण कारण तेच आहे. पेशव्यान ऐवजी झामोरीन, तुळाजी ऐवजी तिसरा मारक्कर
आणि इंग्रजां ऐवजी पोर्तुगीज होते ! तुळाजी आणि तिसरा मारक्कर यांनी , काही
कारणांमुळे राज्यकरत्यां विरुद्ध जाऊन त्यांचे शत्रुत्व ओढवून घेतले. त्याचा
परिणाम – जो कोणाच्याच हिताचा नव्हता तोच झाला. ह्या घटने नंतर १६०० मध्ये
पोर्तुगीजांना पश्चिम किनाऱ्यावर तोंड देऊ शकणारी एकही शक्ति उरली नाही, आणि १७५६
नंतर इंग्रजांना ! इतिहासाची पुनरावृत्ति झाली !
इथे
स्पष्ट करू इच्छितो की, ही घटना सांगून पेशव्यांचे समर्थन कारायचे नसून , फक्त १५०
वर्षा पूर्वीची घटना नजरेस आणून द्यायची होती ! पेशव्यांच्या हातून जी गोष्ट
घडायला काको होती , ती घडली, जिचे समर्थन होऊ शकत नाही ! ती चुकीचीच होती ! राज्यकरत्याने
नेहमी दूरदृष्टी आणि सय्यम ठेऊन वागाव अशी अपेक्षा असते !
पेशव्यांचे आरमार
पोर्तुगीजां
विरुद्धची वसई मोहीम झाल्यावर , पेशव्यांनी आपले आरमार वसईला शंकराजी केशवजी फडके
यांच्या अधिपत्या खाली १७३९ मध्ये स्थापन केले. पेशव्यांच्या आरमाराचा पहिला
संदर्भ इंग्रज व पेशवे यांच्यातल्या १७३९
माधील तहात आणि १७४०-४१ मधील पोर्तुगीज व पेशवे यांच्या तहात सापडतो. १७५० पर्यन्त
त्यांच्या आरमाराने सागरा वर आपली सत्ता स्थापन करायला सुरवात केली होती. १७५५
मध्ये एडवर्ड आईव्स याने मुंबई बंदरात दोन काफिल्यांचा उल्लेख केला आहे. पैकी एक
पेशव्यांचा व दूसरा मानाजीचा होता अस म्हटलं आहे. ( पान १७९ , प्रकरण ११ – पेशवे
कालीन आरमार ) . असे असूनही पेशव्यांचे आरमार फक्त दस्तकांची वसूली एव्हडयापूरतच
होत अस दिसत. तुळाजी विरुद्धच्या १७५६ मधील विजयदुर्गा वरील कारवाईच्या वेळीस त्यांनी
फार काही केल नाही. सर्व कारवाई इंग्रज आरमारानेच केली !
पुढे
काही छोट्या मोठ्या सागरी चकमकी घडल्या . पैकी एकीचा उल्लेख कारण योग्या होईल .
आनंदराव धूळप यांच्या कारकिर्दीत ही लढाई
१७८३ मध्ये इंग्रज व मराठ्यांच्या लढाऊ काफिल्यात, रत्नागिरी जवळ झाली . त्यात
सागरी व हातघाईची लढाई होऊन, इंग्रजांची जहाजे मराठ्यांनी काबिज केली. दोन्हीकडील
शेकडो माणसे कामाला आली, पण विजय मराठ्यांना मिळाला. धुळप कुटुंबीयांनी सागरा वरती
पराक्रमाची बरीच कामे केली. धुळपां प्रमाणेच विचारे , सुर्वे , जावकर, कुवेसकर
इ नाविक सरदारांनी बरेच पराक्रम गाजवले. पेशव्यांनी
नौदलात बऱ्याच कालानुरूप सुद्धरणा केल्या. दिशा पाहण्याचे होकायंत्र, वालुका यंत्र
( सॅंड क्लॉक ), दुर्भिनळया ( monocular )
वगैरेंचा वापर केला जात असे . विद्युत प्रकाशाचे काम चंद्रज्योतीच्या प्रकाशाने
केले जाई. जहाजावरील तोफां मध्येही बदल केला गेला. किनारपट्टी जवळील खोली
मोजण्याचा उद्योग चालू केला गेला व शतकाच्या शेवटी किल्ल्याचे नकाशे काढण्याचे काम सुरू झाले. अस असूनही , आंग्रे
यांच्या कारकर्दीतील मराठ्यांच्या आरमारचा दरारा पेशव्यांच्या आरमारास मिळवता आला
नाही ! आंग्रे घाराण्याचा पराक्रमासारखा पराक्रम, इतरांना गाजवता आला नाही, हेच
खरे !
समारोप
मराठ्यांच्या
नौदलाचा इतिहास वाचल्या नंतर काही गोष्टींची जाणीव होते –
१ )
मराठी नौदल हे किनयऱ्यांच्या रक्षणा साठीच उभारले गेले व तसेच शेवट पर्यन्त होते.
२ )
शिवाजी महाराजांच्या व थोरल्या बाजीरावांच्या “ गनिमी काव्या “ प्रमणेच मराठ्यांच्या
आरामराने सागरी गनिमीकाव्याचा उपयोग केला. त्यांना एक गोष्ट माहीत झाली होती की
सामोरा समोरच्या सागरी लढाईत इंग्रज/ पोर्तुगीज /डच आरमार वरचढ असून , आपला निभाव
लागणार नाही. त्याऐवजी एकटी दुकटी लढाऊ जहाजे, किनरया वर भरकटत आलेली व्यापारी
जहाजे अशांना घेरून त्यांना पकडत असत . किंवा परकीय लढाऊ गलबतानवर, वारा पडल्यावर जेंव्हा
ती हतबल असत, तेंव्हा हल्ला करीत असत. वेळ पडल्यास ते माघार घेत किंवा वल्ह्वून
खाडयान मध्ये पसार होत. थोडक्यात आपली शक्ति स्थाने व शत्रूची कमजोरी ओळखून हल्ला
करीत व विजय मिळवीत
३ ) मराठी आरमाराला सुद्धा – ( जमिनी वरील
सैन्या प्रमणेच ) सुरवाती पासून उत्तम, लांब पल्ल्याच्या तोफा, दारुगोळा यांची कमी
जाणवत होती. अशा प्रतिकूल परिस्थितही
पराठ्यांच्या नौदलाने १६५७ ( शिवाजी ममहाराजांच्या आरमाराची सुरवात ) ते १७५८ –
मानाजी आंग्रे यांचा मृत्यू ) या १०० वर्षांच्या काळात कोकण किनाऱ्यावर आपले निर्विवाद
वर्चस्व राखले. १७/१८ व्या शतकात भारतातील इतर कोणत्याही राज्यकर्त्यांना हे करणे शक्य झाले नाही.
अंतर्गत परिस्थिति बाबत
१ )
आंग्रे यांच्या घराण्यातील गृहकलह हा त्या वेळच्या सामाजिक चालीरीती नुसारच झाला.
जमिनी वरील ( शिंदे , होळकर इ ) व पेशवे
अशा सरदार कुटुंबांमध्ये होत होते, तेच
आंग्रे यांच्या सागरी सरंजामी कुटुंबात झाले . त्यात फरक काहीच दिसला नाही . तीच
भाऊबंदकी, जीवघेणी स्पर्धा, आपापसातल्या भांडणात बाह्य शक्तींची मदत घेणे, इतरांनी
त्याचा फायदा उचलणे इ, सगळीकडे होत होते, तेच तिथे झाले.
२ )
तुळाजीचे, पेशव्यांच्या बरोबरीने वागणे,
मान न देणे, त्यांना न जुमानणे, हेही इतर काही
सरंजामी सरदारांच्या ( दाभाडे, भोसले, जाधव इ ) वर्तनानुसारच होते. हा काही
अंशी, जुने नवे संघर्ष होता. जुने – दाभाडे, भोसले, जाधव, आणि नवे- पेशवे, असा
संघर्ष होता. आजही राजकारणात तो पाहायला मिळतो. शिवाय, पेशवे आणि इतर सरंजामी सदार
यांच्यातील संबंध फारसे स्पष्ट नव्हते. त्यात बरीच संदिग्धता होती.
३ ) नाना साहेबांनी तुळाजीचा विनाश करायला बाह्य
शक्तींची ( इंग्रजांची ) मदत घेणे, हे सुद्धा त्या काळच्या रीतीप्रमाणेच झाले.
राजपूत, निजाम इ राज्यकर्त्यांनी पूर्वी व नंतर हेच केले. फार कशाला, राघोबादादा,
दुसरा बाजीराव यांनी सुद्धा पुढे, इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांची राजवट खीळखिळी
केली.
४ ) जसा
शिवाजी महाराजांना स्वकीयांचा सामना करावा लागला, त्या प्रमाणेच आंग्रे यांना, -
वाडीचे सावंत, देसाई यांना वठणीवर आणावे लागले.
५ )
शिवाजी महाराजांनी १७ व्या शतकात जेव्हा आरमार स्थापन केले, तेव्हा, त्यांच्या
दृष्टीने कोकण किनारपट्टीला सामारीक महत्व ( strategic importance ) होते. परंतु १८ व्या शतकात, पेशवाईत,
मराठा राजवट उत्तरेत वाढत गेली आणि कोकण किनार पट्टीचे महत्व त्यांच्या दृष्टीने
कमी कमी होत गेले. ही चूक झाली की नाही, हा मुद्दा अलाहिदा. त्यामुळे बाहूदा
आरमाराला तेव्हडे महत्व त्यांनी दिले नाही.
++++++++++++++++
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा