Menu

 प्लासी आणि बक्सरच्या लढाया व त्याचे भारतावरील परिणाम

 लेख लिहिण्या मागचा उद्देश – इतिहासकार , ब्रिटिश सत्तेची सुरवात १७५७ पासून धरतात . ह्याचे कारण – १७५७ ला प्लासीची           ( बंगाल ) लढाई होऊन , कंपनीला एतदेशीय सत्ताधार्‍या विरुद्ध , भारतातला पहिला विजय मिळाला . ह्या विजयाने , कंपनीचे भारतातील राजकीय व आर्थिक बस्तान बसायला सुरू होऊन – राज्य स्थापनेचा पहिला अंक लिहिला गेला . १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळे पर्यन्त –१९० वर्षे इंग्रजांनी जे राज्य केले, त्याची सुरवात प्लासीच्या लढाईने झाली ! इतके ह्या लढाईचे महत्व आपणा सर्वांच्या दृष्टीने आहे .

 १ ) प्लासीची लढाई ( २३ जून १७५७ ) व तिचे परिणाम

अ ) प्लासीच्या आधीची बंगाल सुभ्याची व भारतीय उपखंडाची आर्थिक पार्श्वभूमी ---

आठराव्या शतकाच्या मध्या पर्यन्त ( १७५० ) भारतीय उपखंड, जगाचे “ कारखानदार होते . जागतिक उत्पन्नाच्या २५ % हिस्सा हा भारताचा होता . त्यामानाने इंग्लंडचा फक्त १.९ % होता . आलेकझांडर डोव याने, त्याच्या “ हिंदुस्तानचा इतिहास – [१७७३] “ ह्यात म्हटले आहे  की “ प्लासीच्या आधी , जगाचा बंगाल बरोबरचा व्यापार हा बंगालच्या बाजूला पूर्णपणे झुकलेला होता.  पुढे तो असे म्हणतो की “ बंगाल हा असा प्रदेश आहे की ज्यात सोने व चांदी फक्त बाहेरून येत होती , ती परत जायची शक्यताच  नव्हती “ .थोडक्यात कापडाच्या निर्यातीने , बंगाल मध्ये जगामधून सोने , चांदी मुबलक प्रमाणात येत होती . त्यामुळेच बहूतेक बंगालचा सुभा हा मोगल साम्राज्याचा सर्वात “ श्रीमंत “ सुभा होता . औरंगजेब, बंगाल सुभयाचे वर्णन     “ भारताचा आर्थिक स्वर्ग “ असे करीत असे 

 

बंगालचे तलम कापड हे इतके उत्तम प्रतीचे व कमी किमतीचे होते की आठराव्या शतकाच्या शेवटा पर्यन्त ते इंग्लंड मध्ये , स्थानिक कापडापेक्षा – ५० – ६० % कमी किमतीत विकूनही , व्यापारात बराच फायदा होत असे . प्लासीच्या लढाई नंतर मात्र , कंपनीने बंगालची पद्धतशिर  “ लूट आरंभली , ज्या मुळेच परिस्थिति उलटी होऊन , बंगाल हळू हळू कंगाल होत गेला .

प्लासी पूर्वीचा ( १७५७ पूर्वी  ) बंगाल  - औरंगजेब ( राज्यकाळ १६५८ – १७०७ )  च्या काळात बंगालचा सुभा , ज्यात – अखंड बंगाल , बिहार व ओरिसा ही राज्ये होती . पूर्ण सुभयावर सुभेदार असे व त्याच्या हाताखाली “ नवाब “ असत . १७५० मध्ये , अलिवर्दी खान , जो बंगालचा सुभेदार होता त्याने , कंपनीने चालवलेल्या - १७१७ च्या बादशाही फरमानाच्या गैर वापराबद्दल -  कडक घोरण स्वीकारले होते .  त्याच्या मृत्यू नंतर , एप्रिल १७५६ मध्ये, त्याचा नातू सिराज उद्दौला ( वय २१ )  बंगालचा नवाब झाला .  सिराजने सुद्धा कंपनी विरुद्ध , त्याच “ फरमाना “ च्या बेकायदेशीर , पद्धतशिर गैरवापरा बद्दल मोहीम उघडली . त्यामूळेच ईस्ट इंडिया कंपनी ( कलकत्ता ठाणे ) व सिराज यांच्यात बराच मोठा वाद व  कडवटपणा निर्माण झाला . त्याचे पर्यवसन १७५७ च्या प्लासी च्या लढाईत झाले . त्यातून पुढे “ बक्सर “ चे महाभारत घडले !

ब ) प्लासी ( बंगाल ) ची लढाई - २३ जून १७५७ ला – कंपनी ( रॉबर्ट क्लाइव ) आणि सिराज उदौला ( बंगाल प्रांताचा – बंगाल , बिहार , ओरिसा - चा सुभेदार ) आणि थोडे फ्रेंच सैनिक , यांच्या मध्ये झाली . प्लासी हे कलकत्त्याच्या उत्तरेस , रस्त्याने १७५ की मी वर आहे . क्लाइवची अवस्था फारशी चांगली नव्हती . क्लाइव कडे जेमतेम ३००० एव्हडीच फौज होती.  या उलट सैनिकांच्या बाबतीत सिराजची स्थिति फारच चांगली होती . त्यावेळेस सिराजकडे ४० तोफा , १५ हजार स्वार व ३० हजार पायदळ एव्हडी फौज होती . परंतू ऐन लढाईत - सेनापति मिर जाफर , राय दुर्लभ आणि यार लतीफ हे (आधीच फितूर झाल्याने , ठरल्या प्रमाणे )  लढलेच नाहीत आणि लांब जाऊन उभे राहिले . त्यामुळे सिराजचा पराभव झाला . प्रत्यक्ष लढाई फारशी झालीच नाही . सिराजचा सरदार मिर मदान गोळी लागून ठार झाल्यावर , सिराजचा धीर सुटला व तो  पळून गेला . त्यामुळे आपोआप क्लाइव ( कंपनी ) चा विजय झाला . जर सिराज न घाबरता, उरलेले सैन्य घेऊन क्लाइवच्या फौजेवर चालून गेला असता , तर त्याचा विजय निश्चितच झाला असता

उघड उघड व सामोरासमोर - भारतीय उपखंडातील एतत्देशीय, सत्ताधीशांशी लढाई करण्याचा हा , कंपनीचा पहिलाच प्रयत्न होता , ज्यात ते अनायासे फारशी लढाई न होता ( फितूरी मुळे ) विजयी झाले . त्यामुळेच ह्या लढाईस काही इतिहासकार “ व्यापारी देवाणघेवाण झाली “ असे म्हणतात .  त्यात जगत सेठ  , उमीचंद  ह्या बंगालच्या धनाढ्य व्यपार्‍यांनी फितुरीचा कट घडवून आणण्यात महत्वाची कामगिरी केली होती .      

लढाईतील सिराजच्या परभवाला फितुरी एव्हडेच – त्याचे कमकूवत / कचखाऊ नेतृत्व , भाडोत्रि सैनिकांचा भरणा असलेले अव्यवस्थित , बेशिस्त सैन्य ही सुद्धा कारणे होती . त्याच बरोबर क्लाइवचे खंबीर व हिम्मतवान नेतृत्व , इंग्रजी तोफा/ बंदुकांची सरस कामगिरी , त्यामानाने व्यवस्थित व शिस्तीत असलेले त्याचे सैन्य हेही कारणीभूत होते .

प्रश्न असा उपस्थित होतो की , त्यावेळेस ,सिराजला दिल्लीहून , किंवा मराठ्यान कडून मदत का केली गेली नाही ? ह्याचे उत्तर १७५७ मध्ये प्रामुख्याने दिल्लीतील घडामोडी पाहील्यास मिळते . 

प्लासीच्या लढाईच्या ( १७५७ ) वेळेस – दिल्ली आणि मराठी राजवटीतील  घडामोडी –

बंगालचा सुभा, अलीवर्दी खानाच्या वेळेपासूनच ( १७४०/१ ) जवळपास स्वतंत्र  झाला होता . दिल्लीचा अम्मल हा नावापुरता होता .२१ एप्रिल १७५६ ला अलीवर्दी खानाचा मृत्यू झाल्यावर , सिराज उदद्दौला गादी वर बसला . लढाईचे मूळ कारण , कंपनी व सिराज ह्यांच्यातल्या मतभेद हे होते . त्यामुळेच   “ प्लासी “ ची लढाई – २३ जून १७५७ प्रामुख्याने स्थानीय घटना ( बंगाल ) होती , असा निष्कर्ष काढता येतो .ह्यात मराठ्यांचा व दिल्लीचा संबंधही नव्हता .

त्याच सुमारास दिल्लीवर अब्दालीची तिसरी स्वारी नुकतीच झाली होती व तो १७५७ एप्रिल मध्ये परत गेला . त्या वेळेस दिल्लीत – आलमगिर – II ( १७५४-५९ ) , हा पातशाह होता , परंतु तो वजीर गाजिउद्दीन ( इमाद उल मुलक )  च्या कब्जात  होता . पातशाहने  त्याचा मुलगा – अली गोहर ( शहा आलम – II ) याला , गाजिउद्दीन पासून वाचवून , दिल्ली बाहेर काढले होते .अली गोहर आधार शोधत भटकत होता . आशा गोंधळाच्या परिस्थित , सिराजला दिल्लीहून मदत मिळणे शक्यच नव्हते .

जून १७५७ मध्ये मराठे गाजीउद्दीन बरोबर – मोगली उत्पन्नाच्या – चौथ ( एक चतुर्थांश ) ऐवजी अर्धी रक्कम मिळण्या बाबत बोलणी करत होते . राघोबदादा , जून  १७५७ ला दिल्लीच्या वाटेवर होते आणि ११ ऑगस्ट १७५७ ला रघुनाथ दादांनी दिल्ली जिंकली होती .

थोडक्यात , मोगल आणि मराठे ह्यांचे , प्रामुख्याने , अब्दालीच्या १७५६ च्या स्वारीमुळे बंगालकडे लक्ष नव्हते . सिराजला त्यांची मदत मिळू शकली नाही . त्यामुळे सिराजला आपल्या बाळावर इंग्रजां विरुद्ध लढव लागलं , ज्यात त्याचा पराभव झाला . अर्थात विजया करता सिराजला मदतीची अवशकता नव्हती , कारण सैन्याच्या बाबतीत तो इंग्रजांपेक्षा फारच वरचढ होता . इंग्रजांचे सैन्य फारच तुटपुंजे होते !      

क ) प्लासीच्या लढाईचे बंगाल आणि भारतीय उपखंडावर झालेले परिणाम :- प्लासीची लढाई, इंग्लंड मध्ये,  ईस्ट इंडिया कंपनीच्या इतिहासात “ बंगालची क्रांति “ म्हणून प्रसिद्ध झाली . प्लासीच्या लढाईने कंपनीच्या भारतातील सत्ते करता पार्श्वभूमी तयार झाली . प्लासीच्या घटने मधूनच, पुढे बक्सरची लढाई ( १७६४ ) झाली , जिने  कंपनीच्या भारतातील आर्थिक व राजकीय सत्तेचा पाया घातला .  

 १७५७ ते १७६५ पर्यन्तच्या ८ वर्षांच्या काळात -– कंपनी, क्लाइव व इतरांनी  एकंदर रु ६.०८ कोटी एव्हडी भली मोठी रक्कम - नुकसान भरपाई , बक्षीस इ कारणास्तव , नाबाबांकडून ( मिर जाफर , मिर कासिम ) वसूल केली .

परंतु ह्या सर्व “ लूटी “ मुळे नवाब ( आणि बंगाल ) मात्र कर्जबाजारी होत गेला .त्या कर्जाच्या पायी त्यांना - बंगालची जमीन ( वसूलीचे उत्पन्न )  कंपनीला द्यावी लागत होती. ह्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात बरीच वाढ झाली  हे उत्पन्न – व्यापारा शिवाय व अधिक होते . एका अनुमाना प्रमाणे प्लासीच्या नंतरच्या १० वर्षात बंगालचे २/३ उत्पन्न , हे कंपनीने व्यापारी लूटी मध्ये फस्त केले ! १७५७ ते १७६७ पर्यन्त कंपनीने इतकी लूट , बंगाल आणि पर्यायाने भारताच्या सर्वात श्रीमंत सुभ्याची केली .

प्रसन्न परथासारथी यांच्या नुसार , उपलब्ध पुराव्या वरून असे दिसते की  , प्लासी पूर्वी बंगालचे विणकर , त्यावेळच्या इंग्लंड मधील विणकरान पेक्षा आर्थिक दृष्ट्या  , अधिक सुरक्षित होते व त्यांचे जीवनमान , इंग्लंड मधील विणकरांपेक्षा , चांगल्या प्रतीचे  होते . प्लासी नंतर मात्र , कंपनीच्या व्यापारी मक्तेदारी मुळे , त्याच विणकरांची स्थिति फार दयनीय झाली .  ह्याच्या मुळाशी , प्लासी नंतर केले गेलेले बंगालचे नवाब – मिर जाफर , मिर कासिम हे पूर्णपणे कंपनीचे अंकित “ बनवले गेले “ हे कारण होय . नवबांचे अस्तित्व फक्त नावाला होते . सर्व कारभार कंपनीच्या सल्ल्याने होत होता . त्याचा पुरेपूर फायदा कंपनी आणि त्यांच्या “ कारकूनांनी (factors) व अधिकार्‍यानी “ स्वार्था करता  करून घेतला !

प्लासीच्या ( २३ जून १७५७ ) आधी , क्लाइव व अडमिरल वाटसन यांनी फ्रेंचांचा चंद्रनगरला     ( २३  मार्च १७५७ ) पराभव करून ते जिंकले होते . नंतर ( १७५९) मध्ये चिनसुरा येथे डच कंपनीचा पराभव केला . ह्या मुळे दोन महत्वाच्या गोष्टी सिद्ध झाल्या . पहिली -  बंगाल मध्ये कंपनी लष्करी दृष्ट्या सर्वेसर्वा झाली व इतर कंपन्या फक्त नावाला उरल्या .दुसरी  , इतर कंपन्यांचा व्यापार पूर्ण पणे बसला आणि कंपनीचा व्यापार सुरक्षित झाला . कंपनीला व त्यांचे कारकून यांना ( त्यांच्या खासगी व्यापारावर )  बंगाल मध्ये कर द्यायची गरज संपली . बंगालचे नवाब हे कंपनीचे अंकित झाल्याने , बंगाल मध्ये कंपनीचे “ व्यापारी राज्य “  सुरू झाले ( जवळजवळ मक्तेदारी ).

थोडक्यात, प्लासी मुळे ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील आर्थिक व राजकीय राज्य स्थापनेचा पहिला अंक सुरू झाला .  दूसरा परिणाम तर फारच महत्वाचा झाला - इंग्लंड मध्ये , भारतातील पैशाच्या जोरावर - औद्योगिक क्रांतिचे  - १७६० – १८४० युग अवतरले !  ह्या सर्व परिणामांचे मूळ ( सुरवात ) , प्लासीच्या विजयात सापडते ! सर्वात महत्वाचे म्हणजे – बंगाल , बिहार ही श्रीमंत राज्ये कंपनीच्या ताब्यात आली ! म्हणूनच प्लासीची लढाई ही घटना , ईस्ट इंडिया कंपनीच्या इतिहासात “ बंगालची क्रांति “ म्हणून गणली जाते !

२ ) बक्सरची लढाई व तिचे परिणाम :-

प्लासीच्या लढाई नंतर , ठरल्या प्रमाणे सीराज उद्दौलाच्या जागी , मिर जाफर नवाब झाला . जाफरच्या लक्षात आले की , खजिन्यात एव्हडी रक्कम नाही . कशीतरी पहिल्या हप्त्याची रक्कम – रु १ कोटी ५ लाखाचा भरणा कंपनीकडे केला . परंतु खजिना रिकामा झाला .खरी परिस्थिति ,हळू हळू सर्वांच्या लक्षात यायला लागली व ते बंड करू लागले . त्यामुळे जाफरला परत क्लाइवकडे जावे लागले . ह्या अशा बिघडणार्‍या परिस्थिति मुळे ,मिर जाफर इंग्रजां विरुद्ध  कारस्थाने  करू लागला . सरते शेवटी , १७६० मध्ये , कंपनीने मिर जाफरला पदच्युत करून , त्याचा जावई  मिर कासिमला गादीवर बसवले . १७६३ मध्ये मिर कासिमला काढून परत मिर जाफरला गादीवर बसवले . परंतू मिर कासिम स्वस्थ न बसता , त्याने अवधच्या नवाबाशी – शुजा उद्दौलाशी संधान साधले . नंतर शहा आलमने , शुजा उद्दौला आणि मिर कासिम यांच्याशी हात मिळवणी करून , कंपनीशी सामना करायचे ठरवले , कारण सर्वांना कंपनी कडून बंगाल , बिहार परत मिळवायचे होते .

बक्सरची लढाई ( २२ ऑक्टोबर १७६४ ) – लढाईच्या आधी , शेवटपर्यन्त शुजा आणि कंपनी यांच्या वाटाघाटी चालल्या होत्या , परंतू दोन्ही बाजू – शुजा व कंपनी - आपआपल्या अटींवर अडून बसले व तडजोडीला तयार झाल्या नाहीत . शेवटी , २२ ऑक्टोबर १७६४ ला बक्सर ( बिहार मध्ये पण अवधच्या सीमेजवळ ) येथे कंपनी ( मेजर मुनरो ) व शुजा , मोगल आणि मिर कासिम यांच्या सैन्याची गाठ पडली . सैनिकांच्या संख्येच्या दृष्टीने शुजा व मोगल यांचे सैन्य ( ४०,००० ) हे कंपनी ( मेजर मुनरो ) च्या सैन्यापेक्षा  ( जवळ जवळ १०,००० ) खूपच भारी होते . ह्या लढाईत , इंग्रजी फौजा जवळपास हरल्या होत्या , आणि मेजर मुनरो पळून जाण्याच्या बेतात होता . एक शेवटचा जोरदार प्रयत्न करायचे ठरवून त्याने लढाई चालू ठेवली आणि शेवटी ती जिंकली . ह्या अटीतटतीच्या लढाईचा निकाल फक्त तीन तासातच लागला असला तरी ती फार तीव्र होती . रणांगणावरील एकसंध नेतृत्वाचा  आणि समन्वयाचा अभाव ,  विस्कळीत सैन्य असल्याने, शेवटी  पराभूत झाले . या उलट , जिद्दी , एकसंध नेतृत्व आणि शिस्तबद्ध सैन्या आणि थोड फार नशीब , यांच्या जोरावर इंग्रज जिंकले . इंग्रजी तोफा आणि सरस बंदुका यांची त्यांना फार मदत झाली .  लढाई हरल्याचे पाहून , शुजा ( अवधचा नवाब ) ,  बादशाह – शहा आलम – II याला वार्‍यावर सोडून पळून गेला . मिर कासिमही पळून गेला.बक्सरच्या लढाई नंतर , शुजा आणि शहा आलम यांचे मार्ग भिन्न झाले . शुजा पळून गेल्यावर , शाह आलम नंतर बनारसला गेला तेथून इंग्रजां बरोबर तहाच्या व मैत्रीच्या गोष्टी करणे सुरू केल्या ( त्याच संबंधात बनारसला  मेजर मुनरो , त्याला भेटला ). परंतू  शुजाने शेवटपर्यन्त लढायच ठरवलं आणि मराठे ( मल्हार राव होळकर ) आणि इतरांची मदत मागितली . इंग्रजांनीही शुजाचा  पराभव करायचा निश्चय केला व एकेक ठिकाण काबिज करत शेवटी ३ मे १७६५ ला कंपनीच्या कर्नल फ्लेचर याने, शुजाचा ( आणि मदती करता आलेल्या , मल्हारराव होळकरांच्या फौजेचा ) , कोरा येथे परत पराभव केला व पूर्ण विजय प्राप्त केला .

ह्या दोन्ही ऐतिहासिक लढयांच्या बाबतीत ( प्लासी आणि बक्सर) ,  काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात .  दोन्ही वेळेस इंग्रजांच्या फौजांची संख्या विरोधकांच्या मानाने फारच कमी होती , आणि तरी ते जिंकले . दोन्ही लढायात, जर विरोधांची एकी असती , योग्य नेतृत्व असते आणि त्यांनी नेट लाऊन जोर केला असता तर इंग्रजांचा नक्की पराभव झाला असता . इंग्रज जिंकले ते – सरस राजकारण , हिम्मतवान व कणखर नेतृत्व , शिस्तबद्ध सैन्य आणि विरोधकांपेक्षा सरस अशा तोफा आणि बंदूका , यांच्या मुळे ! अगदी ह्याच कारणांच्या आणि जोडीला असलेल्या आर्थिक ताकदीच्या जोरावर त्यांनी , पुढे संपूर्ण भारतीय उपखंड जिंकला .

बक्सरच्या ( आणि कोरा येथील १७६५ च्या ) लढाईचे परिणाम – या एका लढाई मुळे , कंपनीने अनेक गोष्टी एकाच फटक्यात साध्य केल्या . पहिली महणजे शुजा उद्दौला , जो अवधचा नवाब आणि मोगल साम्राज्याचा “ वजीर “ सुद्धा होता , तो – लष्करी आणि राजकीय दृष्ट्या पूर्णपणे पराभूत झाला , ज्याच्या मुळे त्याला कंपनीला शरण जाणे भाग पडले . दुसरी – मोगल बादशाह – शाह आलम – II , ह्याला , एकट पडल्याने , परत कंपनीच्या आश्रयाला जाणे भाग पडले .

बक्सरच्या एकाच लढाई मुळे , मोगल साम्राज्याचा बादशाह , शाह आलम – II , आणि साम्राज्याचा “ वजीर “ सुद्धा , एकाच वेळेस , ईस्ट इंडिया कंपनीचे आश्रित झाले ! ही घटना भारताच्या इतिहासात फार क्वचित घडणारी होती .

रॉबर्ट क्लाइव – बंगालचा गव्हर्नर म्हणून मे १७६५  ला इंग्लंडहून परत आला . त्याच्यासारखा माणूस ही सोन्यासारखी संधि सोडणे शकयच नव्हते . क्लाइव , २ ऑगस्टला शुजाला बनारस येथे आणि शहा आलामला ९ ऑगस्टला अलाहाबादला भेटला. लगेच १२ ऑगस्टला शहा आलम बरोबरचा “ अलाहाबादचा पहिला तह “ आणि १६ ऑगस्टला शुजा बरोबरचा  “अलाहाबादचा दूसरा तह “ नक्की केला व त्यावर सह्या व शिक्का मोर्तब करून ,आणाभाका घेऊन पक्का केला ! 

बादशाह , शहा आलम II बरोबरच्या पहिल्या तहा द्वारे , कंपनीला बिहार , बंगाल आणि ओरिसा ह्या तीन राज्यांचे “ दिवाणी चे हक्क मिळाले . ह्या द्वारे , बादशाह तर्फे जनतेकडून सारा / इतर कर गोळा करण्याचे  कंपनीला हक्क मिळाले . त्याबदल्यात कंपनीने दर वर्षी पातशाहाला रु २६ लाख देण्याचे कबूल केले .

दुसर्‍या तहा द्वारे , कोरा व अलाहाबाद सोडून अवधचा इतर सर्व प्रदेश , शुजाला परत देण्यात आला . ( कोरा व अलाहाबाद बादशाहकडे ठेवण्यात आले . ) शूजाला युद्धाच्या खर्चा बद्दल कंपनीला रु ५० लाख द्यावे लागणार होते . कंपनीला , अवधमध्ये , कोणतेही कर न देता व्यापार करायला परवानगी मिळाली . शिवाय कंपनी आणि शुजा मध्ये – एकमेकांना , परकीय हल्ल्याच्या वेळेस मदत करण्याचा करार झाला .ह्याच करारा बरोबर , कंपनीने , त्यावेळेस फ्रेंचांकडून जिंकलेल्या “ northan sircar - नोर्दन सरकार “ – जे हैदराबाद संस्थानचे भाग होते , त्याला शाहा आलम कडून अधिकृत मान्यता मिळवली !  

बक्सरच्या लढाईचे पर्यवसन ह्या , ज्या दोन अलाहाबादच्या ताहांमध्ये झाले , त्याचे मोगल साम्राज्यावर आणि पर्यायाने भारतावर झालेले राजकीय व लष्करी परिणाम  :-  प्लासीच्या लढाईमुळे , जरी बंगाल , बिहार , एका दृष्टीने कंपनीच्या ताब्यात आले , तरी त्यांच्या कडे – भारतीय व इतर लोक “ परकीय घूसखोर “  म्हणूनच बघात होते . भारतातील राजकीय स्थिति मध्ये त्यांना , कोणतेही अधिकृत स्थान नव्हते किंवा पातशाही मान्यताही नव्हती .थोडक्यात , कंपनी जे काही करत होती , ते मोगली सत्तेच्या दृष्टीने बेकायदेशीर होते ! ही महत्वाची उणीव , कंपनीला जे बंगाल , बिहार , ओरिसा मध्ये  खुद्द पातशाह कडून “ दिवाणी ” हक्क ( कर गोळा करणे , प्रशासन करणे , न्याय देणे इ ) मिळाले , त्या मुळे दूर झाली ! आता कंपनी मोगली  व पर्यायाने भारतीय सत्तेचा अधिकृत “ भाग व प्रतीनिधी “ झाली . कंपनीच्या दृष्टीकोनातून ही अतिशय महत्वाची घटना होती .      

बक्सर नंतर कंपनीच्या हालचाली , कलकत्त्या पासून - अवधच्या पश्चिम सीमे पर्यन्त पोहोचल्या . “ रोहिलाखंडला ( जे अवध प्रमाणेच स्वतंत्र होत होते ) “ लशकरी दृष्ट्या लक्ष्य करायला कंपनी मोकळी झाली - जे नंतर त्यांनी केले.  

बक्सरच्या विजयाचे कंपनीवर आणि पर्यायाने भारताच्या जनतेवर झालेले परिणाम –

प्लासी व बक्सरच्या लगोपाठच्या विजयामुळे आणि जे दिवाणी हक्क मिळाले ,  त्याचे अपरिवर्तनीय असे परिणाम  भारतावर ( व कंपनीवरही ), मोठ्या प्रमाणावर झाले .

“ दिवाणी “ हक्कामूळे , कंपनी , बंगाली सुभयाच्या , १ कोटी जनतेकडून , बादशहा तर्फे कर गोळा करण्यास मोकळी झाली . त्यामुळे कंपनीला , व्यापारा शिवाय दुसरर्‍या उत्पन्नाचा स्त्रोत तयार झाला , जो कंपनीने वाढवतच नेला . हयामुळे कंपनीचे इंग्लंड मधील महत्व एकदम वाढले . आर्थिक स्थिति सुधारली.

कंपनीने हळू हळू ह्या तीन्ही प्रांताची प्रशासकीय व्यवस्था हातात घेऊन बदलली . त्यामुळे कंपनीचा ह्या तिन्ही प्रांतावरचा – राजकीय , आर्थिक , लशकरी व प्रशासकीय ताबा दृढ झाला व राज्य स्थापनेची पूर्वतयारी सुरू झाली . आता कंपनी व्यापार आणि राज्य हे दोन्ही करायला मोकळी झाली .

एक व्यापारी कंपनी “ राज्यकर्ती “ झाली ,ही जगाच्या इतिहासात ही एक अभूतपूर्व घटना घडली होती ! प्लासी ( १७५७ ) पूर्वी फक्त व्यापार हाच उद्देश होता . प्लासी / बक्सर नंतर व्यापारा बरोबरच “ राज्य आले ! त्याच्या नंतर , १८ व्या शतकाच्या शेवटापासून मात्र फक्त “ राज्य “हेच प्रमुख उद्दीष्ट झाले व पूर्ण भारतीय उपखंड त्यांच्या ताब्यात गेला . तरीही , व्यापार सुरूच राहिला , पण तो “ राज्य स्थापनेतून “ तयार झाला. तात्पर्य,”  व्यापारातून राज्य “ हे बदलून “ राज्यातून व्यापार “ असा क्रम झाला ! कंपनीचीची भूमिका – व्यापारी आणि राज्यकर्ते अशी दोन्ही झाली . आणि हे सुद्धा – येथील जनते च्या बाबतीत कोणतीही , जबाबदारी न घेता , सहज झाली . कंपनी ही त्यांच्या लंडन मधील “ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स “ ला जबाबदार होती , जे फक्त “ जास्ती जास्त नफा “ ह्या उद्देशाने कारभार करत होते . कंपनीची  बांधिलकी ही इंग्लंडचा , राजा , भागधारक व जनता ह्यांना होती . भारतीय जनतेच्या , राजाच्या किंवा येथील चालीरीती , परंपरा , संस्कृती यांच्या प्रती नव्हती ! कंपनी भारतात – कधीही, कशीही वागायला वा काहीही करायला मोकळी होती !

आशा ह्या “ व्यापार व राज्य अशा धोकादायक मिश्रणाचे “ परिणाम  लगेचच , बंगालच्या १७६९-७० च्या दुष्काळात बघायला मिळाले .बंगालच्या दुष्काळाची तीव्रता फारच वाढून , लाखो लोक भुकेने – अन्नधान्य न मिळाल्याने मरण पावले . नैसर्गिक आपत्तीचे , भयानक – भूकबळींच्या अवस्थेत झालेले पर्यवसन हे प्रामुख्याने कंपनी मुळे झाले .

हे सर्व येथे कथन करण्याचे प्रयोजन हेच की , ईस्ट इंडिया कंपनी भारतात अशी का वागली आणि कशारीतीने कंपनीची भारतातली आर्थिक ताकत तयार झाली , ह्याच्या मागील पार्श्वभूमीची  कल्पना यावी . ह्याच आर्थिक ताकदी मुळे कंपनीने , पुढे  फक्त  ६० वर्षात ( १७५७ ते १८१८ )  भारताच्या फार मोठ्या भागावर कब्जा केला ! ह्या “ क्रांतिची “ आणि पर्यायाने आपल्या  गुलामगिरीची  सुरवात – प्लासी आणि नंतर बक्सरच्या लढायानी झाली  !   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा